नळदुर्ग : मध्ययुगीन जल अभियांत्रिकीचे विलक्षण उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 07:55 PM2018-01-01T19:55:55+5:302018-01-01T20:02:33+5:30

स्थापत्यशिल्पे : पाणी म्हणजे मनुष्यवसाहतीच्या अस्तित्वासाठी एक अत्यावश्यक गोष्ट; पण आपल्या मराठवाडयात तर अनंतकाळापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जणू आपल्या पाचवीलाच पुजलेले. मग राज्याच्या संरक्षणासाठी गड- किल्ले बांधायचे, तर पाण्याची व्यवस्थाही महत्त्वाची. 

Naldurg: The unique example of medieval water engineering | नळदुर्ग : मध्ययुगीन जल अभियांत्रिकीचे विलक्षण उदाहरण

नळदुर्ग : मध्ययुगीन जल अभियांत्रिकीचे विलक्षण उदाहरण

googlenewsNext

- तेजस्विनी आफळे

आजपर्यंत पाहिलेल्या सर्वच किल्ल्यांवर पाणीसाठवण आणि पुरवठा याबद्दलच्या व्यवस्था आपण पाहिल्या. अजिंठा-सातमाळा डोंगररांगेतील गिरीदुर्गांवर डोंगरांमध्ये टाकी खोदून तसेच खोलगट भागात पाण्याचे स्रोत अडवून छोटे तलाव तयार करून पाणी साठवले गेले, तर बालाघाट रांगेतील भूदुर्गांवर पाणी साठवण्यासाठी विहिरी, हौद, तलाव, तर मातीच्या खापरांचे नळ व बांधीव पाटांच्या स्वरूपात अधिक विस्तृत जलव्यवस्था दिसते. काही किल्ल्यांच्या जवळच बांधीव जलाशयही आहेत. इतकेच नव्हे, तर सुंदर पुष्करणी, बागा, हमाम, अशा जलव्यवस्थेशी निगडित रचनांमधून वास्तुरचनाकारांचे जल अभियांत्रिकीमधील कौशल्य दिसते. अशा मध्ययुगीन जलस्थापत्यरचनांच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग किल्ल्यातील पाणीव्यवस्थेने वेगळीच उंची गाठली, असे म्हणावे लागेल. मागील दोन भागांमध्ये नळदुर्ग किल्ल्याच्या राजकीय इतिहास आणि सामरिक रचनेविषयी माहिती घेतली. दक्षिण मराठवाड्यातील कमी पावसाच्या प्रदेशात वसलेल्या या अवाढव्य किल्ल्यासाठी जलव्यवस्थापनसुद्धा तेवढ्या ताकदीचे लागणार हे साहजिकच. उत्तर-पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाणाºया बोरी नदीच्या दक्षिण किनाºयावर नळदुर्ग, तर उत्तर किनाºयावर रणमंडळ हे भूदुर्ग दिमाखात उभे आहेत. बोरी नदी नळदुर्ग किल्ल्याला वळसा घालून दक्षिणेला वळते. या वळणाआधी दोन किल्ल्यांना जोडणारी एक सुमारे ७०-८० फूट उंच भिंत नदीचे पाणी अडवून उभी ठाकलेली दिसते. एक भला थोरला जलाशयच निर्माण करणाºया या स्थापत्यरचनेचे आश्चर्य घडवले आहे इब्राहिम आदिलशहा दुसरा याने. तेही तब्बल तब्बल १६ व्या शतकात...

बाहेरून आपल्याला दिसते तशी ही नुसतीच भिंत नाही, तर आत लपलेला एक जलमहालच आहे. जलाशयाची पातळी पावसाळ्यात वाढली की, जास्तीचे पाणी निघून जाण्यासाठी योग्य ठिकाणी भिंतीची उंची कमी करून जागा केली आहे. पावसाळ्यात पाणी जाताना इथे नर आणि मादी नावाचे दोन देखणे जलप्रपात तयार होतात... वास्तुकाराची कल्पकता तर पाहा... आतील जलमहालातील एका दालनाचा सुंदर कमानींचा झरोखा उघडतो ते या दोन धबधब्यांच्या मधल्या जागेत... पावसाळ्यात पाण्याचे असंख्य तुषार या कमानींचे सौंदर्य खुलवतात का? या सुंदर महिरपदार कमानींमुळे जलप्रपातांना सुंदरता लाभते कुणास ठाऊक!! भिंतीवरून आतील दालने, छोटी पुष्करणीयुक्त हमाम, शौचकुपा ठिकाणी जाण्यासाठी भिंतीवरून खाली जलाशयातील जास्तीचे पाणी जाण्यासाठी दोन जलप्रपातांव्यतिरिक्त धरणाच्या भिंतीतून ही इतर मार्गांनी पाण्याचा निचरा सतत होईल याची व्यवस्था आहे. भिंतीवरील दाबनियमन करण्याचे हे जल-अभियांत्रिकीतील कौशल्य केवळ विलक्षण आहे.

नळदुर्ग किल्ल्याचे उत्तर-पश्चिमेचे टोक म्हणजे परांडा बुरूज. या बुरजाच्या जवळच्या सखोल भागाला तटबंदीने बंदिस्त करून लगतच्या जलाशयातील पाणी जमा केले जात असल्याचे दिसते. ते पाणी चक्क मोटेद्वारे उचलून किल्ल्याच्या इतर भागांत बंदिस्त नळांद्वारे पोहोचवले जात असणार, असा तेथील भग्नावशेषांवरून अंदाज बांधला जाऊ शकतो. याशिवाय मशिदीसमोरील मोठा हौद, इतर छोटे हौद, किल्ल्याच्या दक्षिण भागात नैसर्गिक सखोलतेचा वापर करून झालेला हत्ती तलाव पाहता किल्ल्याच्या जलव्यवस्थापनाचा अभ्यास आजच्या वास्तुरचनाकार आणि जलअभियांत्रिकीतज्ज्ञांसाठी एक आव्हानच आहे हे नक्की!!

आज किल्ल्यांचा विकास हा आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. आपल्या मराठवाड्यातील किल्ल्यांना शिवरायांचा सुवर्णस्पर्श कदाचित झाला नसेल; परंतु या किल्ल्यांचे ऐतिहासिक तसेच स्थापत्यरचनांचे महत्त्व नक्कीच कमी होत नाही. मात्र, आपल्या विकासाविषयीच्या कल्पना किल्ल्यांच्या मूळ गाभ्याला, स्थापत्यरचनेला धक्का तर पोहोचवत नाहीत ना, याची जाणीव ठेवूनच काम करणे अधिक आवश्यक आहे. इथे एकेकाळी डोळे दिपवून टाकणा-या महालांचे आज भग्नावशेषही उरले नसतील. मात्र, आज ओस, भग्न वाटणाºया नळदुर्गसारख्या अवाढव्य किल्ल्यांवर फक्त क्षणिक आनंदाच्या मनोरंजनव्यवस्था न करता किल्ल्याचा इतिहास, आव्हानात्मक जलप्रणाली आणि स्थापत्यरचना यांची योग्य माहिती दिली, तर पुढच्या पिढीसाठी आपण एक खजिनाच खुला करून ठेवू शकणार नाही का... तसेच वास्तुसंवर्धन करताना काळजीपूर्वक आणि व्यवस्थित अभ्यासांती केलेलेच हिताचे... कारण एखादे इतिहासाचे पान आपल्या बेपर्वाईमुळे निखळले... तर यासम हा परत होणे नाही...!!

(लेखिका पुरातत्वज्ञ आणि वास्तुसंवर्धनतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Naldurg: The unique example of medieval water engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.