उन्हातून सावलीत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 07:21 PM2018-04-16T19:21:14+5:302018-04-16T19:22:09+5:30
अनिवार : यशोधरा तिचा जीवन प्रवास सहजतेने उलगडत होती. कॉलेजपासून ती आणि तिचा ग्रुप वेगवेगळ्या एन.जी.ओ.ना भेट द्यायचे, मदत करायचे. २००३ मधे ‘सावली’ संस्थेला भेट दिली. तेव्हा प्रकर्षाने इथले वेगळेपण जाणवले, ते म्हणजे संस्थेपेक्षा संस्थेतील मुलांना इथे जास्त महत्त्व होतं. दर महिन्याला तिचा ग्रुप आणि ती इथे यायचेच. पण मधल्या काळात मात्र सीएच्या अभ्यासामुळे काही काळ जाणे झाले नाही. यशोधरा २००७ मध्ये सीए झाली आणि पुन्हा सावलीला भेट दिली तेव्हा तिला मनातून वाटलं माझ्या शिक्षणाचा, कमाईचा उपयोग समाजासाठी व्हावा आणि तो ही योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने. अडचणींवर मात करत, निव्वळ माणुसकीची समर्पित आयुष्य जगणाऱ्या नितेश यांचं कार्य ती पाहत होतीच आणि नकळत त्यांच्या कार्यामुळे प्रेमातच ती पडली. मग तिनेच पुढाकार घेऊन लग्नाबद्दल विचारले. माहेरचा विरोध पत्करून बोहल्यावर चढत सर्वांची लाडकी वहिनी झाली. इथली मुलं-मुलीच तिचं माहेर आणि सासरही.
- प्रिया धारुरकर
सांगत होती, मायेची ‘सावली’ म्हणजे काय ते इथे आल्यावर नेमकेपणाने समजते. ज्यांना घर नाही, आई- बाप नाही. ते जन्मले कधी? कुठे? केव्हा? का? या प्रश्नांची उत्तरेच ज्यांच्याजवळ नाहीत अशी मुलं-मुली समाजात सर्वत्र दिसतात. त्यांच्याविषयी कळले की प्रत्येकाच्या मनात काहूर माजते. असंख्य प्रश्न उठतात. काही तरी करण्याची इच्छा होते. पण ही सगळी तळमळ ज्या गतीने येते त्याच गतीने निघूनही जाते. मात्र अशा मुलांंचे माता-पिता होण्याची, त्यांना आधार देण्याचे कार्य मात्र एखादीच व्यक्ती करते. याच कार्याची मुहूर्तमेढ १६ वर्षांपूर्वी नितेशनी अहमदनगर येथे रोवली.
अहमदनगर शहरातील कडेगाव परिसरात नितेश बनसोडे यांनी २००१ साली ३ मुलांना घेऊन या कार्याला सुरुवात केली. आज सावलीतून आयुष्यभराची शिदोरी देऊन त्यांनी जवळपास ३२५ मुलांचे पुनर्वसन केले आहे. असाह्य, कुटुंब नसलेल्या, शारीरिक, मानसिक वेदना सहन करणाऱ्या मुलांचे ते डोळे पुसत आहेत आणि मी त्यांच्याबरोबर आहे, ताई यात मला खूप मोठं सुख आणि समाधान मिळतंय. त्यांना निवारा मिळावा यासाठी ते रात्रंदिवस धडपडत असतात. हा संकल्प सिद्धीस जावा यासाठी, संकल्प प्रतिष्ठानाच्या माध्यमातून प्रयत्न करीत असतात. आता मुलांच्या सावली घराची दोन गुंठा जागेत दोन मजली इमारतही उभी राहिली आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या या काळात आपली मुले मागे पडू नयेत, यासाठी या घरात खास मुलांसाठी कॉम्प्युटर रूम तयार केली आहे. त्यांना चांगले विचार मिळावेत म्हणून पुस्तकांनी भरलेली कपाटे ठेवण्यात आली आहेत. त्यांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका तयार करण्यात आल्या आहेत. जेव्हा नितेश यांनी ही वास्तू उभी करायची ठरवले तेव्हा त्यांच्या खिशात एक रुपयादेखील नव्हता. फक्त २ गुंठा जागा होती. पण मनात इच्छा होती की, मुलांना स्वत:चे हक्काचे घर मिळावे. जेथून त्यांना कुणीही काढू शकणार नाही. काम सुरू केले. पैसा येत गेला. समाजातील असंख्य हातांनी सढळ मदत केली अन् वास्तू निर्माण झाली.
