‘राष्ट्रवादी’च्या दृष्टीनं औरंगाबाद जिल्हा वाऱ्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 03:41 PM2018-08-25T15:41:20+5:302018-08-25T15:43:07+5:30
विश्लेषण : कोणत्याही पक्षाला नाही इतकं सुसज्ज पक्षाचं कार्यालय हडकोतील राष्ट्रवादी भवन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत आहे; पण तेही आता धूळखात पडून आहे. औरंगाबादबद्दलची अनास्था, एक प्रकारची उदासीनता पक्षाला कुठं घेऊन जाईल, याचे काय बरे-वाईट परिणाम होतील, हे येणारा काळच ठरवेल!
- स.सो. खंडाळकर
केवळ महाराष्ट्रापुरतंच अस्तित्व टिकवून असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता तर औरंगाबादसारखा महत्त्वाचा जिल्हा जणू वाऱ्यावरच सोडून दिलेला दिसतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याच औरंगाबाद शहरात आमखास मैदानावर दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन एस काँग्रेस विसर्जित केली होती. मराठवाडा हा आमचा बालेकिल्ला आहे, असा दावा एकेकाळी शरद पवार आणि मंडळी करीत होती. आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराकडं स्वत: शरद पवार, त्यांचे वारसदार अजित पवार व सुप्रिया सुळे यांचं दुर्लक्ष होत आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
अपेक्षा वाढल्या; पण...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून अपेक्षा वाढल्या होत्या. आता त्यांनी ८१ जणांची प्रदेशची कार्यकारिणी जाहीर केली; पण त्यात औरंगाबाद जिल्ह्याला पुरेसं प्रतिनिधित्व नाही. द्वारकाभाऊ पाथ्रीकर, प्रा. किशोर पाटील, रंगनाथ काळे, सुधाकर सोनवणे, हरिश्चंद्र लघाने पाटील, संजय वाघचौरे यांच्यासारखी ज्येष्ठ व पक्षाचे कार्य केलेली मंडळी असतानाही त्यांच्यापैकी कुणाचीही वर्णी प्रदेश कार्यकारिणीत लावावी असं पक्षाला वाटलेलं दिसत नाही. आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे व आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना मतदारसंघांसाठीच वेळ पुरत नसेल म्हणून त्यांचा विचार झाला नसावा; पण जी मंडळी ज्येष्ठ, अनुभवी आहे, त्यांना काम करण्याची संधी द्यायला हरकत नव्हती.
कसलं फ्रस्ट्रेशन?
औरंगाबाद जिल्हा व शहराकडं बघण्याचा दृष्टिकोनच ‘फेअर’ दिसत नाही. या जिल्ह्यात आपली फारशी शक्ती नाही, इथं जिल्हा परिषद, मनपा आणि नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये आपली फारशी ताकद नाही, या फ्रस्ट्रेशनमधूनही हे दुर्लक्ष वाढतंय की काय, असा प्रश्न सहजच पडतो.
अजितदादा पवार यांनी आपला माणूस म्हणून ज्या विश्वासानं भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घातली होती, त्या पदाला तात्यांनी न्याय दिला, असं कुणीही म्हणणार नाही. उलट मला मतदारसंघाला जास्त वेळ द्यावा लागेल, या सबबीखाली त्यांनी पक्षाच्या कामाकडं दुर्लक्षच केलं. अर्थात, हे त्यांनी सांगून केलं. मग पक्ष नेतृत्वानं इथं तात्काळ पर्याय देण्याची गरज होती. कालच्या मंगळवारी उर्वरित जिल्ह्याच्या अध्यक्षांबरोबर औरंगाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष जाहीर होईल, असं सांगण्यात आलं होतं. उर्वरित जिल्ह्यांचे अध्यक्ष जाहीर झाले; पण औरंगाबाद जिल्हा पुन्हा लटकला. याचा अर्थ काय?
अजितदादांनी मुलाखती घेऊनही...
विलास चव्हाण, रंगनाथ काळे, कैलास पाटील गंगापूरकर, पांडुरंग तांगडे पाटील यासारखी मंडळी पहिल्यापासूनच अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. स्वत: अजितदादा पवार यांनी सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असताना राष्ट्रवादी भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. तरीही काही झाले नाही. आता रंगनाथ काळे यांनी नवे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून स्पष्टपणे सांगितलं होतं की, ‘औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती फार चांगली नाही. तरीही काम करण्याची आमची इच्छा आहे. आपण संधी द्यावी. वारंवार अध्यक्ष करा म्हणून आपल्यासमोर येणं योग्य नाही.’
जणू निवडणुका लांब आहेत
ज्यांना विधानसभा लढवायची आहे, त्यांना अध्यक्षपद नको, या नियमात विलास चव्हाण, संजय वाघचौरे हे बाद होत आहेत. तरीही औरंगाबाद जिल्ह्याचा निर्णय घ्यायला एवढा विलंब का? अजितदादा पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पान हलत नाही, हे खरं मानलं, तर आता परदेश दौऱ्यावरून अजितदादा येईपर्यंत थांबण्याशिवाय गत्यंतर नाही. जणू निवडणुका फार लांब आहेत, अध्यक्ष नेमण्याची घाई कशाला, अशा पद्धतीचंच पक्षाचं वर्तन दिसतंय.
कुठं आहेत संपर्कप्रमुख?
धनंजय मुंडे यांच्यावर औरंगाबाद जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आहे; पण जणू तेही जबाबदारीच विसरून गेले आहेत! बीडला जाण्यासाठी आठवड्यातून कितीतरी वेळा ते औरंगाबादच्या विमानतळावर येत-जात असतील; पण संपर्कप्रमुख म्हणून कसली बैठक नाही की काही नाही? कोणत्याही पक्षाला नाही इतकं सुसज्ज पक्षाचं कार्यालय हडकोतील राष्ट्रवादी भवन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत आहे; पण तेही आता धूळखात पडून आहे. औरंगाबादबद्दलची अनास्था, एक प्रकारची उदासीनता पक्षाला कुठं घेऊन जाईल, याचे काय बरे-वाईट परिणाम होतील, हे येणारा काळच ठरवेल!