कूर्म-यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 04:44 PM2018-08-11T16:44:55+5:302018-08-11T16:46:02+5:30
विनोद : मी अत्यंत कूर्मगतीने खिशातून बाराशे काढून त्याच्या हातावर ठेवले. अत्यंत जड अंत:करणाने मी आणि उल्हासित मूडमध्ये धर्मपत्नी तळहातावरील त्या कासवाकडे स्वत:च्या मुलाकडे पाहावे त्या ममतेने पाहत आणि ‘माझी फार दिवसांची इच्छा होती,पण योग यावा लागतो’ असे म्हणत त्या मंदिरातून बाहेर पडलो.
- आनंद देशपांडे
मोठे तीर्थक्षेत्र असणाऱ्या परराज्यातील शहरात आपले नजीकचे नातेवाईक बदली वगैरे होऊन गेले असतील, तर त्यांच्या वास्तव्य काळात आपण दर्शन घेऊन मोकळे व्हायचे असते. बहीण व दाजी भुवनेश्वर, ओडिशा येथे वास्तव्यास आहेत. अर्थात आमचे कोणार्क, पुरी इत्यादी पाहण्यासाठी जाण्याचे ठरले. कोणत्याही मंदिरात जाताना ‘येथील पुजारी फार पैसे काढतात आणि ते कितीही काहीही म्हणाले तरी त्यांना पैसे देऊ नका’ असे आमच्या बहिणीने वारंवार बजावले होते. सबब मी वरच्या खिशात मात्र पन्नासच्या दोन नोटा आणि आपल्या खास मराठवाडी वॉच पाकिटात दोनेक हजार बाळगून होतो. (हे वॉच पाकीट म्हणजे प्यांटीला शिवलेला छुपा खिसा असतो आणि यात ठेवलेले पैसे आपल्या पोट नावाच्या अवयवाच्या कायम संपर्कात असतात. हे भाग्य रेडिमेड कपडे वापरणारांच्या नशिबी नाही).
चार धामांपैकी एक असणाऱ्या जगन्नाथपुरी येथील मंदिरामध्ये असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरात मुख्य मंदिराशिवाय इतर अनेक मंदिरे आहेत. यात प्रामुख्याने श्रीगणेश, मां लक्ष्मी आणि सरस्वती तसेच इतर लहान मोठी मंदिरे आहेत. तेथील प्रचंड गर्दीत मुख्य मंदिरात दर्शन घेऊन आम्ही म्हणजे मी आणि सौ असे दोघेही शांतपणे प्रत्येक मंदिरात जाऊन दर्शन घेत ‘असू द्या थोडे जास्तीचे पुण्य गाठीला, वेळ आहे प्रसंग आहे’ या भावनेने दर्शन घेत फिरत होतो. लक्ष्मी आणि सरस्वती मंदिरे शेजारी शेजारी होती, म्हणजे जगन्नाथ कृपेने दोन्ही देवता किमान इथेतरी एकाच ठिकाणी नांदताना दिसत होत्या.
तुलनेने कमी गर्दी असणाऱ्या सरस्वती मातेचे मनोभावे दर्शन घेऊन आम्ही प्रचंड गर्दी असणाऱ्या लक्ष्मी मंदिराकडे मोर्चा वळवला. मंदिरात प्रवेश केला तेव्हा कुठेही रांग नावाचा प्रकार नव्हता आणि अंदाजे पाचेकशे भाविक रेटारेटी करीत देवीदर्शन करीत होते. आम्हीही सावकाश पुढे सरकत देवीसमोर आलो. सौ ने भक्तिभावाने डोळे मिटून दर्शन घेतले तेव्हा ‘माते तूच काहीतरी चमत्कार कर, ‘या’ माणसाच्याने काही धन येईल असे आता वाटत नाही’ असे काहीसे भाव तिच्या चेहऱ्यावर मला वाचता आले. आम्ही जोडीने दर्शन घेऊन निघणार एवढ्यात देवीच्या बाजूला उभा असणाऱ्या पुजाऱ्याने खणखणीत आवाज दिला,‘एक मिनिट रुक जावो बेहेनजी’ आणि असे म्हणून आम्हाला गर्दीपासून थोडे दूर नेऊन उभे केले.
