दुष्काळवाड्यात बिअरविक्रीचा विक्रम

By गजानन दिवाण | Published: May 29, 2018 03:16 PM2018-05-29T15:16:32+5:302018-05-29T15:18:03+5:30

दुष्काळी प्रदेश म्हणून सर्वदूर प्रसिद्धी असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गटागटा पाणी पिणारा ऊस आपल्या शेतात घ्यावासा वाटतो आणि उद्योजकांना दुष्काळवाड्याच्या राजधानीत बिअर कारखाने उभारावेसे वाटतात.

Record of beer production in drought affected marathwada | दुष्काळवाड्यात बिअरविक्रीचा विक्रम

दुष्काळवाड्यात बिअरविक्रीचा विक्रम

googlenewsNext

- गजानन दिवाण

पिण्याच्या पाण्याची मारामार तिथे सिंचनक्षेत्र काय पाहायचे? कोरडवाहू आणि अल्पभूधारकांचा प्रदेश म्हणून आपली ओळख. मराठवाड्याची ही स्थिती कोणापासून लपून राहिलेली नाही. जायकवाडी धरणात पुरेसे पाणी असतानाही सध्या औरंगाबादकरांना पाच-पाच दिवस पाणी मिळत नाही. प्रशासकीय दरिद्री म्हणा वा राजकारण्यांचे हिंतसंबंध. त्यातही कडी म्हणजे सर्वसामान्यांनाही त्याचे फारसे काही वाटत नाही. कचऱ्याचा प्रश्न १०० दिवसांपासून मिटला नाही. जायकडवाडीत पाणी असूनही ते शहरात मिळत नाही. तरी औरंगाबादकर कसे तर,  ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान’. शहरातील नागरिकांच्या या समाधानी वृत्तीला तोड नाही. 

दुष्काळी प्रदेश म्हणून सर्वदूर प्रसिद्धी असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गटागटा पाणी पिणारा ऊस आपल्या शेतात घ्यावासा वाटतो आणि उद्योजकांना दुष्काळवाड्याच्या राजधानीत बिअर कारखाने उभारावेसे वाटतात. या मानसिकतेतच सर्वकाही आले. एक लीटर बिअर बनविण्यासाठी साधारण दीडशे ते दोनशे लीटर पाणी लागते. बिअर बनविणाऱ्या अशा सहा कंपन्या या राजधानीत आहेत. यातील एक कंपनी सध्या बंद आहे. याशिवाय विदेशी मद्यनिर्मीतीच्या चार आणि देशी दारूच्या दोन कंपन्या आहे. या कंपन्यांनी औरंगाबादच्या उत्पादन शुल्क विभागाला मार्च २०१८ अखेर तब्बल ३६४३ कोटींचा महसूल मिळवून दिला आहे. अशी कामगिरी करणारा औरंगाबाद हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला. म्हणजेच मद्यविक्रीत आम्ही मुंबई-पुण्यालाही मागे टाकले आहे. महसूल मिळवून देण्यात पुणे नंबर दोनवर आहे. 

आश्चर्य म्हणजे मद्यविक्रीत महाराष्ट्रात नंबर वन असलेला जिल्हा पाणीटंचाईतही नंबर वन आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पाणीटंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. सुमारे दहा लाख नागरिकांची तहान सध्या टँकरवर भागत आहे. औरंगाबाद शहरालगतच्या ६० गावांमध्ये १००च्या आसपास टँकर सुरू आहेत. जिल्ह्यातील एकुण टँकरची संख्या सहाशेच्या घरात आहे. एकीकडे जायकवाडीत पाणी असताना शहरात मात्र टंचाई आहे. औरंगाबाद महापालिका जायकवाडी धरणातून दररोज १५९ एमएलडी पाणी उपसते. यातील २० टक्के पाण्याची गळती होते, हे गृहीत धरले तरी १३९ एमएलडी पाणी शहरात दररोज येते. म्हणजेच  १४ कोटी लिटर पाणी रोज शहरात येते. १६ लाख लोकसंख्या गृहीत धरली तर प्रत्येक नागरिकाला रोज ३५० लीटर पाणी मिळायला हवे. प्रत्यक्षात शहरातील कुठल्याच भागात एवढे पाणी मिळत नाही. मग हे पाणी मुरते कुठे? पालिका प्रशासन गंभीर नाही. राजकारण्यांना देणेघेणे नाही आणि सर्वसमान्यांनाही त्याचे काही पडले नाही. 

मराठवाड्यातील पर्जन्यमान किती, इथल्या पावसाचा पॅटर्न काय याचा नव्याने अभ्यास करण्याची गरज नाही. आपल्या आजोबा-पणजोबांनी तो आधीच करून ठेवला आहे. म्हणूनच त्यांनी उसाच्या पिकाचे स्वप्न कधी पाहिले नाही. करडी, सूर्यफूल हे आपले पारंपरिक पीक. ते सोडून आपण सोयाबीनचा हात धरला आणि आता थोडे पाणी दिसू लागताच उसाची शेती जवळ केली. ती कशी परवडेल? एक एकर उसासाठी जवळपास दीड कोटी लिटर पाणी लागते. एक लाख टन साखर उत्पादनासाठी ८.८८ टीएमसी पाणी खर्च होते. प्रति माणसी रोज पाण्याची ८० लिटर गरज गृहीत धरली, तर महाराष्ट्रातील लोकसंख्येला २१ दिवस पुरेल एवढे पाणी या एक लाख टन साखरेसाठी लागते. हे सारे ठाऊक असताना मराठवाड्यात यंदा साखर गाळप आणि उत्पादनात तब्बल दहा पटींहून अधिक वाढ झाली. २०१४-१७ च्या दुष्काळानंतर २०१६-१७ मध्ये नांदेड विभागात केवळ ०.९३ लाख हेक्टर ऊस लागवड झाली. यंदा तर तब्बल ५६.५४ टक्क्यांनी वाढ होत २.१४ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली. एवढ्या मोठ्या क्षेत्रावरील उसाला पाणी द्यायचे कोठून? 

मराठवाड्यात पश्चिम महामहाराष्ट्रासारखा धो-धो पाऊस होत नाही. त्यामुळे इथे भरपूर पाणी मिळतच नाही. सुदैवाने चांगला पाऊस झाला आणि ‘जलयुक्त’सारख्या विविध माध्यमांतून तो जागीच अडवला-जिरवला गेला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतोच, सिंचनालाही अडचण येत नाही. पण आमची मानसिकताच वेगळी. एकतर टँकरच्या पाण्यावर तहान भागवितानाही आम्हाला जड जात नाही. त्याचवेळी पाणी दिसले रे दिसले की उसाचे पीक घ्यायलाही आम्ही मागे पुढे पाहत नाही. शहरात प्यायला पुरेसे पाणी नाही मिळाले तरी चालेल, बिअरचे उद्योग थाटायला आम्हाला काहीच वाटत नाही. 

आता प्रश्न उरतो, दुष्काळवाडा म्हणून ओळख असताना उसाचे क्षेत्र वाढले, बिअरविक्रीचा उच्चांक मिळाला याचा आनंद साजरा करायचा की उसावर-बिअरवर अशी पाण्याची उधळपट्टी केली याचे दु:ख? सेलिबे्रशन असो वा दु:ख ते व्यक्त करण्याची सोयदेखील आम्ही निर्माण केली आहेच की. मग काय, चिअर्स !

Web Title: Record of beer production in drought affected marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.