पाऊस : तुझा नि माझा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 07:34 PM2018-06-23T19:34:17+5:302018-06-23T19:34:50+5:30
ललित : कुठूनसे हळूच येतो एक ढग... टपोरा थेंब तळहातावर घेऊन. तृर्षात कणाला आसुसून बिलगतो फक्त एक थेंब... कोवळं थंड वारं झुळूक घेऊन येतं नि पसरत जातो त्या थेंबाच्या मिठीतल्या ओल्या मातीचा गंध सर्वत्र.
- ज्योती कदम
शुष्कतेच्या खाणाखुणा मिरवत शुष्क होत जाणारा भोवताल... जिथे तिथे फक्त गर्द करडा रंग शुष्कतेत भर घालणारा... कोंडून गेलेले श्वास नि वाफाळलेला शुकशुकाट. जिवाची काहिली पार व्यापून राहते जगण्याच्या जाणिवेच्या आसपास अन् नेणिवांना मात्र पडत राहतात हिरवीगार स्वप्नं... मोरपिशी रंगछटा ल्यायलेली. श्वास कितीही रोखून धरला तरी आतल्या धगीचं बाष्पीभवन मात्र होतंच नाही. करड्या रंगाचं टणक आवरण फोडून बाहेर पडू पाहतात लवलवती हिरवी स्वप्नं; पण रानझळा पसरत राहतात रानभर... हळूहळू मनातही! उष्ण तप्त लाह्या फटफटत राहतात... माती दुभंगत राहते नि खोलवर शोधू पाहते स्वत:च्याच आतली ओल! पण पानं चरचरत राहतात पावलांखाली... गरगरत राहते उष्णाळलेली हवा पानांभोवती गोलगोल... वेटोळत राहतं मन उगा निरर्थकपणे भूतकाळाभोवती... चिमूटभर सावलीसाठी हंबरून येतं मन.
कुठूनसे हळूच येतो एक ढग... टपोरा थेंब तळहातावर घेऊन. तृर्षात कणाला आसुसून बिलगतो फक्त एक थेंब... कोवळं थंड वारं झुळूक घेऊन येतं नि पसरत जातो त्या थेंबाच्या मिठीतल्या ओल्या मातीचा गंध सर्वत्र. पाऊसवार्ता घेऊन भिरभिरत उडू लागतात फुलपाखरं... तडकलेल्या शेंगांसकट गळून पडतं वाळलेलं पान नि पानं... बिया रुजत जातात त्याच भुईत परत उगवून येण्यासाठी... जिथे तिथे हिरव्यागार अंकुरांची गर्दी... ओळखी-पाळखीचे तर काही अनोळखी अंकुर डौलाने फडकवू पाहतात हिरवी पताका चिंब भिजल्या भुईवर... सगळी काहिली अंतर्धान पावते... मातीच्याच उदरात. सृजनाचा नवोन्मेष उगवून येतो तिच्या कणाकणात. पाऊस म्हणजे सृजनोत्सवाचा ओला आरंभबिंदू... मातीला फुटत जातात धुमारे नि लेखणीला पडत राहतात स्वप्नं नितनव्या आविष्कारांची.
मनाची काहिली संपवणारा ऋतू येणारच असतो; पण याची ग्वाही देतो तो हा पाऊस! मनाला अधिकाधिक निर्भय करीत सचैल न्हावून टाकतो तो हा पाऊस. ही अनादी ओढ पावसाची कित्येक शतकांनी जपलेली... कित्येक संस्कृती आल्या नि गेल्या. इतिहास बदलत गेला काळासोबत; पण पावसाची ही ऊर्जादायी ओढ तशीच्या तशी कायम चिंब होत ओलावत राहिली मनाला! ‘पावसाने पावसाला काय द्यावे सांग जरा’असं विचारलं तर काहीच सुचलं नाही तुला... पण आता सांगू का ‘पावसाने पावसाला काय द्यावे सांग जरा, एक ओली मिठी नि अंगी ओला शहारा’ खरंय ना! मनाचा पाऊस-पाऊस करू पाहणाऱ्यांनी काय द्यावं एकमेकांना? फक्त पाऊसच द्यावा... अंतर्मनात दाटून आलेला... करुणेच्या आर्त स्वरांनी भारावलेल्या व्हायोलिनसारखा!
भला मोठा स्तब्ध क्षणांचा अवकाश नि डोक्यावरच्या पत्र्यावर पडणाऱ्या पावसाचा धीरगंभीर आवाज! बस्स बाकी काहीच नको... स्वत: स्वत:त हरवून जाण्यासाठी... पावसात असं हरवलं ना की सापडूच वाटत नाही परत कुणालाच. बस्स चातकमनाने झेलत राहाव्यात चिंब पाऊसधारा... सृष्टीच्या रूपात इतकं विरघळत जावं स्वत:चं अस्तित्व जशी साखर विरघळते पाण्यात. गोड चव तेवढी शिल्लक राहावी या जगणं नावाच्या अजब रसायनाची! तुझ्या-माझ्या समरूप अवस्थेनंतरही प्रश्न पडत राहतो मला की, जगण्याचं समसमान रसायन आपल्या दोघांत ठासून भरलेलं आहे तर मग टीचभर जी फरकाची जाणीव आहे ती नेमकी कोणती बरं असावी? सतत छळणाऱ्या या प्रश्नाचं उत्तरही पावसानंच दिलं... आपण दोघेही पाऊस असलो तरी... ‘तू रे पाऊस अवकाळी, मी मृगाची नव्हाळी...’ हे ते उत्तर. मला गवसलेलं... दोघेही पाऊसच; पण जगण्याला भिडण्याच्या त-हाच निराळ्या!
( Jyotikadam07@rediffmail.com )