‘शेती’वाल्यापेक्षा ‘रेती’वाला बरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:03 PM2018-04-28T18:03:02+5:302018-04-28T18:03:53+5:30
लघुकथा : ‘तिनं नकार कुठं दिला. कसल्या पोरा बरुबर तिला लगीन करायचं ते बी सांगितलं लेकीनं; पण तुम्ही ध्यानातच घेत न्हाई.’ ‘म्हणजे त्या तिजेगावच्या रावसाब पाटलाच्या रेतीचा धंदा करणाऱ्या पोरा बरुबर...?’
- प्रदीप धोंडिबा पाटील
भूजंग नाना आपल्या बायकोला जवळ बोलावून म्हणाले, ‘येय इंदूची माय, बारा गावचे पोरं दावून म्या पार वैतागलो गड्या. आता बस झालं. आता तूच तुज्या पोरीला इच्यारून घे गड्या. कसल्या ब्यारीस्टराशी लगीन करून घेणार हाय ते.’
‘अहो जरा धिरानं घ्या की...’
‘काय म्याच धिरानं घेऊ? इच्या बरोबरीच्या पोरीची दोन-दोन बाळातपणं झाली... तरी हिचं पोरं पसंत करणं झालं न्हाई. सगळा तुझा लाड आमच्या अंगलट आला. ’
‘म्या काय लाड केले.’
‘काय गरज व्हती. पोरगं पसंत हाय की न्हाई म्हणून इच्यारत बसायची. आपल्या काळात लग्नाच्या पोराला तरी कोणी पसंती इच्यारत व्हतं का?’
‘आपला काळ येगळा व्हता. शिकलेल्या पोरी हाईत या काळच्या. त्यांचं त्यान्ला इच्यार करून आयुक्शाचा जोडीदार निवडावं वाटत आसल.’
‘का वाटना. आम्हाला काय करायचं; पण कसला नवरा पायजे म्हणं ते तरी इच्यारून घे. तिनं म्हन्लं तसलं पोरगं तर शोधावं लागल चार ठिकाणी हिंडून, की तीच हिंडणार हाय, ते तरी सांग म्हणावं. आम्हाला दुसरं तरी कामं सुधरतील.’
‘असं कसं म्हणता? आपली पोरगी का आपल्या इच्याराच्या भाईर व्हय...?’
‘मंग ऊठसूठ का नकार देती?’
‘तिनं नकार कुठं दिला. कसल्या पोरा बरुबर तिला लगीन करायचं ते बी सांगितलं लेकीनं; पण तुम्ही ध्यानातच घेत न्हाई.’ ‘म्हणजे त्या तिजेगावच्या रावसाब पाटलाच्या रेतीचा धंदा करणाऱ्या पोरा बरुबर...?’
‘व्हय... ’ ‘अगं त्याच्या हिश्श्याला दोन एकर जमीन येयणा धड.’
‘अहो या काळची पोरं कुठं शेती करत्यात? शेतीत तर काय कुठं माती पिकतं? त्या पक्शा रेतीचा धंदा बरा की. तिजेगावच्या रावसाब पाटलाचं पोरगं मोप रेतीत पैसं कमवितं म्हणं. आपल्या गावात बऱ्याच जणानं दिलं की, शेतीवाल्या पोरा पक्शा रेतीवाल्या पोरालाच पोरी...’ ‘त्यांनी केलंय म्हणून आपुणबी तेच करायचं? तुला काय वाटतं? हा रेतीचा धंदा लई दिस चालंल...?’
‘का चालणार न्हाई? धा-बारा वर्स झालं तर चालूच हाय की...’
‘आता तुमा माय-लेकी पुढं मला काय कळायचं न्हाई. काय ते दोघीच ठरवा.’
‘अवं आमाला ठरवायचं असलं असतं तर तवाच ठरविल्या असत्या की.’
‘मंग आता ठरवा की. आता कोण धरलाय तुमचा हात.’
‘तुम्ही कशाला हावं मंग.’ ‘म्या बक्कळ हाव. पणीक आमच्या घरात आमाला हाय कुठं किंमत. सगळ्या गावच्या पोरींच्या सोयरिकीची सुपारी एक बैठकीत फोडली; पण आमच्या पोटच्या पोरीच्या सोयरिकीची सुपारी आज तीन वर्स झालं फुटता फुटना झाली. हा अपमान जगात कुणाला सांगावा?’
‘हा तुमचा अपमान न्हाई. मानच हाय. आज तीन वर्स झालं तुमचा इच्यार बदलंल म्हणून पोरगी वाट बघतेया. हिच्या जागी दिसरी कोणी असती तर तवाच त्या पोराचा हात धरून गेली असती पळून.’
‘असं हाय तर. एवढं तर परकरण पुढं गेलंय.’
‘परकरण काई पुढं बिडं गेलं न्हाई. फकस्त त्या पोरात जीव गुतलाय आपल्या पोरीचा.’ ‘जीव गुतला. ते बी रेतीच्या धंदेवाल्यात? एवढाही जीव गुंतवायचा व्हता तर एकांदा शेत जमिनीचा पट्टेदार पाटील भेटला न्हाई का?’
‘काय करता जमिनीच्या पट्टेदार पाटलाच्या पोराला. एका औताच्या जमिनीत पावशेर माल हुईना. झाला तर त्याला भाव ईना. सदा घरात किरकिऱ्याच. तशा शेतीवाल्यापरीस रेतीवाला काय वाईट. दोन महिनं रेती वढून जमा केलं तर वरीसभर बसून खातील की नवरा-बायको राजा-राणी वानी.’ ‘तू म्हणतीस ते बी खरंच व्हय बघ. या काळात शेतीवाल्यापरीस रेतीवालाच बरा गड्या म्हणायची पाळी आली.’ भुजंगा पाटील असं म्हणताच माय-लेकीच्या आनंदाला पारावार उरला नाही.
( patilpradeep495@gmail.com )