पाणचक्की स्थापत्य अभियांत्रिकीचा आदर्श नमुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 06:03 PM2018-09-15T18:03:25+5:302018-09-15T18:05:15+5:30
तब्बल १७ व्या शतकात सायफन पद्धतीद्वारे उभारण्यात आलेली पाणचक्की आजही मोठ्या दिमाखात उभी आहे.
- विजय सरवदे
अलीकडे २१ व्या शतकात गगनचुंबी इमारती, रस्ते, पाणीपुरवठ्याच्या अभिनव योजना, तलाव अशा अनेक क्षेत्रात स्थापत्य अभियांत्रिकीचे मोठे योगदान राहिले आहे; परंतु जेव्हा कोणतेही विज्ञान नव्हते, स्थापत्य अभियांत्रिकीचा उगम झालेला नव्हता, कोणताही शोध लागलेला नव्हता किंवा कशाचा आधार घेऊन एखादी कृती करावी, असे ज्ञानही उपलब्ध नव्हते, अशा काळात औरंगाबादसारख्या ठिकाणी तब्बल ६-७ किलोमीटर अंतरावरून गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे आणलेल्या पाण्यावर विद्युतनिर्मिती करणे किंवा धान्य दळण्यासाठी चक्की चालविणे, हे आजच्या स्थापत्य अभियांत्रिकीला दिलेले आव्हानच म्हणावे! तब्बल १७ व्या शतकात सायफन पद्धतीद्वारे उभारण्यात आलेली पाणचक्की हा त्याचाच आदर्श नमुना आजही मोठ्या दिमाखात उभी आहे.
औरंगाबादेत येणारे यात्रेकरू, भक्तगण आणि सैन्यदलांना विद्युत व्यवस्था व्हावी, धान्य दळण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी सतराव्या शतकात पाणचक्की तयार करण्यात आली. सूफी संत हजरत शाह मुसाफीर यांनी सायफन पद्धतीद्वारे पाणचक्की उभारण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादच्या उत्तरेला जटवाड्याच्या डोंगरात ३० फूट खोल खोदल्यानंतर तेथे पाण्याचे मोठ्या प्रमाणात झरे लागले. झऱ्यांचे पाणी एकत्रितपणे गुरुत्वाकर्षण पद्धतीचा वापर करून ते पाणी ६ किलोमीटर अंतरावरून आणण्यात आले. यासाठी भूमिगत मातीच्या पाईपद्वारे (नहरद्वारे) पाणी आणण्याची योजना यशस्वी झाली.
मध्ययुगीन काळात औरंगाबाद शहराने भारतात मोठे योगदान दिले. या शहरात औरंगजेबाचे वास्तव्य होते. त्याचे अखेरचे जीवनही याच शहरालगत गेले. औरंगाबादेत बीबी का मकबरा तयार करण्यात आला. औरंगजेब सूफी संत हजरत शाह बाबा यांचा फार आदर करीत असे. संत हजरत शाह बाबा हे रशियातील गज्दबान (बुखारा) येथून औरंगाबादेत आले व येथेच स्थायिक झाले. त्यांचे येणारे भक्तगण व यात्रेकरूंच्या भोजन व्यवस्थेसाठी पाणचक्कीच्या माध्यमातून दळण दळले जात असे. मध्ययुगीन भारतीय वास्तुकलेचा पाणचक्की ही आदर्श नमुना मानली जाते.
नहरच्या माध्यमातून आणले जाणारे पाणी गुरुत्वाकर्षण पद्धतीद्वारे २० फूट उंच भिंतीवर चढविले जायचे. त्या पाण्याचा प्रवाह उंचावरून लोखंडी पंख्यावर सोडला जायचा व त्या माध्यमातून वीज तयार केली जायची. याशिवाय धान्य दळण्यासाठी याच पद्धतीने जाते चालविले जायचे. उरलेले पाणी वाया न जाऊ देता ते खाम नदीच्या पात्रात सोडले जात असे. आजही ते आपणास पाहावयास मिळते. जेव्हा कुठलेही विज्ञान अस्तित्वात नव्हते, त्या काळात तयार करण्यात आलेली ही पाणचक्की आजच्या स्थापत्य अभियांत्रिकीसमोर एक ‘मॉडेल’ म्हणून उभी आहे.