का रुसलाय माझा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 07:36 PM2018-07-14T19:36:21+5:302018-07-14T19:37:11+5:30
प्रासंगिक : मी पुन्हा पुन्हा आठवते - अशी कोणती आगळीक झाली माझ्याकडून! माझ्या प्रश्नाने त्याच्या मनात शंका तर पेरली नसेल ना? की वाटली असेल माझ्या मनस्वीपणाची भिती त्याला... माझ्या अति बडबडीने हैराण झाला असेल बिच्चारा नक्कीच! किंवा असंही झालं असेल, माझ्या इमानी श्वासांचा दाब आला असेल त्याच्यावर... की मोहात पडलाय, नव्या प्रदेशाच्या रंगीबेरंगी फुलपाखरांच्या? अंतराचे अंतर वाढल्याने निष्ठा पातळ होतात हळूहळू .....असं आई म्हणायची नेहमी! ते तर खरं नसेल...
- डॉ. संजीवनी तडेगावकर
पाऊस असा यावा की, नाचेल जीवाचा मोर । धडकून नदीच्या काठी, वाढेल पुराचा जोर।।’’ ही कविता तशी फार पूर्वी लिहिली होती, नक्की कधी तेही आता आठवत नाही... पण अशा वेळी जेव्हा मनसोक्त पाऊस यायचा... अंतर्बाह्य भिजवून टाकणारा! येऽ रे येऽ रे पावसा म्हणत, त्याला साद घालताच शेजारच्या गल्लीतून खेळगड्यासारखा धावत येणारा पाऊस! टपोरे थेंब अंगाखांद्यावर झेलत गाड्या-भिंगोऱ्याच्या पावलात अंगणभर नाचत राहायचा... ओले झालेले कपडे अंगावरच वाळवत तुडुंब वाहणाऱ्या नदी-नाल्यांचा खळाळ अनुभवताना, कागदी होड्या हातातच सादळून जायच्या... भिजक्या मनासारख्या!केसातून गळणारा पाऊस सावरताना माझी उडणारी तारांबळ... आणि मैत्रिणीची होडी काठाला लागलेली असताना... डोळ्यादेखत माझी होडी भोवऱ्यात अडकलेली पाहताना डोळ्यातून टपटपणारा पाऊस...
मला अजूनही आठवतोय, अजूनही आठवतोय. नुकताच वयात आलेला तो खट्याळ पाऊस! अनवाणी पावलांनी शाळेची वाट तुडवताना अर्ध्या रस्त्यात, बेसावध क्षणी गाठून चिंब भिजवणारा पाऊस... आतली धडधड बाहेर उमटू नये म्हणून हातातलं दप्तर छातीशी घट्ट कवटाळताना ऊन-सावलीत सांडणारा लाजऱ्या वयाचा बुजरा पाऊस...
नजरेची फुलपाखरं वाऱ्यावर भिरभिरताना तो पापण्यांवर अलगदपणे कधी येऊन बसला काही कळलेच नाही... हळदुल्या मनाचे त्याचे गोष्टीवेल्हाळ रूप मनाला इतके भावले की, अवघा प्राण त्याच्या वाटेवर हुळहुळत राहिला... त्यावेळी जगभरातल्या सगळ्या कवींनी जणू माझाच पाऊस चोरलाय की काय असं वाटलं मनातून. तो यायचा तेव्हा बावचळून आयचा जीव नुसता... चैतन्याची सळसळ तनामनाला बिलगून असायची... त्याच्या भरवशावर अनेक स्वप्नांची रुजवणूक व्हायची... मनाला गर्भारपणाचे वेध लागायचे... न राहवून एकदा ओंजळीत भरून विचारलं होतं मी त्याला, ‘‘तुला इतका जीव लावला असं काय आहे रे तुझ्यात?’’ तेव्हा गडगडाटी हसत डोळे मिचकावून माझ्या बटांशी खेळत डोळ्यातून आत उतरत खोल आवाजात म्हणतो कसा, ‘तुझ्या मनालाच विचार!’आणि फुर्रर करून निघून गेला कुठलीच हमी न देता... मी वाट पाहतेय त्याची... डोळे वाटेवर ठेवून...
वाऱ्याहाती निरोप धाडले... पत्र पाठवले... कविता लिहिल्या... पण तो फिरकला नाही.. कधीच...
कधी-मधी कुणाकडून आजूबाजूच्या परिसरात येऊन गेल्याचे कळते. तेव्हा काळजात कळ उठते... नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या होतात...
मी पुन्हा पुन्हा आठवते - अशी कोणती आगळीक झाली माझ्याकडून! माझ्या प्रश्नाने त्याच्या मनात शंका तर पेरली नसेल ना? की वाटली असेल माझ्या मनस्वीपणाची भिती त्याला... माझ्या अति बडबडीने हैराण झाला असेल बिच्चारा नक्कीच! किंवा असंही झालं असेल, माझ्या इमानी श्वासांचा दाब आला असेल त्याच्यावर... की मोहात पडलाय, नव्या प्रदेशाच्या रंगीबेरंगी फुलपाखरांच्या? अंतराचे अंतर वाढल्याने निष्ठा पातळ होतात हळूहळू .....असं आई म्हणायची नेहमी! ते तर खरं नसेल...पण मी वाट पाहतेय अजूनही... व्याकुळ मनाने...
उदासून गेलंय मन... हिरमुसलाय भोवताल... स्वप्नांचा हिरमोड झालाय फुलांच्या... गाणं गात नाहीत पाखरं हल्ली म्हणे, रुतून बसलंय गळ्यात... वाचाव्या वाटत नाहीत आवडत्या कवीच्या कविता... टेपरेकॉर्डरवर साचलीय धूळ... खूप खूप आठवण येते त्याची तेव्हा... डोळ्यातून दाटून येतो नुसता! गालावरून ओघळताना मी विचारत असते त्याला...
‘‘तुला, इतका जीव लावावा असं काय आहे रे तुझ्यात?’’