यादव काळात ‘वृद्धी’ झालेला चालुक्यांचा नागेश्वर प्रासाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 07:36 PM2018-05-26T19:36:35+5:302018-05-26T19:38:23+5:30
स्थापत्यशिल्पे महाराष्ट्रातील देवळांवर तत्कालीन घडामोडींचा उल्लेख, कालनिर्देश असलेले शिलालेख तसे अभावानेच सापडतात. त्यामुळे अनेक अप्रतिम कलाकृतींचे कर्ते किंवा निश्चिती उभारणीचा काळ कळणे अवघड असते. मात्र, परभणीत सेलू तालुक्यातील हातनूर या गावी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजवटींचे पुरावे एका सुबक मंदिर समूहाच्या रूपाने जपले गेले आहेत. पूर्वाश्रमीच्या हैदराबाद संस्थानातील हातनूरला आजही पोहोचणे सोयीस्कर नाही. पण, गावात शिरताक्षणीच पुरातन वसाहत असल्याचे पुरावे गावभर विखुरलेले दिसतात. हातनूरमध्ये नागेश्वर आणि उत्तरेश्वर या दोन ‘हेमाडपंती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिरांची नोंद सापडते.
- सायली कौ. पलांडे- दातार
नागेश्वर मंदिर हा एकूण गावाचा आणि गावकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय व केंद्रस्थान आहे. बाहेरून रंगरंगोटी केलेल्या मध्ययुगीन प्रवेशमंडपातून आपण मंदिराच्या प्रकारात (आवारात) शिरतो. आवारात शिरताच पहिली नजर स्थिरावते ती प्रशस्त बारवेवर! विस्तीर्ण पसरलेली बारव, ५ ते ६ चौरस टप्प्यांची असून तिला चारही बाजूंनी प्रवेशाची सोय आहे. ५ टप्प्यांपैकी दोन टप्प्यांवर मध्यभागी पायऱ्या असून, खालील टप्प्यांवर एका आड एक पायऱ्या आहेत. बारवेतील दगड काढून मंदिर बांधण्यासाठी वापरत असत; म्हणून मूळ मंदिराचा काळ व बारवेच्या बांधणीचा काळ एकच असावा. आज बारव एका बाजूने खूप ढासळली आहे. पण, गावकरी ती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातून गावासाठी पाण्याचा चांगला स्रोत तयार होऊ शकतो.
अशा मंदिराचा निश्चित काळ काढण्यासाठी आपल्या उपयोगी येतो. कला इतिहास आणि शिलालेख! बारव व मंदिराच्या आजूबाजूला काही उत्तर चालुक्यकालीन स्तंभांचे तुकडे आढळतात. तसेच महिषासुरमर्दिनी, भैरव, काही सिद्ध योगी यांच्या खंडित मूर्ती आढळतात. मंदिरासमोरील चौथऱ्यावर गणपती, माहेश्वरीसदृश शक्ती देवता, गणेश, खंडित नंदी, पादुका, असे उत्तर चालुक्यकालीन पुरावशेष मांडून ठेवले आहेत. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह व निरंधार प्रदक्षिणापथ, असा तलविन्यास आहे. मूळ मंदिरातील कक्षासन, चंद्रशीळा इत्यादी भाग अस्ताव्यस्त पडले आहेत. आजचे मंदिर उत्तर चालुक्य काळातील मूळ अधिष्ठानांवर उभे आहे. वैशिष्ट्य म्हणजे सभामंडप आणि गर्भगृह, दोन्हीचे विधान तारकाकृती (चांदणीसारखे) आहे. त्यात सभामंडपाच्या अधिष्ठानाला तीन बाजूंनी पायऱ्या आहेत. मूळ चालुक्य मंदिर त्रिगर्भी असावे. मूळ मंदिराचा कर्ता व इतर तपशील, पुराव्याअभावी अज्ञात आहे.
वरील ‘उत्तर चालुक्य थरावर’ नंतरचे यादवकालीन मंदिर उभे आहे. यादव काळातील संदर्भ मुखमंडपातील स्तंभावरील शिलालेखातून स्पष्ट होतात. शके १२२३ म्हणजेच इ. स. १३०१ सालातील शिलालेख मूळ मंदिराच्या जीर्णोद्धाराची हकीकत नोंदवतो.
पुरुषदेव पंडित याने प्लवनाम संवत्सरात नागनाथ मंदिराची वृद्धी केली अर्थात जीर्णोद्धार केला. हे त्याने हरिदेव नावाच्या शिल्पकाराकरवी करून घेतले. इथे शिल्पकाराला ‘सुतार’असा शब्द वापरला आहे. यात उल्लेखला ‘पुरुषदेव’. हा पुरुषोत्तमपुरी ताम्रपटातील यादव सम्राट रामचंद्रदेव याचा पंतप्रधान पुरुषदेव असावा. लेखाचा काळ व अक्षर वाटिका उत्तर यादवकालाशी सुसंगत आहे. ह्यावरून मूळ मंदिर त्या आधीचे आहे, हे ध्यानी येते. मूळ मंदिराचा पंथीय वैमनस्यात विध्वंस झाला असावा किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असावे.
