विकणे आहे
By admin | Published: April 12, 2017 03:18 AM2017-04-12T03:18:50+5:302017-04-12T03:18:50+5:30
गावात वाडे होते. प्रशस्त दालनांची घरे होती तशी लहान-मोठी घरेही होती. घराच्या खोलीतील दर्शनी भागामध्ये वृद्ध स्त्री-पुरुषांचा लावलेला फोटो आढळे. कधी दोघे एकत्रित,
- डॉ. गोविंद काळे
गावात वाडे होते. प्रशस्त दालनांची घरे होती तशी लहान-मोठी घरेही होती. घराच्या खोलीतील दर्शनी भागामध्ये वृद्ध स्त्री-पुरुषांचा लावलेला फोटो आढळे. कधी दोघे एकत्रित, तर कधी वेगवेगळा. हे आजोबा आणि ही आजी न सांगता समजून येई. टोपी, धोतर, कोट हा पुरुषाचा पेहराव, हातात क्वचित काठी तर कधी छत्री. आजीच्या कपाळावर ठसठशीत कुंकू, नाकात नथ, नऊवारी साडी दिसे. आयुष्याचे गांभीर्य ओळखून जीवन जगणारी ही मंडळी होती. त्यामुळे चेहऱ्यावर हास्य नाही.
आजी-आजोबांचे हे फोटो म्हणजे ‘घर घर की कहानी’ होती. त्यात नावीन्य वाटण्याजोगे काहीच नव्हते. हल्ली हे दृश्य दुर्मीळ झाले आहे. गेल्या तीसएक वर्षांत खूपच पडझड झाली. क्वचित घरातील जुनीपुराणी, टाकावू वस्तू भंगारात घातली जाई. आता वाडेच टाकावू झाले. फार मोठी किंमत येते आहे. पूर्वजांनी हजार दोन हजार रुपयांत बांधलेले घर भर रस्त्यालगत असेल तर किंमत मोठी ‘कोटीच्या कोटी उड्डाणे/झेपावे गगनाकडे.’ वाडे गेले, घरे गेली. ‘सदनिका’ अवघड शब्द वाटतो, फ्लॅट सिस्टिम आली. मोठ्या शहरातून गगनचुंबी इमारती आल्या. वन बीएचके, टू बीएचके, थ्री बीएचके ही भाषा सर्वांच्याच अंगवळणी पडली आहे. वाडे विक्रीला निघाले, जुनी घरे विक्रीला निघाली, रिकाम्या जागा सुद्धा आणि शेतीवाडीचेही प्लॉट झाले. ‘विकणे आहे’ हा परवलीचा शब्द होऊन बसला. ‘दिवा लावला तुळशीपाशी’ सदनिकेत तुळस हरवली. दिवा लावण्याचा प्रश्नच नाही. अपवाद असतात. ही संस्कृतीची पडझड आहे हे लक्षातच आले नाही. जीवन म्हणजे खरेदी-विक्रीचा शुष्क-निरस व्यवहार असे होऊन बसले. प्रत्येकाच्या तोंडी चारच शब्द ‘हे विकले ते घेतले.’ लक्ष्मी घरी आली, पण नारायणविरहित. त्यामुळे वखवख वाढली. ‘खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख.’ भस्म्या रोग सर्वांनाच जडला. नानासाहेब गोरेंचा ‘डाली’ लेखसंग्रह आठवला. डाली म्हणजे फुलांची परडी - ही आहे विचारपुष्पांची परडी. एका लेखात ‘प्रत्येकाच्या कपाळावर पाटी आहे’ ही चीज विकावू आहे.
डॉक्टर आपले कौशल्य विकतात, गुरुजी विद्या विकतात, विद्वान बुद्धी विकतात, कलाकार कला विकतात. सगळेच भोगाच्या मागे. त्यागाच्या मागे धावणारा कोणीच नाही. ‘चंगळवाद’ आकाशातून पडला नाही, तो आम्हीच जन्माला घातला. तो सगळेच विकत घ्यायचे म्हणतात. त्याला रोखण्याची ताकद ना माझ्यात, ना तुमच्यात, ना समाजात. ज्याला झोडपून काढायचे त्यालाच कुरवळायला निघालेले आपण सर्व. हिताची वाट दाखविणार तरी कोण?