आज ‘सावली’त ६ ते १८ वर्षे वयोगटातील ५५ मुले-मुली आहेत. या मुलांना गायन, कराटे, शिवणकाम, ग्रिटिंग, चित्रकला, हातमाग, चरखा, शेती, कागदी व कापडी पिशव्या बनवणे, स्वयंपाक शिकवणे, यासारख्या कलांचे प्रशिक्षण देऊन त्याच्या जीवनात आनंदाची बाग फुलविली जात आहे. आई- बापाशिवाय वाढणारी ही मुले समाजातील विविध स्तरातून येतात. त्यांना कपडे नसतात, संस्कार नसतात, तरी या मुलांना अंगाला बोटही न लावता शिस्त लावणे व चांगले संस्कार देणे मोठे अवघड काम आहे. पण प्रेम, माया देऊन व संवाद साधून या मुलांवर शिस्तीचे संस्कार केले जातात. ती सांगत होती, नितेशजी म्हणतात की मुलांनी जर चूक केली तर शिक्षा देण्याऐवजी त्यांना प्रश्न विचारून त्याच्या मनातील गोष्टी जाणून घेतो. मग त्याच्या चुकीची जाणीव होईल अशा प्रकारे त्यांना प्रश्न विचारून, अंतर्मुख करून त्यांचे वागणे चांगले की वाईट याची जाणीव करून देतो. त्याची चूक त्यांना लक्षात आल्यावर त्यांच्यात जे परिवर्तन होते ते कायम स्वरुपी असते.
मुलांच्या अधिकाराविषयी मुलांना जागृत करून कृतिशील काम येथे केले जाते. या मुलांच्या संगोपनासाठी साधारणपणे रोज ५००० रुपये खर्च येतो. त्यासाठी आजपर्यंत शासनाकडून चार ते साडेचार लाख रुपये मिळाले आहेत. पण त्यावर आमच्या या मुलांची गुजराण होत नाही. अशा वेळी समाजातील दानशूर व्यक्तींकडून आम्हाला मदत घ्यावी लागते. पण अनेक लोक मदत देताना, त्या मदतीचे प्रदर्शन करतात. अशा गोष्टी आम्ही टाळण्याचा प्रयत्न करीत असतो. पैशाशिवाय हे कार्य कसे करणार? मग यासाठी आम्ही एक योजना तयार केली आहे. ३६५ व्यक्तींना आमच्या सावली आश्रमातील मुलांचा एक दिवस पालकत्व करण्याचे आवाहन केले. आतापर्यंत २० मित्रांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. सावलीमधून ज्या ३२५ मुलांचे पुनर्वसन करण्यात आले, त्यातील काही मुले विविध व्यवसायात पारंगत झाली आहेत. भरपूर कमाई करीत आहेत. त्यांना सावली आश्रमात येऊन येथील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी नितेश यांनी प्रोत्साहित केले आहे. त्यातून सुतारकाम, विविध वस्तू बनवणे, बांधकाम, हातमाग अशा विविध उपजीविकेसाठी लागणाऱ्या कौशल्यांचे प्रशिक्षण या मुलांना दिले जात आहे.
अनेक मुले ग्रामीण भागातून येतात. त्यांना शेती करण्याचे तंत्र शिकता यावे. यासाठी शेती निर्माण केली आहे. आज नितेश आणि यशोधरा त्यांच्या प्रेमाच्या छायेखाली ‘सावली’ घरातील मुले कुटुंबाचे प्रेम, सुरक्षा, संस्कार या साऱ्या गोष्टी मिळवत समाजात जगण्यासाठी लायक बनत आहेत. इथल्या ११ मुलींचे विवाह झाले आहेत व त्या आनंदाने त्यांचा संसार करीत आहेत. कोवळ्या जिवातलं माणूसपण जपणाऱ्या, त्याचं संवर्धन करणाऱ्या या माणुसकीने मुसमुसलेल्या दाम्पत्याला सलाम.
( priyadharurkar60@gmail.com)