मुखमंडपातून सभामंडपात शिरताना द्वारशाखा तुलनेने अशी एक स्तंभयुक्त आहे. ललाटबिंबावर गणेशप्रतिमा आहे, ह्याखेरीज विशेष शिल्प व नक्षीकाम नाही, चंद्रशीलासुद्धा नाही. आत शिरल्यावर सभामंडपाची उंची विशेष लक्ष वेधून घेते. नागशीर्षयुक्त उठावदार अर्धस्तंभ असलेला मंडप स्तंभविरहित आहे. तसेच, मागील भिंतींमध्ये दोन देवकोष्टे आहेत. उजव्या व डाव्या बाजूला अजून दोन गर्भगृहवजा कोनाडे आहेत. त्यातील एकात रिकामे आसन असून दुसरे रिकामे आहे. सभामंडपाचे छत असामान्य असून उक्षिप्त प्रकारचे मानता येईल. यात, चारही कोपऱ्यातील वक्राकार रेषा मध्यभागी असलेल्या चौरसाच्या चार कोपऱ्यांना मिळतात. बांधीव स्थापत्यातील छताचे वक्राकार सांधे जसे दिसतात तसे दगडातील कोरीव काम केले आहे. मध्यभागातील चौरसात ‘गजतालु’ हा आकार वापरून ‘क्षिप्त उक्षिप्त’ (आत-बाहेर) छत भासावे, अशी नक्षी केली आहे. आज, सभामंडपातील रिकाम्या भिंतींवर ग्रामस्थांनी संत व देवतांची चित्रे रंगविली आहेत. मुख्य गर्भगृह अगदी साधे असून स्तंभशाखा व गणेश प्रतिमायुक्त आहे. गर्भगृहात नंतर स्थापलेले शिवलिंग व मागे रिकामे देवकोष्ट आहे.
नागेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर खुर, कुंभ असे ढोबळ थर आढळतात. पण, त्यात कुठली कलाकुसर नाही. वर जंघा भागातून रत्नपट्टिका पूर्ण मंदिराभोवती फिरवलेली आहे. कपोतावरती रत्न नक्षीयुक्त अजून एक थर आहे. बाह्यांगावर असलेला शिल्पकामाचा अभाव व तुलनेने कमी कौशल्यपूर्ण काम, उत्तर यादवकाळाचे स्थापत्य अधोरेखित करतो. मंदिराची सर्वात जमेची बाजू आहे ते त्याचे मूळचे विटांचे भूमीज शिखर! आज बहुतांशी मंदिरावरील शिखरे पडून गेली असल्यामुळे मूळ शिखरांची कल्पना येत नाही. इथे मात्र, यादवकालीन भूमीज शिखर आहे व तेही घडीव विटांचे! भूमीज शिखर म्हणजे एकावर एक शिखरांच्या प्रतिकृतींच्या रांगा रचून निमुळत्या होत जाणाऱ्या शिखराद्वारे अनेक मजल्यांचा भास निर्माण केलेला दिसतो. नागेश्वर मंदिर, पंच भूमीज पंचरथ आहे व त्याला शिलालेखात प्रसाद म्हटले गेले आहे.
मंदिराचे मूळ छायाचित्र, ग्रामस्थांनी निगुतीने जपून ठेवले आहे व त्याचा मंदिर अभ्यासाला चांगला उपयोग झाला. असे दस्तऐवजीकरण डिजिटल युगात गावोगावी व्हायला हवे. मंदिर शिखरावर तीन भूमी आमलकाचे थर दिसतात व तारकाकृती विधानाच्या चार कोपऱ्यांवर चैत्य गवाक्ष व शिखर प्रतिकृती घडविल्या आहेत. त्याच्यावरील पडलेले शिखर काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी एक जिना सोडून सिमेंटचा वापर करून बांधून काढले आहे. नवीन बांधले तरी वर भूमीज शिखरशैली राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फक्त, भडक रंगाने मूळचे वैभव आणि बांधणी झाकोळली गेली आहे. सिमेंट कामात इतर आधुनिक सामुग्रीचा वापर केल्यामुळे मंदिरावर अस्थायी भार पडत नाही ना, हे बघणे गरजेचे आहे. जीर्णोद्धाराची ७००-८०० वर्षांची परंपरा लाभलेले नागेश्वर देवालय पंचक्रोशीत विख्यात आहे. देऊळ, देव व वास्तू निर्मितीबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. इथे मोठी यात्राही भरते. ग्रामस्थांचे आस्थेचे ठिकाण असणाऱ्या नागेश्वर मंदिराची क्षती न होवो, उलटपक्षी वैज्ञानिक पद्धतीने बारवेचे संवर्धन होवो, हीच सदिच्छा!
( sailikdatar@gmail.com )