भोगले जे दु:ख...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 07:36 PM2018-05-26T19:36:52+5:302018-05-26T19:41:14+5:30
दिवा लावू अंधारात : आयुष्य म्हटले,की सुखदु:खाच्या पाठशिवणीचा खेळ. कधी ऊन तर कधी सावल्या. कधी हार तर कधी प्रहार. आयुष्याकडे पाहण्याचा आपला प्रत्येकाचा असाच सर्वसाधारण दृष्टिकोन. पुष्कळांचे आयुष्यही याच नियमाने कडीला जाते. म्हणून या म्हणी सर्वमान्य झालेल्या; पण यालाही अपवाद असणाऱ्या कितीतरी घटना रोज आपल्या अवतीभोवती घडत असतात. मात्र, आपण त्याकडे खोलवर डोकावून पाहत नाही म्हणून त्यांचे आयुष्यसुद्धा आपल्याला फार काही वेगळे वाटत नाही. तीन-तीन पिढ्या ऊन डोक्यावर घेऊन अंधारात चाचपडत चालणाऱ्या या परिवाराला कधी विसाव्यासाठी तरी सावली मिळते का? घनघोर अंधारात चाचपडत चालणाऱ्या त्यांच्या आयुष्याला कधीतरी प्रकाशाचा एखादा किरण मिळतो का? याचा विचार आपण कधी करीतही नाही. आपल्या आयुष्यात हे असेच आहे. जे समोर आलेय ते भोगत राहायचे. सुखाची कधी ओळख झाली नाही तरीही चोवीस तास राबत आलेला दिवस मागे टाकत रटाळ आयुष्य जगत राहायचे, तेही विनातक्रार. रोजच्या दु:खात डुंबून जाऊन हे लोक आयुष्यात इतके निराशावादी होतात, की कुठले स्वप्नही यांना कधी पडत नाही.
- दीपक नागरगोजे
पाटोदा तालुक्यातील चुंबळी नावाचे एक गाव. बालाघाटाच्या खोऱ्यात वसलेले. गावात कायम दुष्काळ. ८० टक्के गाव पोटपाण्यासाठी साखर कारखान्यावर ऊसतोडीला किंवा जमेल तेथे रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होणारे. याच गावातील ही गोष्ट. मारुती शाहूराव डिडूळ युवक याच गावातील रहिवासी. मारुतीला आणखी दोन मोठे भाऊ. शाहूराव आणि लक्ष्मी या ऊसतोड कामगार आई-वडिलांच्या पोटी मारुतीचा जन्म झाला. उसाच्या फडात आई-बापाच्या मागे फिरत मारुती चार वर्षांचा झाला आणि नियतीने डाव साधला. पत्नी आणि तीन मुलांचा सांभाळ करणारे वडील शाहूराव एका आजारात सापडून देवाघरी निघून गेले. तीन लेकरांची जबाबदारी लक्ष्मीबाई यांच्यावर आली.
नियतीने केलेला आघात कितीही मोठा असला तरी तो निमूटपणे सहन करीत जगण्याशिवाय पर्याय नसतो. लक्ष्मीबाईचेही तेच झाले. तीन मुले आणि संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्या कंबर बांधून उभ्या राहिल्या. तीन लेकरांना बरोबर घेऊन ऊसतोडीला जाऊ लागल्या. मोठी दोन भावंडे आईला मदत करीत. कुणाचेही शिक्षण झाले नाही. परिस्थितीने त्यांना शिकू दिले नाही. पुढे मोठा मुलगा नागृ आणि मधला दादा या दोघांचेही लक्ष्मीबार्इंनी बालविवाहच लावून दिले. दोन सुना घरात आल्या; पण दुर्दैवाने दोघींचे पटले नाही. इच्छा नसताना त्या दोघा भावांनी वेगळ्या चुली मांडल्या. चौदा वर्षांच्या मारुतीला बरोबर घेऊन लक्ष्मीबाई वेगळ्या राहू लागल्या. लक्ष्मीबाई आणि मारुती ऊसतोडीला जाऊन आपला प्रपंच चालवू लागले. पतीचे सुख नाही. पुढे सुना, नातवंडांत आनंदाने राहण्याचे दिवस आले, तर मुले आईपासून वेगळी निघाली. दु:ख काही लक्ष्मीबार्इंची पाठ सोडायला तयार नव्हते.
पुढे मारुती अठरा वर्षांचा झाला. लक्ष्मीबार्इंना वाटले आता याचे लग्न करूया. एकटाच असल्याने आपण सुनेबरोबर एकत्र राहू. तालुक्यातील पारगाव येथील सुनीता नावाच्या मुलीशी मारुतीचे लग्न ठरले. सुनीताची कथाही मोठी काळजाला चिरणारी. ती पाच वर्षांची असतानाच तिच्या आईने जाळून घेऊन आत्महत्या केलेली. वडील आणि सावत्र आईने सुनीताला वाढवले. चौदा वर्षांची असताना तिचे मारुतीबरोबर लग्न करून दिले. आता मारुती, सुनीता आणि लक्ष्मीबाई एकत्र राहत. तिघेही ऊसतोडीला एकाच कारखान्यावर जात. थोडे बरे चालले होते. त्यातच लक्ष्मीबार्इंना गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेरच्या स्टेजवर असताना दवाखान्यात दाखविण्यात आले. खूप खर्च करूनही कर्करोगाच्या तावडीतून त्यांना सोडवणे शक्य झाले नाही. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. आयुष्यभर दु:ख सहन करीत कर्जाच्या ओझ्याखाली जगलेल्या लक्ष्मीबाई दवाखान्यासाठी केलेल्या कर्जाचा डोंगर मागे ठेवून निघून गेल्या. आयुष्यभरात क्षणभर विश्रांती या माऊलीला कधी मिळाली असेल? आयुष्यात आलेल्या संकटाची तक्रार ज्याच्याकडे करावी, अशी एखादी तरी जवळची वाटणारी व्यक्ती भेटली असेल का तिला?