नंतर त्याने देवीच्या पायापाशी असणारी काहीतरी छोटीशी वस्तू काढली आणि रूमाला एवढ्या भगव्या कपड्यात गुंडाळून स्वत:च्या तळव्यावर ठेवून तो सौ समोर धरून म्हणाला, ‘ये लेके जावो, धन की बरसात होगी’ आणि असे म्हणून त्याने तो कपडा बाजूला केला. त्याच्या हातात आता एक चकाकणारे आणि लंगड्या बाळकृष्णाचा आकार असतो असे एक पितळी कासव होते. ते पाहताच सर्वात आधी मी वॉच पाकीट गच्च धरून ठेवले. ‘इतने पांचसो लोग है यहां, सिर्फ आपको दे रहा हुं और वो भी सिर्फ दो हजारमे’ असे म्हणून ते त्याने सौच्या हातावर ठेवले. ‘नही, हमें नही चाहिये’ असे म्हणत ती माझ्याकडे पाहू लागली.
गच्च धरलेल्या वॉच पाकिटावरचा हात न काढता मी तिला म्हणालो, ‘देऊन टाक ते परत, नकोय आपल्याला’. किंचित रागावल्याचा अभिनय करीत ‘सिर्फ आपको दे रहा हुं बेहेनजी वो भी इतनी सारी भिडमे, सिर्फ आपको..मां आपपर क्रिपा करणा चाहती है, आपको नही चाहिये तो लाईये इधर’ असे म्हणून त्याने ते कासव परत घेतले आणि ‘ठीक है देड हजारमे देता हुं’ असे म्हणून ते परत समोर धरले. मी अत्यंत दीनवाण्या चेहऱ्याने एकदा सौकडे, एकदा त्या पुजाऱ्याकडे, एकदा त्या कासवाकडे आणि एकदा लक्ष्मी मातेकडे पाहत होतो.
त्या पुजाऱ्याने मला एकदाही कासव घेण्याचा आग्रह का केला नसेल यावर मी नंतर चिंतन केले. माझ्या ढोबळ देहाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याने याच्याकडे पैसे आहेत हे ओळखले होते आणि पत्नीच्या तेजस्वी चेहऱ्यावरील अलौकिक आत्मविश्वास आणि माझ्या चेहऱ्यावरील अंगभूत बावळटपणा पाहून ‘हा’ माणूस पत्नीच्या ऐकण्यात आहे हे त्याने ओळखले होते. दरम्यान सौचा काही एक निर्धार झाला आणि तिने मला, ‘यांना एक हजार देऊन टाका’ असा आदेश दिला. त्यावर त्या चाणाक्ष पुजाऱ्याने, ‘हजारमे तो नही होगा, कम से कम बारासो दो और ये कूर्म-यंत्र लेके जावो’ असे म्हणत ते यंत्र तिच्या हातावर पुन्हा ठेवले. सौने मला देऊन टाका अशी खूण केली.
मी अत्यंत कूर्मगतीने खिशातून बाराशे काढून त्याच्या हातावर ठेवले. अत्यंत जड अंत:करणाने मी आणि उल्हासित मूडमध्ये धर्मपत्नी तळहातावरील त्या कासवाकडे स्वत:च्या मुलाकडे पाहावे त्या ममतेने पाहत आणि ‘माझी फार दिवसांची इच्छा होती,पण योग यावा लागतो’ असे म्हणत त्या मंदिरातून बाहेर पडलो. गावी परतल्यानंतर रीतसर पूजा करून त्या कासवाची शुक्रवारी प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याच दिवशी हिची बीसी लागली. फोन आला, ‘बघा, कासवाने चमत्कार दाखवायला सुरुवात केली. दर वेळेला माझी बीसी शेवटी लागते या वेळेला दुसऱ्याच महिन्यात लागली. पहिल्या महिन्यात जाधव वहिनींची लागली, का ते माहीत आहे का? जाधव वहिनींनी तर जिवंत कासव ठेवलाय बागेत मोठा हौद बांधून. मी काय म्हणते....‘फोन कट झाला आणि माझा हात वॉच पाकिटाकडे न जाता थेट छातीकडे गेला.
( anandg47@gmail.com)