भविष्यवाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 07:12 PM2018-04-16T19:12:29+5:302018-04-16T19:13:41+5:30
विनोद : ‘जोडीदाराशी मतभेद’ हे तर वैश्विक भविष्य सर्व विवाहित व्यक्तींसाठी २४७ म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेव्हन गुणिले वर्षातील तीनशे पासष्ट दिवस शंभर टक्के खरे होण्याची खात्री असते.
- आनंद देशपांडे
सकाळचा पेपर उघडला की, उत्तर कोरियाचा किम जोंग काय म्हणाला किंवा आपल्या देशाची कशी नेत्रदीपक प्रगती सुरूआहे याकडे लक्ष न देता थेट, ‘आजचा दिवस कसा जाईल’ अर्थात आपले आजचे भविष्य काय आहे ते वाचणारे पुष्कळ आहेत. त्यामुळेच रोज सकाळी टीव्हीवर पण बरेचसे आडवे किंवा उभे गंध लावलेले ज्योतिषीबाबा किंवा बाब्या अत्यंत उत्साहाने तुमचे आमचे भविष्य सांगून स्वत:चे भविष्य उज्ज्वल करून घेत असतात. भविष्याविषयी उत्सुकता हा फार पुरातन असा विषय असून, त्यात काही वावगे आहे असे वाटत नाही. पतीच्या भविष्यात ‘अनावश्यक खर्च टाळा’ असे असणे आणि त्याच दिवशी त्याच्या पत्नीच्या भविष्यात, ‘मनसोक्त खरेदी कराल’ असे अचूक टायमिंग ज्याला जमले तो खरा दैनंदिन भविष्यकार म्हणावयास हरकत नाही.
बाकी सामान्य माणसाच्या भविष्यात ‘मनस्ताप टाळा’, ‘संततीपासून त्रास संभवतो’, ‘साहेबाकडून संताप अपेक्षित’, ‘जवळच्या व्यक्तीकडून अपमान होईल’ हे असे भविष्य कुणी वेगळे सांगायची गरज नाही. ‘जोडीदाराशी मतभेद’ हे तर वैश्विक भविष्य सर्व विवाहित व्यक्तींसाठी २४७ म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेव्हन गुणिले वर्षातील तीनशे पासष्ट दिवस शंभर टक्के खरे होण्याची खात्री असते. क्वचित कधी, ‘सुखद वार्ता मिळेल’ असे असेल त्यादिवशी किमान ज्याच्यासाठी हे भाकीत असेल तो तरी आलेला प्रत्येक फोन उत्साहाने उचलीत असतो. ‘अचानक धनलाभ’ किंवा ‘जुनी येणी वसूल होतील’ असे अडाखे कुणा व्यक्तीच्या बाबतीत खरे ठरले तर असे लोक ‘भाग्यवान’ या प्रतवारीत म्हणजे सोप्या मराठीत भाग्यवान या कॅटेगिरीत असतात. ‘मनावर ताबा ठेवा’ हे देशातील प्रत्येकासाठी आवश्यक आहे. ‘बोलण्यावर नियंत्रण ठेवा’ हा भविष्यावर आधारित सल्ला प्रत्येकाने ऐकला तर बरेचसे सामाजिक प्रश्न सुटण्यास मदतच होईल. ‘जिभेवर ताबा ठेवा’ हे ऐकले तर आमच्यासारख्या खाद्यप्रेमींचे वजन आटोक्यात राहून आरोग्य चांगले राहू शकते. म्हणजे हे वृत्तपत्रीय भविष्यकार एक प्रकारे सामाजिक कार्य करीत आहेत, असे आपल्या लक्षात येईल.
आपल्या देशाचा आनंदी देशांमध्ये जगात एकशे बाविसावा क्रमांक आहे. हे अगदी नैसर्गिक आहे आणि याला कारणीभूत शनी महाराज आहेत. नियमितपणे तीन राशींना ज्या देशात साडेसाती सुरू असते म्हणजे ज्या देशातील पंचवीस टक्के जनता साडेसातीने ग्रस्त आणि त्रस्त असते त्या देशाचा ‘प्पिनेस इंडेक्स वाढणार कसा हा मोठाच प्रश्न आहे. पृथ्वीतलावरील जनता एकूण बारा राशींमध्ये विभागली गेली आहे, याचा अर्थ एकूण लोकसंख्येपैकी प्रत्येक राशीचे आठ पूर्णांक तेहतीस टक्के लोक असतात. म्हणजे समजा एखाद्या राशीला ‘आज चिडचिड होईल’ असे भविष्य वर्तविलेले असेल, तर किमान त्या राशीच्या आठ पूर्णांक तेहतीस टक्के लोकांची त्या दिवशी चिडचिड होईल. समजा तुमच्या पत्नीची काही एक रास आहे आणि पेपरात आलेले तिचे आजचे भविष्य ‘चिडचिड होईल’ असे असेल आणि त्याच दिवशी तुमच्या राशीचे म्हणजे तुमचे भविष्य, ‘दिवस सुखात जाईल’ असे असेल तर दोन्हीपैकी एक निश्चितच चुकीचे ठरणार आहे.
मराठी माणूस एकंदरीतच कुटुंबवत्सल असल्यामुळे त्याचा दिवस कसा जाईल हे त्याची रास नव्हे, तर त्याच्या घरातील लोकांची रास ठरवीत असते. वडील वृषभ, आई वृश्चिक, पत्नी कन्या आणि आम्ही स्वत: कागदी का होईना पण सिंह (अस्सल मराठी लोकांनी शिंव्ह असे वाचावे ) राशींचे आहोत. या सर्वांचा दिवस कसा जाईल यावर आमचा दिवस कसा जाणार आहे हे ठरणार असते. उत्सुकता म्हणजे आगाऊ कारभार हा मराठी माणसाचा अंगभूत गुण आहे. शेवटी हे दररोजचे भविष्य नेमके लिहिते तरी कोण याचा शोध घेण्यासाठी आम्ही स्थानिक वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली तेव्हा तेथील डीटीपी आॅपरेटर साहेबांनी उत्तर दिले, ‘मीच लिहीत असतो, दररोज इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे टाकतो’. आपले भविष्य ठरविणाऱ्या त्या महान व्यक्तीला प्रणाम करून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी आमच्या राशीत लिहिले होते, ‘आगाऊ चौकशी अंगलट येऊ शकते’.
( anandg47@gmail.com)