जिंदगी वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:36 PM2018-06-16T18:36:13+5:302018-06-16T18:37:00+5:30
अनिवार : भंगार गोळा करणाऱ्या ४० मुलांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलंय. किती तरी निराधार बेघर मनोरोग्यांना मानसिक, आर्थिक बळ देत समाजसेवी संस्थांपर्यंत पोहोचवलंय. रक्ताच्या थेंबातून माणुसकीचा प्रवाह वाहता व्हावा म्हणून ‘दो बुंद देश के नाम’ म्हणत, अनेक रक्तदान शिबिरे घेत रक्तदात्यांची फळी निर्माण केली आहे.
- प्रिया धारूरकर
अश्विनीशी बोलायचं, तिचं अंतरंग जाणून घ्यायचं म्हणून मी उत्सुकतेनं फोन केला. तर तिचाही तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद, ताई मी अगदी खरं खरं बोलू ना? तिच्या या निरागस प्रश्नानं आमच्यातलं वातावरण एकदमच सहज झालं. जुन्या एखाद्या मैत्रिणीची अचानक गाठ पडावी आणि मनाचे पदर तिच्यासमोर सैलसर व्हावेत तसे ती बोलत गेली.
अश्विनी घर-संसार, मुलं सांभाळते तर तिचे यजमान दादासाहेब थिटे अंबडला प्राथमिक शिक्षक आहेत आणि विश्वाचा संसार सांभाळण्यात सतत व्यग्र आणि मग्नही आहेत. ‘भान हरवलेल्या समाजात समाजभान जागृत करून मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं जीवनकार्य व जीवनध्येय खांद्यावर घेऊन राष्ट्रनिर्मितीस कांकणभर हातभार लागावा’ या अपेक्षेनी निमित्तमात्र होत कितीतरी जिवांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचं अखंड व्रत पेलवतायेत. ती म्हणाली हे खूप चांगलं सामाजिक काम करीत आहेत. भंगार गोळा करणाऱ्या ४० मुलांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलंय. किती तरी निराधार बेघर मनोरोग्यांना मानसिक, आर्थिक बळ देत समाजसेवी संस्थांपर्यंत पोहोचवलंय. रक्ताच्या थेंबातून माणुसकीचा प्रवाह वाहता व्हावा म्हणून ‘दो बुंद देश के नाम’ म्हणत, अनेक रक्तदान शिबिरे घेत रक्तदात्यांची फळी निर्माण केली आहे. सामाजिक वनीकरणाला हातभार लागावा म्हणून वृक्ष लागवड, संवर्धन करीत असतात.
एकदा शाळेची वेळ संपली की ते फक्त गरजूंच्या हाकेसाठी म्हणूनच असतात. कोणाचा तरी मदतीसाठी फोन येतो तसे हे वेळेचं काळाचं कोणतंही भान न ठेवता धावत असतात. रात्री बेरात्री काहीतरी लिहीत नाहीतर विचार करीत बसलेले असतात. जगाच्या कल्याणाच्या ध्यासानं पछाडलेल्या यांचा मला अभिमान वाटतो, पण जीवनातील अनिश्चितताही कधी कधी भिववते. कारण आमची कोणती संस्था नाही किंवा सरकारी अनुदानातूनही कोणते उपक्रम राबवले जात नाहीत तर हे स्वत:च्या पगारातूनच सारे खर्च करीत असतात. कधी कधी तर कर्जही काढतात. घरात काय आहे, नाही याकडे तर त्यांचं फारसं लक्ष नसतंच.
