विद्यापीठाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराचे कवित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 04:03 PM2018-08-28T16:03:46+5:302018-08-28T16:04:21+5:30
विश्लेषण : एवढे होऊनही विद्यापीठ प्रशासन आपण ग्लोबल विचाराचे असल्याचे स्पष्ट करीत आम्ही केलेली कृती योग्य आहे, असे ठासून सांगेल. याचे विशेष कौतुक वाटते. जे आपले कामच नाही, त्यावर आपण पैसा, वेळ आणि शक्ती खर्च का करतो, याचाही विचार होत नाही.
- राम शिनगारे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ६० व्या वर्धापन दिनी आठ महनीय व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले. गौरविलेल्या प्रत्येक व्यक्तीचे त्यांच्या क्षेत्रात मोठे योगदान आहे. मात्र यातील दोन व्यक्ती सोडता इतर महनीय व्यक्तींच्या कार्याचे कार्यक्षेत्र मराठवाड्यातील नाही. मराठवाडा, विद्यापीठाच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव वर्धापन दिनी करणे उचित होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे वास्तव विचार करायला लावणारे आहे.
विद्यापीठाच्या कायद्यात सुरुवातीलाच विद्यापीठांचे कार्य स्पष्ट केले आहे. या कार्यावरच अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र आपल्याकडे त्या कार्यापेक्षा इतर गोष्टींवरच अधिक लक्ष दिले जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन हे विषय पूर्णपणे बाजूला पडलेले आहेत. मागील दोन वर्षांपासून संशोधनासाठीची प्रक्रिया ठप्प आहे. विद्यापीठातील काही विभाग विद्यार्थी नसल्यामुळे ओस पडत आहेत. प्रवेश घेण्यास कोणी येत नाही. त्याकडे लक्ष देण्याऐवजी पुतळा, स्मारक, बांधकाम, पुरस्कारातच प्रशासन मशगुल असल्याचे दिसते. २३ आॅगस्ट रोजी विद्यापीठाचा ६० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यात तब्बल आठ व्यक्तींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात आणखी एका व्यक्तीची भर पडणार होती. मात्र जलतज्ज्ञ असलेल्या त्या व्यक्तीने विद्यापीठाचा पुरस्कार वेळ नसल्याचे कारण सांगून नाकारला. यामुळे ही संख्या आठवर आली. यातच आणखी काही नावांची भर घालण्याची मागणी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थी संघटनांचे नेते, पदाधिकारी करीत होते.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव करण्याची परंपरा विद्यापीठाने सुरू केली. यात मराठवाड्यातील व्यक्तींचा सन्मान केला जातो. त्यावर कोणी कधी आक्षेप घेतला नाही. उलट कौतुकच केले. मात्र नुकत्याच दिलेल्या जीवनगौरव पुरस्कारांची चर्चा अद्यापही सुरू आहे. यात ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे आणि सरपंच भास्करराव पेरे वगळता इतर सर्वजण मराठवाड्याच्या बाहेरील आहेत. विद्यापीठाच्या विकासात या व्यक्तींचे योगदान किती? हा संशोधनाचा भाग आहे. विद्यापीठ, मराठवाड्याच्या विकासासाठी जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तींची मराठवाड्यात कमतरता नाही. विद्यापीठाच्या नामांतराची पहिली मागणी करणारे शिक्षणतज्ज्ञ एम. ए. वाहूळ, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत, डॉ. सुधीर रसाळ, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगाकर, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, नाटककार अजित दळवी, प्रसिद्ध कवी भास्कर चंदनशिव, सामाजिक कार्यकर्ते शांताराम पंदेरे, जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे, अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा अशी शेकडो नावे समोर येतील. या व्यक्तींना जीवनगौरव दिला असता तर मराठवाड्यातील प्रत्येकाला अभिमानच वाटला असता. परंतु ज्या व्यक्तींना पद्मश्रीसारखे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना पुन्हा विद्यापीठाने जीवनगौरव देण्यात कोणते औचित्य, हे प्रशासनच जाणो.
एका सन्मानित वक्त्याने कार्यक्रमातील मनोगतात सांगितले की, एका ठिकाणी कुलगुरूंच्या समोर एका विषयावर सादरीकरण करीत होतो. तेव्हा त्याठिकाणी आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते. त्यांना सादरीकरण आवडले. त्यानंतर हा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. अशा पद्धतीने व्यक्तींची निवड झाली हे कार्यक्रमातच समोर आले. आणखी एकाने आपल्या विद्यापीठाशी संलग्न बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील महाविद्यालयात प्रचंड कॉपी चालते, ती बंद करण्याची जाहीर विनंतीच कार्यक्रमात केली. यावरून गुणवत्तापूर्ण शिक्षणाशिवाय इतर गोष्टींकडे अधिक लक्ष दिल्यास अशा गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. याचाही अनुभव यातून आला.
एवढे होऊनही विद्यापीठ प्रशासन आपण ग्लोबल विचाराचे असल्याचे स्पष्ट करीत आम्ही केलेली कृती योग्य आहे, असे ठासून सांगेल. याचे विशेष कौतुक वाटते. जे आपले कामच नाही, त्यावर आपण पैसा, वेळ आणि शक्ती खर्च का करतो, याचाही विचार होत नाही. मात्र कॉपीसारख्या प्रकरणावरून सन्मानित करणारी व्यक्तीच जेव्हा व्यवस्थेचे वाभाडे काढते तेव्हा तरी यातून धडा घेतला पाहिजे. मात्र सद्य:स्थिती पाहता ही अपेक्षाही व्यर्थच असल्याचा प्रत्यय येतो.
ता.क. - विद्यापीठ वर्धापन दिनी व्यासपीठावर बसणे आणि बॅनर, पत्रिकांवर नावे टाकण्यावरून सत्ताधारी पक्षाशी संबंधित विद्यापीठ विकास मंचमध्ये सुरू झालेल्या कुरघोडीच्या राजकारणावरून विद्यापीठाचा गाडा रुळावर न येण्याचीच नांदी असल्याचे दिसून आले.