साठोत्तरी वाङ्मयीन पर्यावरणाविषयीचे मर्मग्राही चिंतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 03:59 PM2018-07-07T15:59:20+5:302018-07-07T16:03:02+5:30
बुकशेल्फ : एखाद्या सृजनशील लेखकाला लेखनाचं बळ देणं सध्या जवळपास संपुष्टात येत चाललं आहे. माझ्या पिढीतल्या लेखकांच्या लेखनाला जाती-पातींच्या, गटा-तटांच्या सीमा नव्हत्या. असल्याच तर त्या अदृश्य स्वरुपातल्या होत्या. आजच्या पिढीतल्या साहित्यिकांचं साहित्य जाती-पातींच्या गटा-तटांच्या सीमेत बंदिस्त होत चाललं आहे. त्याहीपेक्षा घातक म्हणजे आमच्या जातीच्या लेखकांच्या लेखनावर बोलायचं असेल तर अनुकूल बोला, नसता गप्प बसा. गप्प बसणार नसाल तर आम्हाला तुम्हाला गप्प बसवावं लागेल, अशी दहशत मराठी साहित्यात सुरू झाली आहे. मराठी साहित्याच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे. -इति प्राचार्य रा. रं. बोराडे. बोराडे सरांचे हे उद्गार साहित्यासारख्या आदर्श मानल्या जाणाऱ्या कलाक्षेत्रातील वातावरणाविषयी आहेत. वरील मत हे अतिशय खेदजनक जरी असले तरी वास्तवदर्शी आहे. बोराडे सरांचे हे आणि अशा प्रकारचे चिंतनप्रवण असे विचार येतात डॉ. गणेश मोहिते यांनी संपादित केलेल्या व नांदेडच्या इसाप प्रकाशनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘अनुबंधाची पेरणी’ या छोटेखानी ग्रंथात.
- डॉ.कैलास अंभुरे
प्राचार्य रा. रं. बोराडे यांची ‘वसुली’ ही पहिली कथा १९५७ मध्ये प्रसिद्ध झाली आणि काही दिवसांपूर्वीच त्यांची ‘लेक माझी’ ही कादंबरी आली आहे. ते गत सहा दशकांपासून सातत्याने लेखन, वाचन, चिंतन, मनन करीत आहेत. गत साठ वर्षांतील त्यांची भाषणे व लेखांचे संपादन डॉ.गणेश मोहिते यांनी केले आहे. या ग्रंथात एका सृजनशील लेखकाचा लेखनप्रवास, त्यांची जडण-घडण, त्यांचे साहित्यविचार, त्यांनी अनुभवलेला वाङ्मय व्यवहार, मराठीसाहित्य, संस्कृती व सामाजिक क्षेत्रातील पडझड आणि मूलभूत चिंतन आहे; तसेच साहित्य क्षेत्रातील दाहक अनुभव आणि नव्या पिढीच्या लेखकांसाठी पाय जमिनीवर ठेवून आभाळ कवेत घेण्यासाठीचे दिशादर्शक विचार आहेत.
संपादकीय, पंधरा लेख व एक प्रदीर्घ मुलाखत, असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. यापैकी ‘माझं साहित्य : अनुबंधाची पेरणी’, ‘माझ्या सृजनशील लेखनाने मला काय दिले?’, ‘माझी वाङ्मयीन वाटचाल’, ‘कृतज्ञ मी! कृतार्थ मी!’ इ. आत्मपर लेखांद्वारे एका कथालेखकाची, नाट्यलेखकाची, कादंबरीकाराची झालेली जडण-घडण आणि त्यांच्या निर्मिती प्रक्रियेचे स्वरूप लक्षात येण्यास मदत होते. तसेच पन्नास ते साठच्या दशकातील ग्रामीण समाज, लोकजीवन, ग्रामसंस्कृती, तत्कालीन प्रथा-परंपरा, लोकसंकेत आणि भाषा इ. बाबींचे आकलनही होते. तर ‘उपेक्षित ग्रामजीवनाने मला केले अस्वस्थ!’, ‘खेडी, शेती आणि शेतकरी’, ‘धांडोळा नात्यागोत्यांचा’ इ. लेखाद्वारे ग्रामीण मानसिकता, सामाजिक परिवर्तन आणि ग्रामसमूहाचे खडतर वास्तव प्रकट होते. तसेच ‘मराठी ग्रामीण साहित्य’, ‘नैतिकता आणि मराठी साहित्य’, ‘मराठी लेखकाला विचारतो कोण?’, ‘भाषा, बोली आणि लोकजीवन’, ‘मराठी ग्रामीण साहित्यातील ग्रामीण स्त्रीचे चित्रण’, ‘ग्रामीण रंगभूमी कशी रुजेल?’ इ. लेख हे मराठी वाङ्मय व्यवहारातील अनेकविध बाबींवर प्रकाश टाकतात.
बोराडे हे ग्रामीण साहित्यिक म्हणून परिचित असले तरी ग्रामीण साहित्य आणि ग्रामीण माणूस याविषयी परखडपणे काही गोष्टी मांडतात. उदा. ‘ज्या ग्रामीण माणसाच्या जगण्यावर आम्ही साहित्य निर्मिती करतो त्यांना आमच्या ग्रामीण साहित्याशी काही देणं-घेणं नाही. साहित्य म्हणजे काय याचा किंचितही गंध नाही. त्यांना त्यांच्या जगण्याचे प्रश्न इतके हैराण करीत आहेत की, त्यांना त्यातून बाहेर पडणे अवघड झाले आहे... आणि खेड्याशी ज्यांचा फारसा संपर्क येत नाही, असे लोक ग्रामीण साहित्य वाचीत आलेले आहेत व अमक्या तमक्या ग्रामीण साहित्यिकांच्या साहित्यातलं ग्रामीण माणसाचं जगणं कितपत वास्तव आहे, यावर आपली मतं मांडीत आले आहेत!’(पृ.१३) येथे ग्रामीण साहित्य आणि वाचक यांच्या संदर्भाने जसे ते रोखठोक मत मांडतात, तसेच ते आपण स्वत: ग्रामीण समाजापासून तुटत गेल्याचीही स्पष्ट कबुली देतात. तसेच ग्रामीण साहित्य चळवळ आणि लेखक यासंदर्भानेही त्यांनी मूलभूत बाबींवर प्रकाश टाकला आहे.
