विधिवत... शब्दवत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 06:52 PM2018-08-04T18:52:42+5:302018-08-04T18:53:45+5:30
बळ बोलीचे : चिंब भावनांचे झरे आणि श्रद्धांची ओल गावांच्या स्वभावातून कधीच आटत नाही. म्हणजे परंपरेचे पाणी कसे छान प्रकारे तिथे खळाळते राहते. ‘विधिवतेला’ सामूहिक मान्यता या संस्कृतीमध्ये जणू दिलेली असते. हा सगळा प्रकार ठार अंधश्रद्धेचाही नसतो. उलट जगण्यातील धार तिथे असतात. जगण्यातील संदर्भ असतात. जगण्यातले सार असते आणि सारांशही!
- डॉ. केशव सखाराम देशमुख
किती-किती प्रकारचे आणि किती-किती त-हांचे विधी गावांत, शेतांत, तेथील भवतालात होतात. त्या-त्या विधीला खास अशी नावे आहेत. खास अर्थही आहेत. ‘उगीचच’ या एका शब्दाने त्या विधीची वासलात लावता येत नाही. यश मिळू दे. सफलता प्राप्त होऊ दे. भले होऊ दे. निर्विघ्न पार पडू दे. सुफळ-मंगल होऊ दे. आबादी होऊ दे. अडथळे दूर होऊ दे; अथवा भरभराट होऊ दे! अशा एक नव्हे, तर हजार धारणा ग्रामजीवनात होणाऱ्या विधींमागे लगडलेल्या असतात. हे सर्व विधी मराठीला शब्दांची दौलतच प्राप्त करून देणारे आहेत. त्याचाच हा एक धांडोळा...
शेताच्या विहिरीच्या काठावर वर काही गोलमटोल, लहान, छान दगड रांगेत आढळतात. त्यांना शेंदरांचा अंगरखा माखलेला. वेळोवेळी नैवेद्य वाहायचा असतो. ही पाषाणांची छोटी छान रांग म्हणजे ‘आसरा’ (जलदेवता). पाण्याचे रक्षण+पाण्याची मुबलकता तगून धरणाऱ्या या देवता, अशी भावना. माणसांना त्यांचाच आश्रय/थारा/किंवा सहारा. म्हणून त्या आसरा! वा, वा, छानच! तिथेच शेतात पिके काढणीला आली किंवा वावरातला कापूस वेचायला पहिली सुरुवात झाली की, तिथल्याच ‘ढेकळांची’ प्रतीकात्मक देवता मांडायच्या. तिथेच भातसदृश अन्न दगडचुलीवरच शिजवायचे. शिजलेले अन्न वावराच्या चौदिशांनी शिंपडायचे. हे जे शिंपडलेले आहे, त्याला ‘बोणं’ म्हणतात. जमीन शांतवायची आणि भरभराटीची प्रार्थना करायची. मातीला माणसांसाठी ‘बरकत’ मागायची. ही नम्रता व सकारात्मकता छानच म्हणायला पाहिजे.
शेतातील माल, धन बैलांच्या आठ पायांनी व बैलगाडीच्या दोन चाकांनी घरधनी घरी घेऊन येणार! वावरातला माल बैलगाडीत भरतात त्याला जाडभरडा मोठा कपडा लागतो. त्याला ‘गोना’ म्हणतात. ही मालगाडी म्हणजे धान्यसमृद्धी मग आनंदात घरी आणली जाते. घरी आले की, बैलांची पूजा होते. खुरांवर पाणी अर्पिले जाते. गूळ-भाकर बैलांमुखी दिली जाते. गाडीवान व बैलांना कुंकू लावून ही धान्यगाडी घरापुढे सोडली जाते व ‘धान्याची रास कणगीत येऊन विसावते.’ वर्षभराची ही भाकर अशी सानंद; शेतातून घरी येते! वर्षभराच्या या धान्याला ‘सालचंदी’ असा समर्पक शब्द मिळालेला आहे. कृषिजन्य या विधिवत विविधतेमधून अनोख्या शब्दांचीसुद्धा बरसात झाली ती अशी.
‘लग्न’ हा अडीच अक्षरांचा बनलेला शब्द किती अप्रुपाचा आणि हौसेचा. सगळ्या समाजात लग्नाला एक सामाजिक, खर्चिक स्थान मिळाले आहे. जो तो त्याच्या परीने ‘लग्न’ या विषयाला सजवत असतो. आनंद, सुख, निकड, प्रतिष्ठा, गौरव, अभिमान आणि आतिथ्यशीलता- अशा नानाविध बाजू लग्न नावाच्या शब्दाला मिळतात. लग्नाचा ‘खास एक थाट, दिमाख’ असतो. पैशाची सप्रेम उधळमाधळ येथे चालते. पुरी हौस फिटण्याचा आणि डोळ्याचे पारणे फिटण्याचा सामाजिक कुटुंबप्रवण असे रूप ‘लग्नाला’ लाभलेले आहे. खेड्यांत किती प्रकारचे विधी येथे ‘पाहावयास’ मिळतात. या विधींचे डौल पुन: प्रांतनिहाय भिन्न-भिन्न आहेत; हे पुन: निराळेच!
