शिवसेनेत सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:09 PM2018-08-06T12:09:26+5:302018-08-06T12:10:31+5:30

ऐळकोट : शिवसेनेत सन्नाटा पसरला आहे. पंधरा दिवस झाले कोणी काही बोलत नाही, तर त्यावर विचार करायचा असे का घडले याचा शोध घ्यायचा प्रयत्न करायचा तर प्रश्नच नाही. घटना आहे पंधरा दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदेंच्या अंत्यसंस्काराला खासदार चंद्रकांत खैरे गेले असताना त्यांना धक्काबुक्की झाली. लोकप्रतिनिधींबाबत औरंगाबादेत असा प्रकार आजवर घडला नव्हता आणि खैरेंची प्रतिमा तर माणसांच्या गोतावळ्यात राहणारा माणूस अशी असताना त्यांच्याबाबतीत असे काही घडावे हे आश्चर्यच. शिवसेनेचा पूर्वीचा दरारा राहिला नाही, असे म्हणण्यापेक्षा शिवसेना पूर्वीची राहिली नाही हेच खरे. नसता शिवसैनिकांच्या समक्ष सेनेच्या नेत्याला धक्काबुक्की करणे याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसता. विशेष म्हणजे सेनेचे इतरही नेते उपस्थित होते; परंतु त्यांनाही अशी वागणूक कोणी दिली नाही, ही गोष्टसुद्धा खटकणारी आहे.

Silence in the Shiv Sena | शिवसेनेत सन्नाटा

शिवसेनेत सन्नाटा

googlenewsNext

- सुधीर महाजन 

ही घटना सेनेचे अंतरंग स्पष्ट करते. अंतर्गत राजकारण काय चालते याचा अंदाज यातून मिळतो. कारण दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कन्नडचे सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सर्वात अगोदर राजीनामा दिला आणि ते मराठ्यांचा राजकीय पक्ष बांधण्याच्या गोष्टी करतात. यावरून औरंगाबादच्या शिवसेनेतील मराठा व मराठेतर शिवसेना अशा विभाजनाकडे सेनेची वाटचाल सुरू झाली. कारण कायगावची घटना पूर्वनियोजित होती का, असाही प्रश्न पडतो. कारण सेनेत नव्याने मोट बांधण्याची भाषा सुरू झाली आहे. वेगळ्या बैठका, मसलतींना वेग आला आहे. खैरेंविरोधी गटाची खदखद या निमित्ताने बाहेर येत आहे. सोशल मीडियातून फिरणारे संदेश शहरात आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या बैठका यामुळे संशयाचे वातावरण अधिक गडद होताना दिसते. सेनेचा आमदार खैरेंवर टीका करत स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा करतो, त्यावर पक्षश्रेष्ठी काही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही आणि स्थानिक पातळीवरही कोणी काही बोलत नाही. म्हणजे खैरेविरोधी मोट बांधणीला बाकीच्यांची मूकसंमती दिसते असेच चित्र आहे.

अंबादास दानवे यांनी पुढाकार घेऊन हर्षवर्धन जाधवांना शिवसेनेत आणले होते, आता त्यांनीच खैरेविरोधात आघाडी उघडली. त्यांना आता खासदारकीची स्वप्ने पडायला लागली, अशी चर्चा सेनेतच सुरू झाली. पक्षातील कुरघोडीच्या या राजकारणापासून आ. संजय शिरसाट, संदीपान भुमरे हे आमदारद्वय आणि माजी आमदार आर. एम. वाणी आणि प्रदीप जैस्वाल अलिप्त आहेत. महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, राजू वैद्य हे तीनही बिनीचे शिलेदार ‘कचऱ्यात रुतलेले’ असून, यातून बाहेर पडण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर दानवेंनी जोरदार शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला चित्रकला स्पर्धा आयोजित करून विक्रम नोंदविला. लोकसभेबरोबरच ते गंगापूर किंवा औरंगाबाद मध्य या विधानसभांवर डोळा ठेवून असल्याने विरोधक सावध झाले. एकूण काय तर गटबाजीला ऊत आला आणि अस्वस्थता वाढली आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंच्या कार्यक्रमांना खैरेंची सातत्याने दिसणारी गैरहजेरी बरेच काही सांगून जाते. मधूनच दानवेंच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारणारे खैरे दिसतात; पण सध्याच्या वातावरणाचा रंग पाहता हे आभासी चित्र वाटते. वास्तव वेगळेच आहे.

