वेदनेशी जोडू नाते..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:52 PM2018-01-19T19:52:47+5:302018-01-19T19:55:31+5:30
अनिवार : सकाळी शांतिवनच्या परिसरात झाडाखाली पेपर वाचत बसलो होतो. कोपर्यातील एका बातमीवर लक्ष गेले. बीड तालुक्यातील आहेर वडगाव या गावातील बिभीषण बाबर या ऊसतोड कामगाराचा कारखान्यावर असताना उसाच्या फडावरच मृत्यू झाला. रोज या गावातून त्या गावात ऊस तोडण्यासाठी जात असताना वेगवेगळ्या ठिकाणचे दूषित पाणी पिण्यात आल्याने बिभीषणला कावीळ झाला. उपचार घेण्यासाठी पैसे नव्हते आणि मुकादम दवाखान्यात जाण्यासाठी सुट्टीही देत नव्हता. परिणामी उपचार न घेताच कष्टाचे काम करीत त्याने मृत्यूला कवटाळले होते.
- दीपक नागरगोजे
आहेर वडगावातीले मित्र रोहिदास रोहिटे यांना फोन केला आणि घटनेची माहिती आणि कौटुंबिक परिस्थिती विचारली. रोहिदासने दिलेली माहिती थक्क करणारी होती. अखेरच्या क्षणापर्यंत दारिद्र्याचे चटके खात जगलेल्या बिभीषणने या जगाचा निरोप घेऊन स्वत:ला तर मुक्त केले, पण पत्नी आणि पाच मुलांवर वाईट वेळ आणली. मुकादमाकडून घेतलेली उचल फिटली नाही. बदल्यात मुकादमाने घेतलेले कोरे चेक. घरी एक गुंठा जमीन नाही. राहायला सरकारी गायरानात टाकलेले १० पत्रे. तेही सावकाराकडे गहाण टाकलेले. हतबल झालेली पत्नी रंजना आणि तिच्यावर सागर, कोमल, नम्रता, सुप्रिया आणि हरिओम, या पाच लेकरांच्या पालनपोषणाची जबाबदारी. पाचरटातच लहानाची मोठी झालेली ही लेकरं शाळाबाह्यच राहिलेली. आई-बापाच्या आयुष्यभर चाललेल्या हाता-तोंडाच्या लढाईत पोट भरायचीच मारामार तर शिक्षण येणार कुठून? दिसायला गोंडस असणारी लेकरं आणि माय कुपोषणाने आणि घरातील कर्त्याच्या जाण्याने कोसळलेल्या आभाळाएव्हड्या दु:खाने कोमेजून गेलेली. वर कर्जाचा डोंगर उभा. हे सर्व ऐकून दगडालाही पाझर फुटावा. मी तर एक भावना असणारा माणूस. रोहिदासला मी येतोय म्हणून सांगितले. बीडमधून रोहिदाससह एका मित्राला घेऊन आम्ही आहेर वडगाव गाठले.
गावात जायच्या अगोदरच सरकारी गायरानात रस्त्याच्या लगत बिभीषणचे घर. घर कसले ते..? मिळेल त्या साधनाने पाऊस, ऊन वार्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न. दारात असलेल्या एका झुडुपाच्या त्रोटक सावलीला रंजना उघड्या कपाळाने चिंताग्रस्त अवस्थेत बसलेली पाहून डोक्यात विचाराचे काहूर माजले. आम्हाला पाहून लेकरं जमा झाली. हताश आईच्या शेजारी जागा धरून बसली. प्रत्येकाचा चेहरा सुकलेला. रोहिदासच सर्व काही सांगत होता. पोरांना शाळेत जाता का, विचारले तर खाली माना घातल्या. शिकायचे का विचारले तर कोमलने उत्तर दिले आता कसे शिकणार...? वडील तर ‘गेले सोडून ...!’ पोरीच्या या बोलण्याने रंजनाच्या अश्रूंचा बांध फुटला. सर्व जण रडू लागले. एरव्ही कणखरपणे वागणारे आम्ही सर्वच गहिवरून गेलो. नेणिवेच्या दारावरील ते अंगण अश्रूत न्हाऊन गेले.
शांतिवन करीत असलेल्या सर्व कामाची माहिती रोहिदासने अगोदरच त्यांना दिली होती. या लेकरांना शिक्षण आणि पालनपोषणासाठी शांतिवनमध्ये घेऊन जातो. पाठवता का असे मी विचारले. आईचेच ते हृदय. कितीही वाईट परिस्थिती आली तरीही लेकरांना दूर करण्याइतके सक्षम काळीज कुठल्याही आणि कितीही हतबल असलेल्या आईचे असूच शकत नाही. याचा अनुभव रंजनाने लेकरांवरून फिरवलेल्या नाजरेतूनच येत होता. केवळ उद्भवलेली परिस्थिती आणि लेकरांच्या भविष्यासाठी जड अंत:करणाने ती हो म्हणाली.
सागर आईजवळ राहील असे ठरले. कोमल, नम्रता, सुप्रिया, हरिओम यांना शांतिवनाला पाठविण्याचा निर्णय झाला.
पुढे बिभीषणचे सर्व विधी संपल्यानंतर मी या चार लेकरांना शांतिवनमध्ये घेऊन आलो. कोमलला इयत्ता ७ वीत, चौथीत नम्रता, पहिलीत सुप्रिया तर बालवर्गात हरिओम. शाळाबाह्य मुलांची शाळा नियमित सुरू झाली. तिकडे रंजना रोजंदारीवर काम करीत स्वत:चे पोट भरू लागली, तर इकडे शिक्षण ध्यानीमनी नसताना मुलं उत्तम प्रकारे शिकू लागली. वयावर आधारित सातवीत प्रवेश दिलेली कोमल पुढे दहावीत ८५ टक्के गुण मिळवून पास झाली. पुढे तिला पुढील शिक्षणासाठी शांतिवनच्याच वतीने पुण्यातील नामांकित हुजूर पागा शाळेत शिक्षणासाठी पाठविले. कोमलने पुढचे शिक्षण घेतले. आता अत्याच्याच मुलासोबत तिचे लग्न झाले आहे. ते उत्तम संसार करतात. नम्रता आता शांतिवनमध्ये १० वीत तर सुप्रिया सातवीत आहे. हरिओम पाचवीत. नम्रता, सुप्रिया आणि हरिओम यांची पुढील शिक्षणाचीही संपूर्ण जबाबदारी शांतिवनने घेतलेली असून ही लेकरं नक्कीच पुढे उत्तम शिक्षण घेतील असा आम्हा सर्वांचा विश्वास आहे .
( deepshantiwan99@gmail.com )