यासोबतच मराठी समीक्षा व्यवहार, प्रकाशन व्यवहार व वाचन व्यवहारातील झोंबणारे वास्तव मांडले आहे. मराठी लेखक, संपादक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते हे सर्व साहित्य व्यवहाराचे परस्परावलंबी घटक आहेत; पण यातील लेखक नावाच्या घटकाची स्थिती ते स्वानुभवातून मांडतात. ‘मराठी साहित्यिकांची स्थिती एखाद्या वधुपित्याप्रमाणे आहे. वधुपित्याला याप्रमाणे वराकडे जावं लागतं त्याप्रमाणे लेखकालाही प्रकाशकाकडे जावं लागतं.’ (५८), तसेच मराठी लेखक व प्रकाशक आणि शेतकरी व व्यापारी यांच्यातील समान शोषणसूत्र मांडताना ते लिहितात, ‘मराठी लेखकाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट घडते आणि ती ही की, एखाद्या मराठी लेखकाचं पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा घेऊन प्रकाशक त्या लेखकाकडे गेलेला आहे, असे सहसा घडत नाही. उलट एखादा शेतकरी आपल्या शेतात पिकविलेले धान्य जसे विक्रीसाठी आडतीवर घेऊन जातो, त्याप्रमाणे लेखक प्रकाशकांकडे जातो आणि मग शेतकऱ्यांच्या बाबतीत घडते तेच लेखकाच्या बाबतीतही घडते.’(२१-२२) येथे प्रकाशन व्यवहारातील सर्व ज्ञात सय मांडताना बोराडे सर कोणत्याही प्रकारचा आडपडदा ठेवत नाहीत.
नव्हे तर एकप्रकारे ते पाण्यात राहून माशांशी वैर पत्करतात. एवढेच नाही तर प्रकाशकांकडून नवलेखकांचे कशा प्रकारे आर्थिक शोषण केले जाते, याविषयीच्या अनेक बाबी ते सांगतात. तसेच मराठीतील एका प्रख्यात लेखकाला आजारपणात पैशांची गरज असूनही प्रकाशक पैसे देण्यास कशा प्रकारे टाळाटाळ करीत होता, मराठी लेखकांचे रॉयल्टी प्रकरण इत्यादी बाबींच्या संदर्भातही त्यांनी अवाक करणाऱ्या बाबी ठळकपणे मांडल्या आहेत. ही सर्व मांडणी म्हणजे प्रदूषित होत चाललेल्या वाङ्मय पर्यावरणावर प्रकाश टाकणारी आहे.
बोराडे सरांचे वय ऐंशीच्या घरात असूनही ते आजही नवलेखकांचे साहित्य उत्सुकतेने वाचतात. त्यांच्या लेखनाचे कौतुक करतात. त्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या साहित्याविषयी लिहितात. यासारख्या छोट्या वाटणाऱ्या त्यांच्या कृतीतून त्यांचे नवलेखकांशी असलेले घट्ट नाते समोर येते. त्यांच्या या लेखांमुळे जसा एक प्रख्यात, सिद्धहस्त लेखक समजून घेता येतो, तसेच साठ वर्षांतील मराठी वाङ्मय व्यवहार व समाज व्यवहारातील कित्येक अज्ञात घडामोडींवर प्रकाश पडतो. सोबतच वाङ्येतिहासातील काही मूलभूत; परंतु न सुटलेल्या हळव्या प्रश्नांनासुद्धा यामुळे वाचा फुटते. तद्वतच सद्य:स्थितीत वाचकांमध्ये वाढलेली जातीय भावना आणि अलीकडील लेखक, वाचक व अभ्यासकांमध्ये कशा प्रकारे भूमिकांचा अभाव आहे, याविषयीसुद्धा समर्पक, सडेतोड चिंतन याद्वारे प्रकटते.
या सर्व मांडणीला, त्यांच्या भूमिकेला ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य प्रभाकर बागले यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमुळे अधिक समृद्धता येते. तद्वतच संपादक डॉ. मोहिते यांनी लिहिलेले संपादकीय बोराडे सरांच्या भाषण व लेखनास समजून घेण्यास उपयुक्त ठरते; शिवाय सरांची शैली ही संवादी असल्याने ज्यांनी सरांना ऐकले आहे वा त्यांच्याशी संवाद साधला आहे, त्यांना तर जणू काही बोराडे सर स्वत: समोर बसून आपल्याशी संवाद साधत असल्याचा प्रत्यय येतो. बोराडे सरांसारख्या ख्यातकीर्त लेखकाच्या आयुष्यात काही अपूर्ण राहिलेल्या बाबी, काही संकल्प आणि संमेलनाध्यक्षपद यासारख्या गोष्टींविषयीची खंत व स्वागतशील भूमिकाही काही लेखांमध्ये आशयाची पुनरावृत्ती होत असली तरी साठ वर्षांतील वाङ्मय, सामाजिक, ग्रामीण व सांस्कृतिक पर्यावरण समजून घेण्यासाठी अभ्यासक, नवलेखक, वाचक या सर्वांना दिशा देणारा असा हा संग्रह आहे.