गुगलच्या जमान्यातही मुद्रित गीतकोशाचे महत्त्व अबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:13 PM2018-02-24T22:13:24+5:302018-02-24T22:15:29+5:30
मोहंमद रफींच्या असीम चाहत्यांपैकी एक डोंबिवलीतील अजित प्रधान नुकतेच एका लग्नाच्या निमित्ताने औरंगाबादेत येऊन गेले. शहरातील संगीतप्रेमी व रेडिओ श्रोता जगन्नाथ बसैये बंधू यांच्या समवेत त्यांची गप्पांची मैफल अशी रमली की चार तास कुठे निघून गेले कळालेच नाही. अजित प्रधान यांनी मोहंमद रफींनी गायलेल्या विविध भाषांतील सुमारे ५ हजार गाण्यांची माहिती एकत्रित करून ७ नोव्हेंबर १९९८ या वर्षी ‘मेरे गीत तुम्हारे’ हा संदर्भ गीतकोश तयार केला होता.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद :
‘‘जनम-जनम का साथ देने का वादा,
किया करते थे अपने गीतो मे कभी,
पर इस जनम में साथ छोड दिया हमारा
अब दिल नही करता गवारा
ऐसे रफी आयेंगे दुबारा’’
अशा हृदयस्पर्शी शब्दसुमनांनी महानगायक मोहंमद रफींचे चाहते अजित प्रधान यांनी ‘मेरे गीत तुम्हारे’ या दुर्लभ गीतकोशाच्या निर्मितीच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. त्यांच्या भेटीतून, गुगलच्या जमान्यातही मुद्रित ‘गीतकोशा’चे महत्त्व अबाधितच नसून ते शाश्वत आहे, हेच अंतिम सत्य समोर आले.
मोहंमद रफींच्या असीम चाहत्यांपैकी एक डोंबिवलीतील अजित प्रधान नुकतेच एका लग्नाच्या निमित्ताने औरंगाबादेत येऊन गेले. शहरातील संगीतप्रेमी व रेडिओ श्रोता जगन्नाथ बसैये बंधू यांच्या समवेत त्यांची गप्पांची मैफल अशी रमली की चार तास कुठे निघून गेले कळालेच नाही. अजित प्रधान यांनी मोहंमद रफींनी गायलेल्या विविध भाषांतील सुमारे ५ हजार गाण्यांची माहिती एकत्रित करून ७ नोव्हेंबर १९९८ या वर्षी ‘मेरे गीत तुम्हारे’ हा संदर्भ गीतकोश तयार केला होता. १९४५ मधील ‘गांव की गोरी’ या चित्रपटात मोहंमद रफींनी गायलेल्या गीतांपासून ते १९८० च्या ‘आसपास’ या चित्रपटापर्यंतच्या गाण्यांची माहिती या संदर्भ गीतकोशात देण्यात आली आहे. यासाठी अजित प्रधान व त्यांचे मित्र प्रीतम मेंघानी यांनी सतत सात वर्षे सखोल संशोधन व अफाट मेहनत घेऊन माहिती एकत्र केली. यात चित्रपटाचे नाव, वर्ष, गीत, गीतकार, अभिनेता एवढेच नव्हे तर गीतांचा अद्याक्षरानुसार मुखडा, सोलो गीते, द्वंद्वगीते, मिश्र गायकांची यादी, कोरस गीतांची यादी, संगीतकारानुसार गीतांची यादी, गीतकारानुसार गीतांची यादी, खाजगी गीते, प्रादेशिक गीते अशी माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.
माहिती जमा करताना यासाठी त्यांना मोहंमद रफींच्या देश-विदेशातील शेकडो चाहत्यांचे सहकार्य मिळाले. उल्लेखनीय म्हणजे, या संदर्भ गीतकोशाला ज्येष्ठ संगीतकार नौशाद अली यांनी प्रस्तावना लिहिली होती. तसेच दुसरे महान ज्येष्ठ संगीतकार ओ.पी. नय्यर यांच्या हस्ते ‘मेरे गीत तुम्हारे’चे प्रकाशन झाले होते. अजित प्रधान यांनी सांगितले की, रेडिओ सिलोनच्या निवेदिका पद्मिनी परेरा, सावित्री कृष्णमूर्ती तसेच आमिन सायानी, गोपाल शर्मा यांनीही मोहंमद रफींच्या गीतांची माहिती दिली. जुने रेकॉर्ड शोधून त्यावरून माहिती संकलित करण्यात आली. रफींनी गायलेले गीत; परंतु ते चित्रपट प्रसिद्ध झाले नाहीत, तसेच काही भक्तिगीते व कव्वालीबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही. काही चित्रपटांतील गाणे असे आहेत की त्यातील कलाकारांचे नावही मिळू शकले नाही, याचा उल्लेखही त्यांनी केला.
