चकलांब्यातील मंदिर व मठसंपदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 07:24 PM2018-04-16T19:24:19+5:302018-04-16T19:25:49+5:30
स्थापत्यशिल्प : चकलांबा हे चमत्कारिक नावाचे गाव बीड येथील गेवराईच्या पूर्व दिशेला आहे. गावाच्या विविध दिशांना यादवकालीन व उत्तर यादवकालीन मठ आणि मंदिरे विखुरलेली आहेत. गावाच्या गल्ल्यांमधून फिरताना आपल्याला गावाच्या प्राचीनत्वाची प्रचीती पदोपदी येते तसेच काही मठांमधील जिवंत परंपरांचे दर्शन घडते. गावाच्या मधोमध वाहणारा एक ओढा, चकलांब्याची जुनी आणि नवीन वस्ती, असे दोन भाग करतो. रोकडेश्वराचे मंदिर हे एक उंच गढीवजा उंचवट्यावर बांधलेले आढळते. प्रशस्त पायऱ्यांनी उंच आडवा पांढरीचा बुरुज न्याहाळत आपण या वास्तूत प्रवेश करतो. रोकडेश्वराच्या वास्तूच्या प्रवेशापाशी एक मोठा यादवकालीन स्तंभयुक्त प्रवेश मंडप आहे. बहुतांशी स्तंभांवर भारवाहक किचक व नाग कोरले आहेत; पण एका स्तंभांवर नरसिंहाचे वेगळे अंकन आहे.
- साईली कौ. पलांडे-दातार
आज गावकऱ्यांनी मारुतीचे मंदिर बांधलेले असले तरी ही मूळची मठस्थापत्याची सर्व वैशिष्ट्ये एकवटलेली वास्तू आहे. याचे संशोधन आणि आरेखने करण्याचे महत्त्वाचे काम डॉ. पाठकांनी केले आहे. आज तीन बाजूंनी ओसरीवजा स्तंभयुक्त दालने आणि विविध आकाराच्या खोल्या इथे आढळतील. त्यातील पूर्व बाजूस मध्यभागी सभामंडप-अंतराळ- गाभारा असलेली मंदिरासारखी वस्तू आहे व दोन्ही बाजूला स्वतंत्र प्रवेश असलेली दालने आहेत. मंदिरासमोरील स्तंभांवर चामुंडा, भैरव, शैव योगिनी अशी शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच, हंस, कीर्तीमुख, हत्ती, सिंह रानडुक्कर शिकारीची दृश्ये, द्वंद्व करणाऱ्या मनुष्याकृती, हत्तीशी लढणारे वीर, अशी शिल्पे आढळतात. तसेच गणपती, हार घेतलेले विद्याधर, अंजनी मुद्रेतील व्यक्ती, वादक यांची ही चित्रे, स्तंभांच्या चौकटीत कोरली आहेत.
एका वैशिष्ट्यपूर्ण दालनासमोर आज चार रिकामी देवकोष्टे दिसतात तसेच गणेशयुक्त द्वारशाखेवर सिद्ध योगीचे अंकन आहे. तेथील बाहेरील स्तंभांवर सरस्वती, प्रसूत होणारी स्त्री, गज अशी शिल्पे आढळून येतात. एक स्तंभावर गद्धेगाळ (स्त्री व गाढव) असे अंकन असून ‘सीम’ अशी देवनागरी शिलालेखाची अक्षरे दिसतात. दानलेख कोरण्याची ही सुरुवात असावी, असे वाटते. आतील मंडपातही रिकामी देवकोष्टे आहेत व स्तंभांवर योगीचे अंकन आहे. हे गर्भगृह नसलेले दालन बहुधा मठाधिपतीचे निवासस्थान असावे.
इतर दालनांच्या द्वारशाखा साध्या आहेत व त्या समोरील खांबांवर शिल्पांकन नाही. दक्षिणेकडील ओसरीला समांतर एक अंधारी लांब खोली आहे व तिला चिंचोळ्या खिडकीतून प्रवेश आहे. अशा जागांना पेव म्हणतात व त्या शस्त्रास्त्रे किंवा धान्य साठवण्यासाठी मुद्दाम ठेवलेल्या असतात. याच बाजूला मोठे दगडी कोरीव पाणी साठवायचे भांडे आहे, याला कोटंबी म्हणतात. तसेच, एक तेलाचा दगडी घाणाही दिसतो. कधी काळी चार बुरुजांमध्ये स्थित ही वास्तू चारही बाजूने खांब व दालनांनी बंदिस्त होती; पण उपेक्षेमुळे व गावकऱ्यांनी केलेल्या बदलांमुळे आज फक्त प्रवेशमंडप, पूर्व व दक्षिण बाजू शिल्लक आहे. या मठ मंदिर वास्तूवर मूळचे शिखर नसावे, तसा प्रघात नाही. नंतरच्या काळात कधीतरी त्यावर पांढरीची माती टाकली गेली असावी, जी अजूनही दिसून येते. संप्रदायाचे मंदिर, मठाधिपती निवास, व्याख्यान-साधनेची जागा, इतर निवास, पाण्याची सोय अशी ही परिपूर्ण सांप्रदायिक वास्तू आहे.