पक्ष बांधणीत जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्याची बांधणी दानवे यांनी केली आणि शहरातील प्रमुख खैरेंच्या पसंतीचे असले तरी उपप्रमुख दानवे गटाचे आहेत. जे दानवेंच्या पसंतीने नेमण्यात आले. प्रत्यक्ष फिल्डवर्क उपप्रमुख करतात आणि घरोघर जाऊन संपर्क ठेवण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. एका अर्थाने शहरातील संघटनेवर दानवेंचे अप्रत्यक्ष नियंत्रण दिसते. या उपशहरप्रमुखांच्या मुद्यांवरून औरंगाबाद शहरातील नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. नगरसेवक आणि शहरप्रमुखांच्या बैठकीला त्यांना बोलवू नका, अशी मागणीच आता नगरसेवक करत आहेत. ते नगरसेवकांच्या कामावर टीका करतात. त्यांच्या विरोधात माहिती पसरविण्याचा प्रयत्न करतात, असे आरोप परवा राजू वैद्य यांनी बोलावलेल्या बैठकीत झाले, तर नगरसेवक वॉर्डातील कामांबाबत विश्वासात घेत नाहीत, असा आरोप या उपप्रमुखांनी केला. शहरामध्ये संघटना मजबूत करण्याची जबाबदारी उपप्रमुखांची असली तरी ते माघारी नगरसेवकांचीच टिंगलटवाळी करतात, असाही आरोप केला जातो. एकूणच संशय पिशाच्याने शिवसेनेत गोंधळ घातला आहे. शिवसेनेतील ही खदखद वेगवेगळ्या रूपाने बाहेर येत असताना आम जनता नाराज आहे. कचरा, पाणी, रस्ते हे प्रश्न सेनेला आता अडचणीचे झाले आहेत. कचऱ्यामुळे शहरातील देशभर बदनामी झालीच; पण नागरिकही वैतागले आहेत. त्यांच्या या नाराजीला नगरसेवकांना वॉर्डांमध्ये सामोरे जावे लागते. कोणत्याही शहरात नाही एवढी जबर पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नाही, हा राग लोकांच्या मनात आहे. आता तर कचऱ्यासाठी १ रुपया रोजाप्रमाणे ३६५ रुपये वेगळाच कर आकारण्याचा महापालिकेचा इरादा स्पष्ट झाला. या सगळ्या गोष्टी नागरिकांना वेठीला धरल्यासारख्या वाटतात.

मराठा आरक्षणात बळी गेलेल्या काकासाहेब शिंदे आणि प्रमोद होरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी परवा पालकमंत्री दीपक सावंत गुपचूप येऊन गेले. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत याची आठवण झाली. त्यांची मुदत संपली असली तरी पुन्हा निवडून येण्यासाठी सहा महिन्यांची मुदत आहे. परवा ते एकटेच आले, ना कोणाला निरोप ना फोन या कुटुंबियांचे सांत्वन करून ते निघूनही गेले. त्यांच्यामुळे जिल्हा विकास बैठक खोळंबली आहे. २ जुलैपासून बैठकच झाली नाही. ते पदावर आहेत की नाही अशा गोंधळात सगळेच आहेत. शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्या मोबाईलवरून गेल्या दोन महिन्यांपासून अश्लील संदेश येत असल्याची तक्रार पक्षातील एका महिला पदाधिकाऱ्याने केल्यामुळे खळबळ उडाली. यावर माने यांनी फेसबुक खाते हॅक झाल्याचा खुलासा केला. या घटनेमागचे नेमके सत्य काय? की निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू झाल्याने कोणाला अण्णासाहेब माने यांचा ‘पतंग’ कापायचा आहे? पण कोणीच बोलत नाही, शिवसेनेत सन्नाटा आहे.

Web Title: Silence in the Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.