आमचीही पहिली आणि तिसरीत शिकणारी दोन मुलं आहेत. अशा वेळी मला खूप टेन्शन येतं कसं होणार? वाद, भांडणदेखील होतं, पण सासरे समजूत घालतात, अगं तो एवढी माणुसकी जोपासतोय तुला कधीच कमी पडणार नाही. बघ, त्याच्या चांगल्या कामामुळे पीक किती भरघोस आलंय. तेव्हा पटतं. लक्षात येतं. वंचितांच्या आयुष्यात दिवाळीची पहाट फुलवणाऱ्या यांच्या जीवनातला नंदादीप मला व्हायचं आहे. पण तरीही ताई परिस्थिती येते तेव्हा सगळं शहाणपण गळून पडतंच ना हो. वाटतं यांनी आता थांबावं. पण अशी काही घटना घडते आणि माझं मन बदलतं. असंच तीन वर्षांपूर्वी भर दिवाळीत आम्ही घरात गोडधोड खात असताना एक भिकारी मुलगा मात्र भिकेत मिळालेले शिळे विटके अन्न खातोय हे बघून त्यांनी लगेच या मुलांसाठी, ‘एक दिवा पेटवूया, चला दिवाळी साजरी करू या’ हा उपक्रम सुरू केला. माझंही द्रवलेलं मन पुन्हा यांच्याबरोबर चालू लागलं.
दहा वर्षांपूर्वी आपल्याच क्षणभंगुर सुखाच्या मागे लागून पदरी पडलेल्या दु:खाच्या नैराश्याने ग्रासलेल्या मानसिकतेतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या, स्वत:ला करंटं समजणाऱ्या दादासाहेब थिटे या तरुणाची झोपडपट्टीच्या शाळेत नियुक्ती झाली आणि तिथे जगण्यासाठीचं अभावातलं जिणं, जगण्यासाठी चाललेला अव्याहत संघर्ष पाहिला तशी वैश्विक दु:खाशी नाळ जोडली गेली आणि स्वत:च्या दु:खाची तीव्रता नाहीशी झाली आणि त्यातूनच जगण्याचं भान तर आलंच पण समाजभानदेखील जागृत झालं आणि ‘जिंदगी वसूल’ करणारं असं काहीतरी कार्य आपल्या हातून झालं पाहिजे या अंतर्मनात तेवत्या जाणिवेनं बालमित्र आणि इतर अनेक क्षेत्रातील मित्र बरोबर घेऊन ‘मैत्रेय प्रतिष्ठान’ नावाची चळवळ उभी राहिली.
त्यातून २५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, भंगार गोळा करणारी व भीक मागणारी मिळून एकूण ८० मुलं, ८ बालकामगार, २२ दुर्धर आजाराने ग्रस्त मुले, अशा १३५ मुलांचं पालकत्व दादासाहेबांनी स्वीकारलं आहे. त्याशिवाय बेरोजगारीचे प्रश्न, एचआयव्हीग्रस्त, महिलांविषयक प्रश्न, वाचन चळवळ, त्याचबरोबर ग्रामीण भागातील तरुणांना करिअर मार्गदर्शन करणे. ‘स्वच्छता ही शुरूवात का संकल्प है’ म्हणत गटार साफ करण्यापासून व्यसनमुक्तीपर्यंत अनेक उपक्रम राबविले जातात. विस्ताराने कौतुकमिश्रित स्वरात अश्विनी सांगत होती, त्यांच्या श्वासाश्वासात देश, समाज, गरजू, वंचित नांदत असतात. कविता लिहितात, व्याख्यान देतात. पण कधीतरी आम्हालाही त्यांनी वेळ द्यावा ही माफक अपेक्षा असते माझी, माझं काही चुकतंय का सांगाना ताई. तिच्या प्रामाणिक इच्छा ती सांगत होती.
ताई यांनी कधी बचतसुद्धा केलेली नाहीये. प्रसंगी रात्री रात्री झोप पण येत नाही. अगदी खरंय तिचेही कारण पीठ मीठ करत संसार स्त्रियांनाच सांभाळायचा, निभावायचा असतो. पण पुढे लगेच ती म्हणाली, काही क्षणात मळभ निघून जावं तसा माझ्याही विचाराचा निचरा होतो आणि मी यांच्या कार्यापुढे नतमस्तक होते. यांचे काम व्हायरल झाल्यापासून त्यांची जबाबदारी वाढत चालली आहे. त्यामुळे मीही त्यांच्या कार्यात इथून पुढे मदत करायचं ठरवतीये. तिला शुभेच्छा देताना ‘जिंदगी वसूल’ करणाऱ्या या दादासाहेब नावाच्या वल्लीला व त्यांच्या कार्याला मनोमन सलाम करत माझी लेखणी तात्पुरती थांबवतेय.
( priyadharurkar60@gmail.com )