या खेरीज, गावाच्या,दक्षिण बाजूस महानुभाव व वारकरी मठ आहे. एक उंच प्रकारात, घुमट व मिनार असलेले मध्ययुगातील विठ्ठलाचे मंदिर व चक्रधरांचा ओटा आहे. परिसरात काही समाध्या दिसून येतात. चकलांबा गावाच्या बाहेर, पश्चिमेस देवतळ्यापाशी, पांचलेश्वर महादेव हे उत्तर यादवकालीन मंदिर आहे. स्वतंत्र नंदीमंडप असून, मंदिराच्या बाह्यभागावर शिल्पांकन नाही. गाभाऱ्यातील शिवलिंग व देवकोष्ट्यातील उमा महेश्वर आलिंगन मूर्ती वगळता दुसरे शिल्प नाही. प्रांगणात साधूंच्या ध्यानधारणेसाठी एक प्रशस्त घुमटाकार तळघरवजा खोली असून जिन्यातून त्यात उतरता येते. रत्नेश्वर मंदिर हे तळ्याकाठचे त्रिगर्भी उत्तर यादवकालीन मंदिर आज आतून बाहेरून रंगवलेले आहे. तीनही गर्भगृहाची आधुनिक शिखरे लांबून उठून दिसतात. अर्धखुला सभामंडप असून मध्यभागी चौकोनी चंद्रशीला आहे. मंदिराच्या सभामंडपात स्थानक विष्णू, उमा महेश्वर आलिंगन मूर्ती, विष्णू लक्ष्मी, काही विरगळ स्थानापन्न आहेत, तर मुख्य गर्भगृहात शिवलिंगामागे उमामहेश्वर आलिंगन मूर्ती व ब्रह्मा सरस्वती अशा तीन ओबडधोबड मूर्ती आहेत. हे उत्तरयादवकालीन मंदिर आहे. गावाच्या मध्यभागी दुरुस्त केलेल्या दोन मंदिरात अजून काही वीरगळ, उमा महेश्वर मूर्ती, उत्तर चालुक्य काळातील गणेश मूर्ती, विष्णू लक्ष्मी, भैरव, वीरगळ, महिषासुरमर्दिनी, मंदिराचे नक्षीदार दगड बसवले आहेत.
गावाच्या दक्षिणेला एक दगडी प्रकारात इस्लामी बांधणीचे महादेव बाग नावाने ओळखले जाणारे मंदिर आहे. या मंदिराशेजारी एक सुंदर कमान असलेली पायऱ्यांची बारव आहे. बाहेरील बाजूस दोन प्रशस्त व सुंदर नक्षीकाम असलेल्या मध्ययुगीन समाध्या आहेत; पण त्या कोणाच्या आहेत हे कळू शकले नाही. चकलांबाच्या इतिहासात चालुक्य काळापासून सुरुवात होऊन यादव व उत्तर यादव काळात धार्मिक परीघ विस्तारताना दिसतो. मध्ये संक्रमणाच्या काळात काही वास्तू नष्ट झालेल्या असून, मध्ययुगातील वारकरी व महानुभवी संप्रदायाची घडी बसलेली दिसते. आजचे चकलांबा जरी आडबाजूचे गाव असले तरी उत्तर यादव काळात हे एक गजबजते धार्मिक महत्त्वाचे केंद्र असावे, अशा लहान गावांमधील मंदिर, वाडे, पाण्याची साधने, पांढरीची टेकडे, नगररचनेचा अभ्यास केल्यास आपल्याला गावचा ऐतिहासिक आणि भौगोलिक आलेख मांडता येतो. शिलालेख व कुठल्याही लिखित पुराव्याअभावी अनैतिहासिक समजल्या जाणाऱ्या गावांचा ‘दगड मातीचा इतिहास’ धुंडाळण्याची गरज आहे. तो तिथल्या रहिवाशांपर्यंत नीट पोहोचल्यास आपल्या वस्तीस्थानाकडे बघण्याची त्यांची दृष्टी अधिक प्रगल्भ आणि जबाबदारीची होईल!
( sailikdatar@gmail.com )