पुढे मारुती आपल्या पत्नी सुनीतासोबत कारखान्यावर जाऊ लागला. या सात वर्षांच्या काळात त्याला शिवाजी (५) आणि वैभव (१), ही दोन गोंडस मुले झाली. कारखान्यावर जाताना ते आपल्या दोन छोट्या मुलांनाही घेऊन जात. आपल्या आयुष्यात ज्या दु:खाने थैमान घातले ते या लेकरांच्या बाबतीत घडू नये, अशी त्यांची अपेक्षा. आपण संपूर्ण आयुष्य ऊस तोडला तरीही हे कर्ज फिटू शकत नाही, असे सुनीताला वाटायचे. दोघेही मानसिक त्रास करून घेत असत; पण उपयोग होत नव्हता. काही विकून भरपाई करावी, तर माळरानावर बरड-भरडी दोन एकर जमीन. तिला कोण घेणार?
आई जाऊन दोन वर्षे झाली होती. यावर्षी कारखान्यावर जायचे आठ दिवसांवर आले होते . मुकादमाने मागील वर्षी दिलेली उचलच फिटलेली नव्हती म्हणून यावर्षी फिरलेली रक्कम वजा करून तुटपुंजी रक्कम मुकादमाने हवाली केलेली. तेही पैसे देणेकऱ्यांना देऊन टाकले. आता पुढील वर्षभर करायचे काय? खायचे काय आणि पैशावाल्या लोकांना द्यायचे काय, याच विवंचनेत दोघे होते. कर्ज आणि जगण्याच्या चिंतेने ग्रासलेल्या सुनीताला डोक्यावर असणारा भार हलका करण्याची घाई झाली आणि या विवंचनेतून कायमची सुटका करून घेण्यासाठी आईच्याच मार्गावर जाणे तिला सोपे वाटू लागले. कारखान्यावर जाण्याच्या तयारीत असणारा मारुती दिवसभर काम करून घरी आला. त्याने सामानाची जुळवाजुळव केली. कारखान्यावर घेऊन जाण्यासाठी आणलेली रॉकेलची कॅन त्याने घरातील एका कोपऱ्यात ठेवली. जेवण केले आणि तो झोपण्यासाठी घराशेजारील मोकळ्या जागेत जाऊन आडवा झाला.
मारुतीने आणून ठेवलेल्या रॉकेलच्या कॅनवर तिची नजर खिळली होती. दोन छोट्या गोंडस लेकरांचा कसलाही विचार न करता तिने सरळ ती कॅन उचलली व अंगावर घेतली. काडी लावत स्वत:ला पेटवून घेतले. एकच भडका आणि जोराच्या किंकाळ्या ऐकू आल्याने मारुती जागा झाला शेजारी लोक धावत आले. पाणी टाकून तिला विझविले; पण सुनीता तोपर्यंत ९३ टक्के भाजली होती. पाटोद्याच्या रुग्णालयात तिला भरती करण्यात आले. पुढील दोन दिवस ती जगली. पोलिसांनी तिचा जबाब घेतला, तर या घटनेस कुणालाही जबाबदार धरू नये, असे तिने सांगितले. आपल्या आईच्या मार्गावर तिने या जगाचा निरोप घेतला.
सुनीता गेली; पण दोन चिमुकल्या जीवांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण करून. काही दिवसांत ही घटना शांतिवनचे कार्यकर्ते धर्मा सानप आणि सतीश शेळके यांना समजली. त्यांनी मला सांगितले. आम्ही मारुतीच्या घरी गेलो त्याला संस्थेची माहिती दिली. आम्ही वैभव, शिवाजी या लेकरांना शांतिवनमध्ये घेऊन आलो. मारुतीलाही नंतर बोलावून घेतले. अडीच वर्षांचा वैभव, साडेसहा वर्षांचा शिवाजी आता शांतिवनमध्ये गुण्यागोविंदाने राहत आहेत. माझी आई आता वैभवची आई झालीय. तिच्याचकडे तो असतो. अक्का-अक्का करीत मागे-पुढे फिरत राहतो. हसतो-खेळतो. शिवाजी शाळेत जातोय. मस्त शिकतोय, तर मारुतीला शांतिवनच्या शेती प्रकल्पात कामावर घेतलेय. त्याच्याही मजुरीचा आणि पोटाचा प्रश्न सुटून गेला.
( deepshantiwan99@gmail.com )