नरसापूरची पाणीपुरवठा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 07:26 PM2018-05-19T19:26:20+5:302018-05-19T19:28:22+5:30
लघुकथा : तालुक्यातील अनेक गावांत आपण अनेक योजना राबवल्या. मात्र या गावातील लोकांच्या अंतर्गत राजकारणामुळे आपणाला या गावाला ठोस असं काही देता आलं नाही. कधी काही द्यायचा विषय निघाला की लोकं एकमेकांच्या श्रेयासाठी भांडून घ्यायचे. त्या त्यांच्या वादात ती योजना तशीच रखडून जायची.
- प्रदीप धोंडिबा पाटील
पंधरा- वीस वर्षे आमदारकी केलेल्या भाऊसाहेब पाटलाच्या कारकीर्दीत नरसापूरचा पाणीपुरवठा प्रश्न मिटवायचा तसाच राहून गेला होता. या गावात अठरापगड जात. देशात जेवढे पक्ष तेवढे पक्ष नरसापुरात! परंतु व्यक्तिश: भाऊसाहेब पाटील जेव्हा निवडणुकीला उभे राहायचे तेव्हा त्यांच्या पारड्यात मताचं दान या गावचे लोक भरभरून टाकायचे. या गावचे लोक गावच्या विकासासाठी कधी एकत्र येत नसत; परंतु भाऊसाहेबांची निवडणूक म्हटलं वरकरणी कोणी कोणाला काही सांगायचे नाहीत. मात्र मतपेटीतून भक्कम पाठबळ दाखवायचे.
तालुक्यातील अनेक गावांत आपण अनेक योजना राबवल्या. मात्र या गावातील लोकांच्या अंतर्गत राजकारणामुळे आपणाला या गावाला ठोस असं काही देता आलं नाही. कधी काही द्यायचा विषय निघाला की लोकं एकमेकांच्या श्रेयासाठी भांडून घ्यायचे. त्या त्यांच्या वादात ती योजना तशीच रखडून जायची. भाऊसाहेबांना वाटलं इतक्या दिवसांपासून हा गाव आपली पाठराखण करतोय. आता आपलंही वय झालंय. आता पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन सगळ्या लोकांना एकत्र करून पाणीपुरवठा योजना राबवावी असं ठरवलं. मात्र, लोकंच असे नमुना की एकमेकांचे हेवेदावे काढत एकत्र यायला तयार होईनात. आमच्या हातात द्या म्हणावं आम्ही करून दाखवू म्हणून असे गावात रोज तंटे बखेडे होऊ लागले. योजना रखडली तरी चालेल; परंतु या योजनेच्या पूर्णत्वाचे श्रेय कोण्या पक्षाला मिळू नये याची खबरदारी प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते घेऊ लागले.
एखाद्या पक्षाच्या प्रतिनिधीला पाणीपुरवठा समितीचा प्रमुख करण्याऐवजी भाऊसाहेबांनी गावात येऊन सर्व नागरिकांची ग्रामसभा घेऊन सर्वच पक्षातील प्रमुखांना प्रतिनिधित्व देत पाणीपुरवठा समितीची कार्यकारिणी केली. सगळ्यांना गावच्या भल्यासाठी एकत्र आणलं. सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला.
समितीच्या खात्यावर पैसे जमा होताच गावातील पक्ष प्रमुखांचे भांडण एकदम थांबले. गावकऱ्यांना वाटलं आजवर हे लोकं छोट्याशा कारणावरून जोरदार भांडून घ्यायचे; परंतु आता आपल्या गावच्या नेत्यांना गावच्या विकासासाठी शहाणपण आले. लहान-सहान गोष्टीसाठी सारखं तिरीमिरीवर यायचे प्रसंग थांबले. नेते गावच्या विकासात मश्गुल झाले. कार्यकर्ते जिथल्या तिथे गपगार झाले. गाव किती गुण्यागोविंदाने नांदतोय.. उशिरा का होईना आपल्या गाव पुढाऱ्यांना भाऊसाहेबांमुळे का होईना शहाणपण आलय.
राज्य महामार्गावर गाव आल्याने गावचं खूप महत्त्व वाढलं. अल्पावधीत बाजारपेठ उदयास आली. आजूबाजूच्या जमिनीला भाव आला. व्यापार उदिमाच्या निमित्ताने खेड्यापाड्यातील लोकसुद्धा येथे घरं बांधून राहू लागली. गावची भरभराट झाली. गावच्या लौकिकात भर पडली. केवळ पाण्याचीच काय ती समस्या होती. अलीकडच्या चार वर्षांपासून पाण्याअभावी लोक नाराज होते. मात्र, आता सुमारे पाच कोटी रुपयांची योजना राबवण्यात येत आहे. या वर्षी नसेल तर पुढच्या वर्षी तरी निश्चितच पाणी मिळेल..पाणी घराघरांत जाईल...असे गावकऱ्यांना वाटत होते. एक वर्ष झाले, दोन वर्षे झाले, चार वर्षे झाले, पाच वर्षे झाले, सात वर्षे झाले.. आठ वर्षे झाले...तरीही पाणीपुरवठा योजनेतून बांधण्यात आलेल्या टाक्या कोरड्याठाक... वर्षानुवर्षांपासून त्या तशाच उभ्या होत्या. लोकं पाण्यासाठी वणवण भटकत होते.
मध्ये बरेच वर्षे निघून गेली. एकदा असंच भाऊसाहेब पाटील नरसापूरच्या चौकातून जाताना गाडी थांबवली. भाऊसाहेबांची गाडी बघून बघता बघता चौकात अनेक लोक जमा झाले. लोकांना बघून त्यांनाही आनंद झाला. ते म्हणाले, लोकहो मी काही आता तुमचा लोकप्रतिनिधी राहिलो नाही; परंतु तुम्ही एवढे आजही माझ्यासाठी जमा झालेलं बघून मला खूप आनंद झाला. सगळं काही ठीक आहे ना असं विचारत मी मंजूर केलेली पाणीपुरवठा योजना चांगली चालते ना...? असे विचारले.
गर्दीतील एक जण पुढे येत म्हणाला, साहेब तुम्ही मंजूर केलेली पाणीपुरवठा योजना अजूनही आहे तशीच आहे. मात्र तुम्ही पाणीपुरवठा समितीत जे सदस्य निवडलात त्यांची घरं मात्र चांगली चालू आहेत. तेवढ्याच वाक्यासरशी नरसापूरच्या पाणीपुरवठा योजनेचं पुढं काय झालं असेल हे समजायला भाऊसाहेब ना वेळ लागला नाही.
( patilpradeep495@gmail.com )