नरहर कुरुंदकर ‘ते होते जीवित’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 07:33 PM2018-02-10T19:33:37+5:302018-02-10T19:33:43+5:30

बुकशेल्फ : नरहर कुरुंदकर या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा परिस्पर्श झालेल्या पुण्यवाणांची यादी मोठी आहे. नरहर कुरुंदकर ‘ते होते जीवित’ या प्रा. मधुकर राहेगावकर यांनी संपादित आणि मालती  राहेगावकर यांनी संकलित केलेल्या विचार वैभवातून कुरुंदकरांचे मोठेपण, तेजोवलय बरेच नजरेच्या टप्प्यात येते.

Narhar Kurundkar 'they are alive' | नरहर कुरुंदकर ‘ते होते जीवित’

नरहर कुरुंदकर ‘ते होते जीवित’

googlenewsNext

- दीपक देशमुख

इतर कुणाच्या बरोबर स्वर्गात राहण्यापेक्षा सॉक्रेटिसाबरोबर नरकात राहाणे चांगले, असेच मी मानतो. इतर कुणाच्या सहवासात सॉक्रेटिसाला टाळून सुखी होण्यापेक्षा सॉक्रेटिसाच्या सहवासात तर्कशुद्ध होण्याचा प्रयत्न करून आपले दु:ख स्वत:वर ओढवून घेणे, हे मला जास्त श्रेयस्कर वाटते. कारण सॉक्रेटिसाचे विचार बरोबर असोत की चूक असोत; त्याचा विचार करण्याचा हक्क आणि तो प्रस्थापित करताना त्याने पत्करलेले उदात्त मरण मला विलोभनीय वाटते’ हे बोलून दाखविणारे नरहर कुरुंदकर विलक्षण प्रतिभाशाली. या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा परिस्पर्श झालेल्या पुण्यवाणांची यादी मोठी आहे. नरहर कुरुंदकर ‘ते होते जीवित’ या प्रा. मधुकर राहेगावकर यांनी संपादित आणि मालती  राहेगावकर यांनी संकलित केलेल्या विचार वैभवातून त्यांचे मोठेपण, तेजोवलय बरेच नजरेच्या टप्प्यात येते.

मूळचे मराठवाड्यातील परभणीचे नरहर कुरुंदकर यांची कर्मभूमी नांदेड अंकित झाली असली तरी त्यांचे तत्त्वज्ञान सूर्यकिरणांच्या गतीने जगभर पसरले. कुरुंदकरांनी मराठी विषय प्रत्यक्ष शिकविला, ज्यांना त्यांच्याकडून शिकण्याचे भाग्य लाभले, ते अमृताची गोडी अनुभवले. ज्यांना त्यांचा सहवास लाभला त्यांना जीवन सफल झाल्याचा आनंद झाला. त्यांच्या आठवणी सार्‍यांनीच जपल्या आहेत. अगदी जिवापाड.

नरहर कुरुंदकर ‘ते होते जीवित’ या लेखमालेतून प्रसिद्ध झालेले लेख म्हजेच अमृतधाराच आहेत. कुरुंदकर गेले, पण ते डोळ्यासमोरून जातच नाहीत. ही सहजगत्या प्राचार्य डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी त्यांच्या लेखातून व्यक्त केलेली भावना संबंधाला घट्टपणा अंकित करून जाते. प्राचार्य राम शेवाळकरांनी नरहर कुरुंदकरांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा, चौफेर व्यासंगाचा  अनुभव त्यांच्या स्रेहसंबंधातून व सहवासातून वरच्यावर येत गेल्याचा उल्लेख मोठ्या  आदाराने केला आहे. कुरुंदकरांच्या मांडणीत एक समग्र दृष्टी अंतर्निहित असे आणि त्यामुळे त्यांनी एखादे प्रमेय मांडले, तर ते विचारात घेण्यावाचून गत्यंतर नसे,असे यदुनाथ थत्ते यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे. गंगाधर पानतावणे यांनी कुरुंदरकरांचा निर्भिडपणा स्पष्ट करताना त्यांच्या मोठेपणाची ओळख आगळ्या शैलीत मांडली आहे.

कुणाची सोय अथवा गैरसोय जपत गुरुवर्य कुरुंदकरांचे विवेचन चालत नाही. त्यांच्या व्यापक जीवननिष्ठेचे दलित प्रश्न हे एक अपरिहार्य असे अंग असल्याचा उल्लेख प्रा. दत्ता भगत यांनी ‘एक विद्यापीठ कोसळले’ या लेखात केला आहे. कुरुंदकरांनी हिंदुजातवादावर, चातुर्वण्यावर प्रखर प्रहार केल्याचे नमूद करीत म. य. दळवी यांनी घेतलेला आढावा कुरुंदकराच्या प्रगल्भ विचारांची आणि सडेतोडपणाची  कक्षा आणखी रुंदावतो. भालचंद्र फडके यांनी कुरुंदकरांची दलित साहित्याविषयीची भूमिका मांडली. ते म्हणतात, तसे पाहिले तर कुरुंदकरांची भूमिका जीवनवादी समी़क्षकाची. साहित्याचे क्षेत्र स्वायत्त आहे, असे ते मानीत असले तरी साहित्याचे क्षेत्र जीवनापेक्षा स्वतंत्र, पृथक आणि जीवननिरपेक्ष आहे असे ते समजत नाहीत. आजचे मराठी साहित्य सामाजिकदृट्या पुरेसे प्रक्षोभक आहे काय? या प्रश्नाचे उत्तर देताना कुरुंदकरांनी मराठी वाङ्मयात ज्या क्षोभाचे चित्र पडलेले आहे तो क्षोभ वरिष्ठवर्गीय व्यक्तिवादाशी निगडित असणारा, वैयक्तिक असमाधानाचा अविष्कार असल्याचे म्हटल्याचा उल्लेख करीत फडके यांनी कुरुंदकरांच्या स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मतप्रवाहाच्या गतीचीही मांडणी केली आहे.

पन्नालाल सुराणा यांनी ‘राजकीय पक्षांविषयीची भूमिका’या लेखातून कुरुंदकरांची समरसता, समाजवाद आणि जातीय राजकारण हे उत्कंठा निमारण करणारे मुद्दे नजरेत आणले आहेत. कुरुंदकरांना समाजवादी पक्ष आपला वाटत होता, पण त्यांचा पिंड विचारवंताचा असल्याने एका पक्षाच्या चौकटीत बसणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्हते असे सांताना सुराणा यांनी व्यक्त केलेल्या भावना वाचकाला कुरुंदकरांच्या आणखी जवळ नेवून ठेवतात.  डॉ. प्रकाश मेदककर यांनी कुरुंदकरांचा व्यासंग आणि विवेचनाचा आवाका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. बाबा अमटे, मेहरुन्निसा दलवाई,  डॉ. नंदकुमार देव, प्रभावती कुरुंदकर यांच्यासह अनेक ताकदीच्या लेखकांनी कुरुंदकरांबद्दल व्यक्त केलेल्या भावना मनात आणखी मोठी पोकळी निर्माण करून जातात. कुरुंदकर खरंच हवे होते. दिर्घकाळ.

नरहर कुरुंदकर ‘ते होते जीवित’
संकलन : मालती मधुकर राहेगावकर
संपादन : प्रा. मधुकर राहेगावकर
प्रकाशक : अभंग प्रकाशन, नांदेड

( ddeshmukh1468@gmail.com )

Web Title: Narhar Kurundkar 'they are alive'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.