विद्यार्थी, कार्यकर्त्यांचे ‘डोळे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 06:52 PM2018-02-01T18:52:44+5:302018-02-01T19:01:51+5:30
प्रासंगिक : उदगीर येथील डोळे सरांनी घडविलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी यंदापासून (२०१८) डॉ. ना. य. डोळे स्मृतिपुरस्कार देण्याचे ठरविले आहे. मुंबईचे शिक्षक आ. कपिल पाटील यांना पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते रविवार, दि. २८ जानेवारी २०१८ रोजी हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्यानिमित्ताने मराठवाड्याचे कृतिशील विचारवंत समाजवादी विचारांचे पाईक आणि बहुजन, उपेक्षितांचे ‘डोळे’ असणाºया डॉ. ना. य. डोळे यांच्या कार्याचा परिचय..
- नजीर शेख
खरेच डॉ. ना. य. डोळे हे बहुजन आणि उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे ‘डोळे’ होते. बहुजन उपेक्षित समाजाची कणव असल्याची भाषा करणे, त्यासंबंधीचे भाषण ठोकणे, त्याबाबतची कारणमीमांसा करणे, तसा आव आणणे,असे अनेकांना जमले आणि आजही जमत आहे. या सर्वांना डॉ. ना. य. डोळे हे अपवाद होते. आपल्या वागण्या-बोलण्यातून आणि देहबोलीतून माणूस कसा आहे, हे सिद्ध होत असते. डॉ. ना. य. डोळे सरांचे वागणे आणि देहबोली ही सतत गरीब, उपेक्षित वर्गासाठी असल्याचे जाणवत राहायचे. उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयांत ग्रामीण भागातून आलेल्या गरीब आणि बहुजन वर्गातील विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी त्यांनी केलेले प्रयोग सर्वपरिचित आहेतच. हे प्रयोग काही एकाएकी होत नसतात. त्यासाठी या मुलांच्या गरिबीची, उपेक्षितपणाची जाणीव असणे गरजेचे होते. तशी जाणीव डोळे सरांना होतीच. या उपेक्षिततेतून विद्यार्थी बाहेर आणण्याची त्यांची सतत धडपड असायची. त्यासाठी त्यांना कामी आली त्यांची निरीक्षणक्षमता. या निरीक्षणातून त्यांनी जे टिपले त्यातूनच विद्यार्थ्यांसाठी नवनवे प्रयोग केले. त्यांच्या या धडपडीतून जे विद्यार्थी घडले त्यांनीच त्यांच्या नावाने स्मृती पुरस्काराची सुरुवात केली आहे. ही योजना करणारे कोण आहेत, याची माहिती घेतल्यास अजित शिंदे, दिलीप वाघमारे, अंकुश गायकवाड, पुरुषोत्तम भांगे, शर्मिष्ठा भोसले, रवींद्र हसरगुंडे, प्रमोद राजूरकर, श्रीशैल्य बिराजदार ही नावे दिसतात. म्हणूनच विद्यार्थ्यांचे आणि विविध जाती-धर्मातील कार्यकर्त्यांचे ते खर्या अर्थाने ‘डोळे’ सर ठरले. डोळे सर कोण होते, हे आजच्या पंचविशीच्या आतील तरुणांना फारसे माहीत असेलच, असे नाही. समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या सूचनेनुसार डॉ. नारायण यशवंत ऊर्फ ना. य. डोळे सर पुण्याहून उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आले. हजारो विद्यार्थी त्यांनी घडविले. डोळे सरांचा विद्यार्थी असा अभिमान बाळगणारे आजही अनेकजण मराठवाड्यात आहेत, इतके ते मराठवाड्याशी एकरूप झाले.
राष्ट्र सेवा दलाचे संस्कार घेऊन डोळे सर उदगीरला आले. समाजवादी विचारांची पायाभरणी करण्याचे काम त्यांनी या परिसरात केले. छात्रभारतीचे ते संस्थापक सल्लागार होते. छात्रभारतीच्या माध्यमातून तरुणांचे मोहोळ त्यांच्याभोवती जमा झाले. ते अखेरपर्यंत त्यांच्यासोबत राहिले. १० आॅक्टोबर २००१ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी डोळे सरांचे उदगीर येथे हृदयविकाराने निधन झाले. प्राचार्यपदाच्या निवृत्तीनंतरची काही वर्षे ते खूपच फिरले. उदगीर ते पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव, धुळे किंवा अगदी कोकणापर्यंत ते बसनेच फिरायचे. अनेक कार्यकर्ते त्यांना हक्काने बोलवायचे. त्यांनी स्वत:च्या प्रकृतीची तशी काळजी घेतली नाही.
कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक मित्र...
उदगीरला डोळे सरांच्या घरी जाण्याचा एकदा प्रसंग आला. सायंकाळी पाच वाजताची वेळ होती. आम्ही दहा ते बाराजण विद्यार्थी होतो. घरी आपुलकीने स्वागत तर झालेच्; परंतु आम्हाला आम्ही काहीतरी खाऊन गेले पाहिजे, असा सरांचा आग्रह राहिला. पोहे, भजी, चहा- बिस्किट असे पदार्थ तातडीने उपलब्ध झाले. मनसोक्त खा, म्हणाले. हे सांगण्याचे कारण विद्यार्थी किंवा कार्यकर्ता त्यांच्याकडे अगदी मुक्तपणे जाऊ शकत होता. कार्यकर्त्यांच्या अनेक पत्रांना ते स्वत: उत्तर देत. डाव्या चळवळीतले विद्यार्थी त्यांना अनेकविध प्रश्न विचारणारी पत्रे लिहित. त्यांना डोळे सरांकडून योग्य उत्तर मिळण्याची अपेक्षा असे, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक मित्र होते.
डोळे सरांच्या अभ्यासाचा आवाकाही प्रचंड होता. उदगीरच्या सामान्य घरातील विद्यार्थ्यांची समस्या जशी त्यांना ठाऊक होती, तशाच पद्धतीने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रश्नांचीही त्यांना जाण होती. त्यामुळेच १९९१ साली काश्मीर समस्येबाबत उपाययोजना करण्याबाबत त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली, ‘इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटिकल विकली’सह अनेक ठिकाणी लिखाणही केले. ते त्यांनी उदगीरला बसून केले का? त्याचे उत्तर नाही, असे आहे. काश्मीर प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी १५ ते २० दिवसांचा दौराही केला. त्यांच्या समवेत असणार्या पथकाने काश्मीरमधील लोकांशी संवाद साधला. समस्या समजून घेऊन त्यावर उपाय सुचविण्याचा त्यांचा स्वभाव होता. म्हणूनच डोळे सर, विद्वान असूनही पुस्तकी कधीच वाटले नाहीत.
डोळे सर कुशाग्र बुद्धीचे होते. पल्लेदार वाक्ये किंवा विशेषणांनी भरपूर असलेली त्यांची संवादशैली नव्हती. व्याख्यानांत मृदू भाषेत ते बोलत असले तरी अचूक आणि दुसर्याला पटकन समजेल, अशी त्यांची पद्धत होती. विविध कार्यशाळांमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करताना खर्या अर्थाने ते संवाद साधत. झापडबंद कार्यकर्त्यांचे डोळे उघडण्याचे काम त्यांनी केले. विशेष करून धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत ते बारकाईने समजावून सांगत.
धर्मनिरपेक्षतेचे त्यांचे विवेचन हे ढोबळ नसे. समाजात धर्मनिरपेक्षता अंगी रुजली पाहिजे, यासाठी ते प्रचंड आग्रही होतेच; परंतु त्याचे कठोर पालनही डोळे सरांच्या अंगी दिसे. जात-धर्माचे जोखड अनेक पुरोगाम्यांनाही टाकून देता आले नाही. जाती धर्माचा अविर्भाव किंवा अहंभाव कधी ना कधी त्यांच्या लिखाणातून, बोलण्यातून, कृतीतून किंवा घरातील वातावरणातून दिसून आलाच. या सर्वांना डोळे सर अपवाद ठरले, असे ठामपणे सांगावेसे वाटते.
डोळे सरांचे अनुयायीच
डॉ. ना. य. डोळे पहिला स्मृतिपुरस्कार ज्या आ. कपिल पाटील यांना दिला जात आहे. ते तर डोळे सरांचे अनुयायीच. आ. पाटील हेही समाजवादी विचारांचे प्रवाही. मंडल आयोग किंवा बहुजनांच्या प्रश्नांवरून समाजवादी विचारसरणीच्या अनेक ज्येष्ठ अभिजनांशी आ. कपिल पाटील यांचा विवाद झाला. मात्र, डोळे सरांना आ. पाटील यांनी नेहमीच सन्मान दिला. त्यामुळेच पहिल्या पुरस्कारासाठी आ. पाटील यांची निवडही सार्थ म्हणावी लागेल.
( snazir101@gmail.com )