जेव्हा शामियाने फार प्रमाणात नव्हते. तेव्हा ‘हिरवा’ मांडव दारी घातला जाई. हा मांडव घालायला लग्नापूर्वी काही दिवस आधीच गाव जमा होई. मांडव घालणाऱ्या गावातल्या माणसांना मग ‘पिठले, भाकरी, कांद्याचे’ जेवण दिले जाई! ‘गावातील लग्न सगळ्या गावाचा आनंदोत्सव’ असे. नवरदेव लग्नापूर्वी मारुतीच्या देवळात जाऊन, दर्शन घेऊन मांडवात नंतर येतो. देवळाकडे जाण्याला ‘‘नवरदेव ‘परन्या’ निघाला’’ म्हणतात. पूर्वी देवळापुढेच नवरदेवाला नवे कपडे चढवले जात. त्याला ‘शेवंती’ असा मोहक, सुगंधी शब्द योजला आहे. विधिवत लग्न लागून जाते. त्यानंतर, ‘जेवण, सुपारी खेळणे, थट्टामस्करी’ हे सर्व चालते. नवरीच्या घरासमोर त्रिकोणी आकाराचे विटा-मातीचे एक घर बनवले जाई. ज्यात नवरा-नवरीने क्षणभर बसायचे असते. त्याला ‘बव्हले’ म्हणतात. नवरीसमवेतच्या मुलींना लग्न संपेपर्यंत ‘करवल्या’ म्हणतात. या उलट नवऱ्या मुलांसोबतच्या या मुलांना ‘सकोन्या’ म्हटले जाते. या सकोन्यांना ‘लांडगा’ असेसुद्धा म्हणतात.
हे सकोने म्हणजे नवरदेवाचे ‘खुश’वंत फ्रेंड! गावातील लग्न नाना विधींनी बहरलेले असते. देवधर्म, रिवाज म्हणून एका लग्नात छोटे-छोटे किती विधी चालत. शिवाय ते चार चार दिवस चालत. ‘हळद’, ‘साडे’, ‘घ्यारे व-घ्यारे व’, ‘पाळणा’, ‘परन्या’, ‘शेवंती’, ईवाहीभेट, ‘सुनमुख, शिदोरी, रुखवत, परतनी, हिरवा मांडव, बहुले, ‘करा’, सुतवणी- हे असे एक नव्हे बारीक, बारीक खूप विधी हळदीपासून लग्नापर्यंत दिमाखात तसेच आनंदात चालतात. आज हे सर्व ‘त्या’ पूर्वीच्या थाटात राहिले नाहीत. गावातील लग्नाचे ‘मांडव’ आता शहरात आले. या मांडवांची जागा ‘मंगल कार्यालयांनी’ घेतली आहे. लोकांना वेळ राहिलेला नाही. ‘झटपट’, ‘पटपट’ असा समारंभांना या वेग मिळाला. काळ, वेळ, जीवन वेगवान झाले. सकाळचे लग्न दुपारपर्यंत जिकडे-तिकडे!! आणि विधींची वजाबाकी झाली. कमीत-कमी उपचार व सोपस्कारापुरते तेवढेच विधी होतात. वेळ संपला व उत्साह घटला.
लग्न झाल्यावर पूर्वी आठवडाभर हिरवा मांडव दारी असायचा. ठेवला जायचा. नवरी पुन: माहेरी आली की, सुवासिनींना पुन: विधिवत जेऊ घातले जाई. त्याला ‘सातवा मांडव’ म्हणत. लग्नमंडपाच्या खांबांची पूजा व्हायची आणि केवळ ‘महिलांच्या भोजनाचा’ समारंभ संपन्न व्हायचा. हे आता जवळजवळ थांबलेले दिसते. म्हणजेच, गावलग्न असो अथवा शिवारातील हंगामस्वागत असो. या सर्वांना मंगलमय संदर्भ होते. त्यांना संस्कृतीचा सुगंध होता. माणसांच्या मनांना माती लागलेली होती. माती आणि पाण्याचा संदर्भ माणसांच्या भावभावनांना चिकटलेला होता. आता लग्नाचे विवाहात रूपांतर झाले आहे आणि व्यवहारांचा लेप त्या प्रतिष्ठेवर दाट होत चालला आहे. सर्व ‘विधी’ करण्यासाठी या वर्तमानाच्या हाती ‘अवधी’ उरलेला नाही.
(keshavdeshmukh74@gmail.com )