प्रधान म्हणाले की, मोहंमद रफी हे हरफनमौला व्यक्तिमत्त्व होते. पार्श्वगायक तर अनेक आहेत; पण रफींची सर कोणालाही नाही. कारण, रफींनी वेगवेगळ्या अभिनेत्यांसाठी गाणी गायली. त्यांनी नुसती गाणी गायली नाही तर त्या अभिनेत्याचा अभिनय, हालचाली, हावभावाचा अभ्यास करून त्यानुसार गाणी गायल्याने तो आवाज त्या अभिनेत्यांना परफेक्ट सूट झाला. रफी साहेबांच्या जीवनाविषयी नौशादजींनी पुस्तकात उत्तम प्रस्तावना लिहिली आहे. रफींना या क्षेत्रात आणण्यासाठी त्यांचे मोठ्या भावाने किती मेहनत घेतली, याचीही माहिती नौशाद यांनी प्रस्तावनेत दिली. आज गुगलच्या जमान्यातही मुद्रित ‘मेरे गीत तुम्हारे’ या संदर्भ गीतकोशाचे महत्त्व अबाधित असल्याचे सांगत प्रधान म्हणतात की, गुगलवर मोहंमद रफींनी गायलेल्या गाण्यांची सर्वच माहिती खरी मिळेल याची शाश्वती नाही. यामुळेच मुद्रित ‘मेरे गीत तुम्हारे’ गीतकोश आज शाश्वत ऐतिहासिक ठेवा बनला आहे. रफींच्या गीतावर पीएच.डी. करणारे, अभ्यासक, समीक्षक, रेडिओ जॉकी, चाहत्यांसाठी हा गीतकोश एखाद्या महान ग्रंथासारखाच आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ यात अवतरला आहे. तसेच काही दुर्मिळ छायाचित्रेही यात पाहण्यास मिळत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तसेच येत्या काळात रफींसारखेच गायक मन्नाडेंच्या गीतांवरही संदर्भ गीतकोश काढण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आज भी जिंदा है रफी
अजित प्रधान यांनी सांगितले की, प्रसिद्ध गीतकार कमर जलालाबादी यांनी मोहंमद रफींवरील कविता उर्दूत लिहून पाठविली होती. त्याचे हिंदीत भाषांतर खुद्द ज्येष्ठ संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी करून दिले, ते पुढीलप्रमाणे.
‘‘देश के लाखो जवानों की तमन्ना है रफी,
जख्म-ए-दिल के लिये ख्वाबों का मसिहा है रफी,
इसके नग्मों ने जगायें है हजारो जजबात,
सिर्फ नग्मा नही, नग्मात की दुनिया है रफी
इसकी गीतों के है दिवाने, जमाने में सभी
जितने फनकार हैं इन सबमें अनोखा है रफी,
मैने पंूछा के कलाकार हमारा है कहाँ
इसके नग्मों ने कहा, आज भी जिन्दा है रफी’’
रफींनी दिलेल्या जानमाज वर नमाज अजित प्रधान यांनी ज्येष्ठ संगीतकार नौशाद अली यांनी रफींची सांगितलेली आठवण मैफलीत सांगितली.
नौशाद म्हणाले होते की, मोहंमद रफी हा ‘एक सच्चा, चांगला माणूस होता.’ समाजातील गरजवंतांसाठी मी काय मदत करू शकतो, याचा नेहमी ते विचार करीत असत. अमेरिकेच्या दौर्यावर जाण्याचा ते विचार करीत होते. तेथून डायलिसिस मशीन भारतात आणून येथील दवाखान्याला भेट देण्याचा त्यांचा इरादा होता. त्यातून गरिबांवर मोफत डायलिसिस करता आले असते; पण त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. ते नेहमी दानधर्म करीत. रमजान महिन्यात रफी नौशाद यांच्या घरी आले व सोबत बाहेर ट्रक आणला होता. त्या ट्रकमध्येच जानमाज (ज्या चटईवर नमाजी नमाज अदा करतात त्यास जानमाज म्हणतात). ते म्हणाले की, जहाँ ईद की नमाज होती है वहाँ पर मेरी तरफ से ये जानमाज बिछवा दिजिऐगा. नमाजी नमाज पढेंगे तो मुझे भी उसकी कुछ दुआँ मिलेगी आणि रफींचे रमजानमध्येच ३१ जुलै १९८० रोजी निधन झाले. त्यावेळेस ईदच्या दिवशी मोहंमद रफी यांनी दिलेल्या जानमाजवरच ३०० ते ४०० नमाजींनी नमाज अदा केली आणि त्यांच्यासाठी दुआँ मागितली.