‘वंचितांचे वास्तव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 07:04 PM2018-01-08T19:04:12+5:302018-01-08T19:06:33+5:30
वर्तमान : पाहता पाहता या शतकातली सतरा वर्षे संपली. देश महासत्ता होण्याचे कलामांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी अवघी तीन वर्षे शिल्लक उरली. अर्थात, आता हे दिवा स्वप्न वाटत असले तरी देशाच्या भवितव्यासाठी प्रेरक होते; परंतु त्याच्या पूर्तीसाठी पडणारी पावले शिस्तबद्ध हवी होती. अवाढव्य लोकसंख्या आणि विविधता देशाचा स्थायिभाव असला तरी देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आजही पोषक वातावरण आहे. कारण हा देश तरुणांचा आहे हा एकमेव आशावाद अजून जिवंत आहे. मात्र, अडथळा येथे एकच, या तरुणांची ऊर्जा देशाच्या उभारणीसाठी वापरणारे आश्वासक राजकीय ‘हात’ देशात दिसत नाहीत. हे आजचे कटुसत्य म्हणून परिस्थिती विपरीत आहे. राजकीय स्वार्थासाठी तरुणांच्या शक्तीचे झुंडीत रूपांतर करून त्यांच्या हातात दगड देऊन आमच्या याच शक्तीला एकमेकांच्या विरोधात लढवून ‘शक्तिपात’ केला जात असेल, तर या देशाचे उद्याचे भवितव्य काय असेल? हे सांगायला कुणाची गरज उरत नाही!
- गणेश मोहिते
महानगरांतील झोपड्यांत आणि खेड्यांत आजही किड्या-मुंग्यांसारखी जगतात माणसे. रेशनच्या रांगेत देशाचे भवितव्य ठळक दिसते दारिद्र्यरेषेखाली बारमाही. लोकसंख्येच्या अर्ध्या समूहाच्या वाट्याला पोटाची खळगी भरण्याची भ्रांत कायमचीच. स्वातंत्र्याचा प्रकाश असंख्य तांडे, वाड्या, वस्त्यांवर पोहोचला नाही अद्यापही. मोफत वाय-फायच्या वल्गना एकीकडे, तर दुसरीकडे फक्त शिक्षणाच्या सक्तीची भाषा. ही सक्ती केली काय? अन् मोफत दिले काय? मुळात अंग झाकायला कपडाच नसेल, तर शाळेच्या चार भिंतीआत जाऊन उघडेनागडे बसायचे तरी कसे, हा प्रश्न सतावत असतो गोरगरिबांच्या लेकरांना. पोटाचाच पीळ सुटत नाही म्हणून छोटी-छोटी हॉटेल, वीटभट्ट्या, गॅरेजेस, खदानी, शेतात राबताना सर्रास दिसतो उद्याचा ‘कोवळा’ भारत.
रानावनांत, जंगलांत, झोपड्यांत आदिवासी पाड्यांवर, गावकुसाच्या वाड्यांवर फाटकाच असतो प्रपंच गरिबांचा. यात लेकरांना शाळेत टाकायचे कसे? ही विवंचना नित्याचीच. म्हणूनच असंख्य लेकरांना ओढता आली नाही कधी शाळेच्या पाटीवर पांढरी रेघ. आजही मजल, दरमजल करीत भटकत असतात ‘पालं’ या गावाची त्या गावाला पाठीवर ‘पोट’ घेऊन महासत्ता होण्यास निघालेल्या देशात. तहहयात दारिद्र्य पाचवीला घेऊन आयुष्याची गुजराण करणार्या भटक्या आयुष्याची मुशाफिरी सत्तर वर्षांतही थांबवू शकले नाही हे स्वातंत्र्य. शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाडी, भंगारवाले, लोखंडवाले, दगडमातीवाले, मोहल्ल्यातले, झोपड्यांतले, रस्त्यांतले, वस्त्यांतले, जंगलांतले याच देशाचे नागरिक. त्यांचाही असतो एक चेहरा काळवंडलेला; जो कधीच दिसत नाही दिल्लीच्या लाल किल्यावरून १५ आॅगस्ट रोजी नाना वल्गना करताना. आजही महानगरातील असंख्य वस्त्यांमधून, रेल्वे रुळांच्या आजूबाजूला दाटीवाटीने कुरतडत राहते भणंग आयुष्य माणसांना अन्न, वस्र, निवारा या मूलभूत गरजांच्याच गराड्यात. तिथे नसते जात, धर्म, पंथ, प्रांत आणि भाषा ‘पोट’ भरताना. मात्र, भरलेल्या पोटात सामावलेला असतो एक अख्खा देश. त्यात असतो प्रत्येकाला एक एक धर्म, जात-पात, पंथ, प्रांत आणखी बरेच काही. तिथेच निवडणुकीच्या हंगामात बोकाळतात लोकशाहीवर व्यवहाराचे ‘काळे’ घोडे.
