राष्ट्रकुटांचे ‘स्मार्ट’नगर कंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 07:52 PM2018-07-14T19:52:47+5:302018-07-14T19:54:50+5:30

बुकशेल्फ :   ‘किल्ले कंधार व राष्ट्रकुटकालीन शिल्पवैभव’ या विषयावर संशोधन करून, कंधारचे स्थानिक महत्त्व आणि तिथे बहरलेल्या एका वैभवशाली संस्कृतीवर पुन्हा नव्याने प्रकाश टाकला. संस्कृतीचे अनेक पदर असतात. ते समजून घेताना विशेषत: गतकाळातील संस्कृतीचा मागोवा घेताना, भौतिक साधनांची गरज असते, नाणी, अभिलेख, वास्तू, मूर्तिशिल्पे, स्मारके यांच्या आधाराने संस्कृतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा संशोधनात्मक आढावा लेखकाने या पुस्तकात मांडला आहे. 

Rashtrakutas 'smart' city Kandhar | राष्ट्रकुटांचे ‘स्मार्ट’नगर कंधार

राष्ट्रकुटांचे ‘स्मार्ट’नगर कंधार

googlenewsNext

- धनलक्ष्मी म. टिळे
नागरी जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध नगररचना, स्वच्छ पर्यावरण, सुव्यवस्थित परिवहन यांची आवश्कता असते. निश्चितच ही काळाची गरज आहे; पण अशाच अनेक समृद्ध नगरांच्या पाऊलखुणा आपल्याला इतिहासात डोकावताना सापडतात. त्या प्राचीन नगरांपैकी एक ‘स्मार्ट’नगर म्हणजे नांदेड जिल्ह्यातील कंधार. डॉ. अरुणचंद्र शं. पाठकलिखित ‘किल्ले कंधार व राष्ट्रकुटकालीन शिल्पवैभव’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ग्रंथाने कंधार येथील शिल्पे, अवशेष आणि स्मारके यांच्या आधारे प्राचीन वैभव समोर आले आहे. 

‘किल्ले कंधार व राष्ट्रकुटकालीन शिल्पवैभव’ या विषयावर संशोधन करून, कंधारचे स्थानिक महत्त्व आणि तिथे बहरलेल्या एका वैभवशाली संस्कृतीवर पुन्हा नव्याने प्रकाश टाकला. संस्कृतीचे अनेक पदर असतात. ते समजून घेताना विशेषत: गतकाळातील संस्कृतीचा मागोवा घेताना, भौतिक साधनांची गरज असते, नाणी, अभिलेख, वास्तू, मूर्तिशिल्पे, स्मारके यांच्या आधाराने संस्कृतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा संशोधनात्मक आढावा लेखकाने या पुस्तकात मांडला आहे. महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासात कंधारचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कंधार एक नगर म्हणून आणि प्रामुख्याने राष्ट्रकुट या राजवंशाचे लष्करी केंद्र म्हणून विकसित झाले होते. भूगर्भशास्त्र आणि त्याआधारे भौगोलिक स्थित्यंतरे याची माहिती पहिल्या प्रकरणामध्ये संकलित केली आहे.

या परिसरात नांदलेल्या अनेक राजवटी, त्यांची ऐतिहासिक कारकीर्द, कंधारच्या वैभवसंपन्नतेची छबी आपल्यासमोर उभी करतात, विशेषत: राष्ट्रकुट वंशीय राजघराण्याचा काळ, हा कंधारचा सुवर्ण काळ ठरला. राष्ट्रकुटांच्या महत्त्वाकांक्षी राजसत्तेत कंधारला (उप) राजधानीचा दर्जा प्राप्त झाला होता. राष्ट्रकुट राजघराण्यानंतरही कंधार हे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. अभिलेखातून मिळणाऱ्या अशा अनेक संदर्भांमुळे, दुसऱ्या प्रकरणात कंधारचे ऐतिहासिक महत्त्व समजते. 

कंधारचा किल्ला, त्या किल्ल्याचे स्थापत्य, वास्तुशैली यांचा विस्तृत आढावा हा तिसऱ्या प्रकरणात घेतला आहे. मण्यार नदीच्या सान्निध्यात कंधार हा किल्ला बांधलेला आहे. चारही बाजूंनी असलेल्या उंच टेकड्या, वनराई यामुळे हा किल्ला अगदी जवळ जाईपर्यंत दिसत नाही. या किल्ल्याचे हेच वैशिष्ट्य सुरक्षितेतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले होते, असे दिसते. कंधारच्या नगररचनेचा विस्तृत लेखाजोखा चौथ्या प्रकरणामध्ये घेतला आहे. राष्ट्रकुट राजा कृष्ण तीन याने ही नगररचना, करताना, उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता लोकांसाठी अनेक प्रप्पा म्हणजे पाणपोया बांधल्या. हिवाळ्यात थंडीपासून बचाव व्हावा यासाठी सार्वजनिक अग्निष्टिका म्हणजे शेकोट्या तयार केल्या.

याशिवाय जगत्तुंगसमुद्र नावाचा जलाशय, राजप्रासाद, कामदेवाचे मंदिर, क्षेत्रपालाचे मंदिर, सर्वलोकाश्रय मंडप, अशा अनेक वास्तूंनी संपन्न असलेले हे नगर वसलेले होते, असे दिसते.मूर्ती अवशेषांच्या रूपाने या भागातील झालेली धर्माची वाटचाल या पुस्तकाच्या पाचव्या प्रकरणात समजते. प्रामुख्याने हिंदू-देवी-देवता, जैन तीर्थकरांच्या प्रतिमा, बौद्ध प्रतिमांच्या आधारे तत्कालीन समाजातील धर्मांचे आणि प्रचलित पंथांचे विवरण यात आहे. महाराष्ट्रातील शैव संप्रदाय, सूर्यपूजक, गाणपत्य संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, शाक्त पंथ यांचाही उल्लेख त्या अनुषंगाने बघायला मिळतो. जैन दिगंबर पंथाचे प्रस्थ येथे सापडलेल्या मूर्तिआधारे लेखकाने मांडले आहे. काही बौद्ध अभिलेखित मूर्तींची उपलब्धी या पुस्तकात दिली आहे. एकूणच मध्ययुगीन महाराष्ट्रातील धार्मिक अनुष्ठाने, व्रतवैकल्ये, पंथांच्या उपासना यांची परंपरा या प्रकरणातून जाणून घेता येते. कंधारच्या वास्तू, स्मारके यावरून समृद्ध नगराची ओळख आपल्याला होतेच; पण येथील शिल्पवैभवामुळे हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे झाले आहे. या पुस्तकाला चार परिशिष्टे जोडली आहेत. छायाचित्रांची मांडणी पद्धतशीर केल्याने ग्रंथ आकर्षक बनला आहे.
 

Web Title: Rashtrakutas 'smart' city Kandhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.