खांब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 07:51 PM2018-08-18T19:51:43+5:302018-08-18T19:53:55+5:30
लघुकथा : सावित्री पुढून येताना म्हणाली, ‘माय सुजाता काही तुह्या खात्यावर एक लाख रुपये जमा व्हणार.’ काई खरं न्हाई बाई लबाडाचं जेवण जेवल्याबिगर खरं न्हाई.
- महेश मोरे
आभाळ भरू लागलं. पाणी काही पडत नव्हतं. आठ दिसाखालीच दिलेली सोयाबीनची पाळी साधली होती. निंदण, खुरपण, बेगिन झालं होतं. पहिले दोन-तीन पाणी मोठं पडले होते. त्याच्यामुळे सोयाबीन पीक कसं वट्यानी बसलं होतं. आज मातर लई कळकू लागलं. पाऊस पडत नसल्याने पिकाची वाढ खुंटली होती.
सोयाबीनचे पुंजाने भरताना सुजाताच्या अंगातून टप टप घाम गळत होता. कष्ट कष्ट तरी किती करावं. हर साल नापिकीचं येऊ लागलं. सुजाताचं असं झालं होतं दैव गांडू अन् कोणाला भांडू. सुजाता घरात सगळ्यात मोठी. तिला दोन बहिणी एक भाऊ. ती पाचवीत असतानाच तिची माय देवाघरी गेली. बापानं जमीन विकून विकून एक एकर ठेवली होती. आॅटो अपघातात लंगडा झाला होता.
सगळ्या कामाचा बोजा सुजातावरच पडला होता. तिची पाचवीला असतानाच शाळा बंद झाली होती. तिच्या मनात शिक्षणाची आवड होती. तिला सर्व पाठ्यपुस्तकातील कविता पाठ होत्या. आता तिचं शिक्षण बंद झालं होतं. बापानं तिचं लग्न केलं. तिला नवरा कष्टाळू भेटला होता. आता दोघं बी नवरा-बायको शेतात राबत होती. पणिक कितीबी कष्ट करा पदरात काहीच पडत नव्हतं.
सावित्री पुढून येताना म्हणाली, ‘माय सुजाता काही तुह्या खात्यावर एक लाख रुपये जमा व्हणार.’ काई खरं न्हाई बाई लबाडाचं जेवण जेवल्याबिगर खरं न्हाई. ‘तव्हा तर हासू-हासू बटन दाबलं की माय आता काय झालं अन् लईच भूषाण सांगत व्हतीस लबाडाचं.’
‘कोठंय जा माय पळसाला पानं तीनच.’
‘आये एखादा देठ सापडतो पाच पानाचा.’
‘जाऊ दे माय आवडीनं केला पती त्याला झाली रगतपिती.’
सावित्री डोक्यावर टोपलं घेऊन निघून गेली.
सुजाताला जाता येता तिच्या शिक्षिका नरवाडे मॅडमची भेट होत होती. नरवाडे मॅडम तिला सारखा सल्ला देत होत्या. बचतगटात सहभागी हो. शिवणक्लास लाव, चल शहरात तुला काम मिळवून देते. सुताचा एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. तिचा गावातून जीव काही निघत नव्हता. लग्न झालं तरी नवारा बायको तिच्या बापाच्या सेवेत होती. नरवाडे मॅडमला तिचं दु:ख पाहवत नव्हतं. सुजातानं मॅडमचा सल्ला तिचा नवरा दीपकला सांगितला. त्याला तो सल्ला पटला.
सुजातानं बापाची जमीन शेजाऱ्याला अर्धालीन लावून टाकली. तिनं शहराची वाट धरली होती. दीपकने हातगाड्यावर टी सेंटर सुरू केलं. सुजाता मिळेल ती कामं करू लागली. दोघांच्या कमाईतून पैसा जमू लागला. सुजातानं लहान बहिणीचं लग्न करून टाकलं. भावाला शिकवू लागली. बापाच्या दुखण्याला पैसा जाऊ लागला. आता ती बचतगटात रमली होती. चार पैसे तिच्या हाती पडत होते. मोडकळीस गेलेला संसार सुजाताने सावरला होता. तिने जिद्दीनं हे सर्व उभं केलं होतं. सुजाता घराचा खांब बनली होती.
( maheshmore1969@gmail.com )