रोहिलागड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 08:11 PM2018-05-19T20:11:05+5:302018-05-19T20:13:37+5:30

स्थापत्यशिल्प : रोहिलागड नावावरून रोहिले या पश्तुनी अफगाण लोकांशी संबंध असावा हे नक्कीच. मात्र, काय ते इतिहासालाच ठाऊक!!! या लढाऊ जमातीच्या लोकांना औरंगजेबाने सतराव्या शतकात भारतात राजपूत व इतरांशी लढण्यासाठी आणले आणि आजच्या उत्तर प्रदेशातील बरेली शहराच्या आजूबाजूच्या प्रदेशात वसवले. 

Rohilagad | रोहिलागड

रोहिलागड

googlenewsNext

- तेजस्विनी आफळे 

मराठवाड्यातील किल्ल्यांविषयीची आपली मालिका पुढे सुरू ठेवताना लोंझा आणि लहुगड-नांद्रासारख्याच अजून काही छोट्या किल्ल्यांचा आपण आढावा घेऊया. असाच एक किल्ला आहे आजच्या जालना जिल्ह्यातील रोहिलागड.औरंगाबाद शहरापासून दक्षिण-पूर्वेला अंबड शहरापर्यंतचा सगळा परिसर शुष्क आणि खुरट्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे. अशाच एका अवतरणचिन्हासारखा आकार असलेल्या छोट्या डोंगरावर औरंगाबाद शहरापासून सुमारे ५० किलोमीटरवर अंबड तालुक्यात हा किल्ला वसलेला आहे. पायथ्याशी वसलेले गावही किल्ल्याच्या नामसाधर्म्याने ओळखले जाते.

गावात सापडणारे मंदिरांचे अवशेष तसेच देवगिरी, पैठण, अंबड, जामखेड या यादवकालीन बाजारपेठांना जोडणाऱ्या मार्गावरील स्थान पाहता गावाचा यादवकालीन संबंध अधोरेखित करता येऊ शकतो. मात्र, गाव आणि किल्ल्याच्या निर्मितीविषयी याहून अधिक इतिहास अजूनही मौन बाळगून आहे. लहुगडसारखा रोहिलागड किल्ल्याचा वापर ही देवगिरी किल्ल्याच्या संरक्षक फळीतील टेहळणी आणि पहाऱ्याचे स्थान म्हणून वापर होत असावा. त्यानंतरच्या मुस्लिम राजवटीच्या काळातील इथल्या इतिहासाविषयी काहीच पुरावा मिळत नाही.

रोहिलागड नावावरून रोहिले या पश्तुनी अफगाण लोकांशी संबंध असावा हे नक्कीच. मात्र, काय ते इतिहासालाच ठाऊक!!! या लढाऊ जमातीच्या लोकांना औरंगजेबाने सतराव्या शतकात भारतात राजपूत व इतरांशी लढण्यासाठी आणले आणि आजच्या उत्तर प्रदेशातील बरेली शहराच्या आजूबाजूच्या प्रदेशात वसवले. हा भाग आज रोहिलखंड म्हणूनच ओळखला जातो. अफगाणिस्तानातील कमालीच्या शुष्क डोंगरदऱ्यांमधील शूरवीर लढवय्ये म्हणून हे रोहिले त्यानंतर भारताच्या इतिहासात गाजले. मराठवाड्यातील या भागातील त्यांचा इतिहास अजून तेवढासा ज्ञात नाही. गावाच्या पूर्वेला वसलेल्या किल्ल्यावर जाताना दोन छोट्या-मोठ्या लेणी पाहावयास मिळतात. मोठ्या लेणीचे छत ८-९ कोरीव खांबांवर तोललेले आहे. कोरीव कामाच्या शैलीवरून ही लेणी पूर्व-मध्ययुगीन काळातील असावीत. इथून पुढे काही उंचीवर काही तटबंदीचे अवशेष आढळून येतात.

गडाच्या उत्तरेला एका बुरुजाचे अवशेषही शिल्लक आहेत. मात्र, त्यांची कालनिश्चिती करणे अवघड आहे. गडाच्या पठारावर घराची काही जोती, पाण्याचा साठा आणि दगडी रांजण आदी अवशेष दिसतात. दक्षिणेला माची भागाकडे जाताना एका खांबांवर तोललेले; पण आज कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. आधी म्हटल्याप्रमाणे गाव व परिसरातील तटबंदी, इमारती व मंदिरांचे भग्नावशेष पाहता रोहिलागड परिसर इतिहासात महत्त्वाचे स्थान बाळगून होता हे नक्कीच. यासंदर्भात अधिक माहिती मिळावी आणि रोहिलागड ही इतिहासाच्या नकाशावर यावा यासाठी रोहिलागडवासीय प्रयत्नशील आहेत. आपण गडप्रेमीही गडाला एकदा तरी भेट देऊन त्यांच्या या प्रयत्नात सहभागी होऊया...

(  tejas.aphale@gmail.com )
 

Web Title: Rohilagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.