नवे गुरू नवे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 07:20 PM2018-02-10T19:20:26+5:302018-02-10T19:20:45+5:30
विनोद : मराठवाडा ही संतांची भूमी आहे हा वादातीत मुद्दा असून, तो सर्वार्थाने सिद्ध झालेला आहे. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांना ‘संसार शिकविणे’ यासाठी केवळ संत मंडळीच कार्यरत असतात असे नाही तर अनेक ‘गुरू’ आपल्याला दैनंदिन आयुष्यात भेटत असतात आणि त्यांच्या पद्धतीने ते ‘धडे’ देत असतात. आयुष्यात कोण कोणता धडा कधी शिकवील याचा नेम नाही. औरंगाबादहून पुण्याला जायचे होते. दुपारची वेळ होती. सुखाला लालचावलेला देह लाल डब्यापेक्षा बसस्थानकाबाहेरून खुणावणार्या लक्झरी गाड्यांकडे ओढ घेत होता. झटपट आणि सुखाचा प्रवास, फालतू थांबे नाहीत की कान पिकविणार्या दारे खिडक्यांचा खड खड आवाज नाही. बाहेर पडलो तो एक लक्झरी सज्जच होती. पाच सात लोक बसलेले होते. बाहेरचा पोर्या ‘पुणे...पुणे’ ओरडत होता.
- आनंद देशपांडे
ड्रायव्हर महोदय स्थानापन्न झालेले होते. मुख्य म्हणजे गाडीच्या इंजिनाचा आवाज ती लगेच निघणार हे सुचवीत होता. मी लगबगीने बाजूच्या हाफिसात जाऊन तिकीट काढून घेतले. गाडीत चढताना त्यांनी त्यातले अर्धे फाडून घेऊन अर्धे मला परत दिले. खिडकीच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसलो. अहाहा काय ते सुख... उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी ऐटीत गॉगल डोळ्यावर चढविला आणि बाजूने जाणार्या लाल डब्यांकडे तुच्छ नजर टाकीत वाहतुकीचा आनंद घेत राहिलो. अर्धा पाऊण तास झाला. गाडी धकायचे (म्हणजे हलायचे) नाव घेईना. ड्रायव्हर महोदय स्थानापन्न होते आणि अधूनमधून गाडीच्या इंजिनाचा आवाज कमी जास्त करीत होते. बराच वेळ वाट पाहून माज्यासोबतचे एक चुलबुल पांडे ओरडले, ‘अरे गाडी काढता का मुक्काम करायचाय इथे?’ मीही आवंढा गिळत थोडेफार डायलॉग मारले. कुणीही काहीही प्रतिसाद दिला नाही.
एव्हानापर्यंत गाडीत तीसेक लोकांची भरती झालेली होती आणि पंधराच्या आसपास सीटा ‘खाली’ होत्या आणि त्या भरण्यासाठी किन्नर महोदय बसस्थानकाभोवती फिरत होते. असंतोष खूप वाढल्यानंतर ड्रायव्हर महोदयांनी पब्लिककडे एक तुच्छ कटाक्ष टाकला आणि एकदाचा गिअर टाकून गाडी सुरू केली. हुश्श करीत आम्ही प्रवासी पण निवांत टेकून बसलो. गाडी निघाली आणि चौकात वळसा घालून परत औरंगाबाद शहराकडे वळाली. परत मिलकॉर्नरला वळसा घालून अवघ्या पाचच मिनिटात पुन्हा पहिल्याच जागेवर येऊन उभी राहिली. परत अर्धा तास त्याच रंगमंचावर पहिलेच नाटक झाले. सगळेच वैतागले होते. मी तावातावात ड्रायव्हरजवळ गेलो आणि म्हणालो, ‘आज एक सबक सिख गया मै भाईसाब.’ ..... ‘क्या?’ असे त्याने विचारल्यानंतर मी म्हणालो, ‘यही, के जिंदगी में कभी तुम्हारी ये लक्झरी की गाडी दिखी तो उसमे बैठने का नही’. यावर अत्यंत प्रसन्न हसत तो म्हणाला, ‘सच्ची बताऊ साब......दुसरी बार कोईच नही बैठता हमारी गाडी में.....हर बार नयेच लोग रहेते...’. ‘इंडिया में बेवकुफोंकी कोई कमी नही है’ असे तो मनातल्या मनात म्हणाला, पण मला स्पष्ट ऐकू आले. मी त्याला गुरू म्हणून वंदन केले आणि नवीन धडा शिकलो की उशिरा जाईन, पडत आदळत जाईन पण यष्टीनेच जाईन.
असाच एकदा सेलू येथे एका धार्मिक कार्यक्रमाला गेलो होतो. वेळ संध्याकाळी पाच वाजताची. पब्लिक फुल होती. मी बाहेर उगाच रेंगाळत होतो. एवढ्यात दुरून एक जीप आली. भगवा फेटा आणि तसाच सदरा (म्हणजे शर्ट) आणि धोतर घातलेले स्वयंघोषित महाराज स्वत:च जीप चालवीत होते आणि एकटेच होते. एक ऐटदार वळण घेऊन जीप माज्यापासून काही अंतरावर थांबली. महाराज उतरले. वय अंदाजे पस्तीस, मजबूत बांधा आणि चेहर्यावर सात्त्विक सोडून सगळे भाव जागृत. त्यांनी इशारा करून मला बोलावून घेतले. माज्या चेहर्यावर एक अंगभूत बावळटपणा आहे असे अनेकांनी बरेचदा आणि गृहस्वामिनीने सातत्याने सांगितलेले आहे. महाराजांनी मला स्वत:विषयी अर्धा तास सांगितले. मी निघतो म्हणालो तरी सोडले नाही. आपला पहिला शिष्य ते माज्यात शोधत होते बहुत्येक. त्यांनी माझा फोन नंबर घेतला. आयुष्यात पहिल्यांदा चुकीचा नंबर दिला. मी तुमच्याकडे नक्की येईन असे ते वारंवार म्हणत होते. मी त्यांना एकदाही या म्हणालो नाही. जाताना त्यांनी मला त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिले. नंतर कार्ड निवांत वाचले. मजकूर असा : सुरुवातीला ठळक अक्षरात त्यांचे नाव होते. हभप श्री अमुक तमुक, फलाणेगावकर आणि पुढे भागवताचार्य, रामायणाचार्य, कीर्तनकार, कुंडली, फलज्योतिष्य, हस्तरेषा, पत्रिका, भविष्य, विवाह, संततीयोग, आणि नंतर तीन मोबाईल नंबर दिलेले होते. सविस्तर पत्ता होता आणि सर्वात शेवटी, ठळक अक्षरात ‘टाटा सुमो किरायाने मिळेल’ असे लिहिलेले होते.संतांची भूमी आहे ही महाराजा. असा चौफेर गुरू मिळणे नाही. भेटणार आहे आणि शिकणार आहे नवीन धडे, धडाधड लवकरच.
(anandg47@gmail.com)