लोकशाहीलाच उभे केले जाते बाजारात, तिचीच लागते बोली, ठरतो भाव आणि स्वस्तात विकत घेतल्या जातात भणंग वस्त्या चने, फुटाणे आणि बाटल्यांवर. जमलेच नाही एवढ्यात तर ऐन हंगामात इतिहासाच्या पानांवरची धूळ झटकून घातली जाते साद अस्मितांना. माणसांच्या कळपांना केल्या जाते जायबंदी असल्या हुकमी ‘चाली’ खेळत. जाती, धर्मांचा ‘कोलदांडा’ घालून सोडली जातात माणसे ‘रंग’ पाहूनच समूहात. चाली, प्रतिचाली, मोर्चे, आंदोलने, निर्देशनांसाठी ‘जात’वार पेटवली ‘आग’ की, माणसे विसरतात तहानभूक; हे जुनेच गणित आखत असते व्यवस्था वारंवार. असल्या ‘बेइमान’ उजेडात एक ‘वात’ जपून नेण्याचे आवाहन असते मित्रांनो; पण याचेच उरले नाही भान गिधाडांच्या टोळ्यांना. डोक्यात भुसा अन् हातात दगड, गोटे घेऊन बोंबलत सुटतो आम्ही निरपराधांच्या वस्त्यांकडे. पुन्हा कोणत्या रंगाचा झेंडा घेऊन धावली फौज त्यावर ठरते हिंस्रता. पांढर्या बगळ्यांचा असतो वरदहस्त चेहरा नसलेल्या गर्दीला. जुने-पुराणे असतात हिशोब त्यांचे, होतात चुकते गर्दी आडून.
ज्या हातात असावी पाटी-पेन्सिल ते हात आवळतात मुठी आणि होतात झुंडीत सामील तेव्हा ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव’ ही फोल ठरते प्रतिज्ञा. कपाळावरचा गंध, डोक्यावरची टोपी, गळ्यातला रुमाल, वाढलेली दाढी, घरावरचा झेंडा ठरवत असतो आमचे अमुक तमुक असणे. ‘शिळा’ होऊन पडलेल्या पुराणातल्या देवीच्या सैन्यासारखे समाज नुसता पाहतो तुकड्या-तुकड्यांत ‘विलग’ होत जाणारे आपले अस्तित्व. कारण प्रश्न ‘बेगडी’ अस्मितांचे बसलेत वर्तमानाच्या मानगुटीवर, संपलेत सत्तर साल आझादीचे; पण रुजली नाही समता-बंधुता.‘मानवता’ शिकवणारी व्यवस्था कायमच घातली थडग्यात धर्ममार्तंडांनी. तेव्हाच मावळत गेली तिळातिळाने रोज आमची एकमेकांविषयीची आस्था, म्हणून संपत नाही शिमगा दुश्मनांचा. रस्त्यावर उतरलेल्या जथ्यांच्या डोक्यात असतात इतिहासात नसलेले अभद्र विषाणू. ते टोकरतात एक एक मेंदू, तसे इकडे ‘हातं’ उचलात दगड-गोटे आणि भिरकवत असतात ‘रोबोट’ बनून. त्यांचा रिमोट असतो कोसो दूर कुठल्या तरी धर्मग्रंथाच्या पानावर निश्चित पहुडलेला. कोणाच्या तरी जिभेवर आग ओकत, कोणाच्या मेंदूत ध्रुवीकरणाचा डाव खेळत, रचत जातो पत्त्यांचा डाव तो. एक्का, दुर्री, तिर्री करीत केले जातात असंख्य तरुण मेंदू ‘गुलाम’ संमोहाने; सोडली जाते बीनभांडवली विषाणूची पैदास; पिढ्यान्पिढ्या त्यांची वंशावळ चालत राहावी म्हणून.
...म्हणून भावांनो
वेळीच ओळखा या विषाणूंचा ज्वर. नसता या बेगडी अस्मिता अन् आतबट्ट्याच्या व्यवहारात खपतील अजून कैक पिढ्या. इतिहासाची पाने चाळून नसतो चालत संसार. काळाचे भान ठेवूनच करावे लागते ‘वर्तन’व घ्यावा लागतो भविष्यवेध हे तुम्हाला आताशा कळायलाच हवे...!
dr.gamohite@gmail.com