जावे त्यांच्या वंशा...!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:55 PM2018-06-16T18:55:49+5:302018-06-16T18:55:49+5:30

वर्तमान : शेतकरी संपाची देशभर चर्चा सुरू आहे. संपाचा प्रकार शेती-माती समूहातील माणसांना नवाच. संप भांडवली विश्वाचे अपत्य. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या उक्तीप्रमाणे राबणाऱ्या कष्टकरी समूहाला या अपरिचित गोष्टी आपल्याही अंगाला कधी काळी येऊन शिवतील असली साधी शंकाही आली नसेल. आंदोलने वगैरे यांच्या पलीकडे संपावर जाणे हे जरा तसे ‘जड’ किंवा शक्य नसलेला प्रकार. परंतु तोही दिवस गेल्या वर्षी उजाडला.

They should be their descendants ... !! | जावे त्यांच्या वंशा...!!

जावे त्यांच्या वंशा...!!

googlenewsNext

- गणेश मोहिते

मान्सून येण्याच्या काळात संपाची हाक दिली गेली. शेतकरी संपावर कसा जातो ही अशक्यप्राय गोष्ट; म्हणून कुतूहलाची ठरली. चर्चा झाली, निवली, त्या संपावर सोईस्कर ‘बोळा’ फिरविला गेला. राजकीय तोंडानी फक्त ‘वाफा’ तितक्या दवडल्या. कर्जमाफीत लबाडी केली. विषय संपला असा ‘आभास’ निर्माण केला गेला.  सलग दोन वर्षे  पाऊसपाणी बरा असूनही शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत गेला. हा विरोधाभास कुणाच्या नजरेतून सुटेल. सगळं अलबेल असताना देशभरातील तेवीस राज्यांतील शेतकरी संप वगैरे असले उपद्व्याप फक्त प्रसिद्धीसाठी करतात असे म्हणायचे का? की राज्यकर्त्यांना या समूहाचे प्रश्न समजून घ्यायचेच नाहीत नेमके काय? हा प्रश्न उरतोच...!

खरे पाहता गेल्या चार वर्षांत केंद्रातील सरकार शेतकऱ्यांविषयी निष्क्रिय आहे, हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आली. त्या अगोदर सगळेच अलबेल होते असे समजायचे कारण नाही; पण ‘दगडापेक्षा वीट मऊ’ इतकेच. या न्यायाने वर्तमानात शेतकऱ्यांची व्यथा या चार वर्षांत देशाच्या प्रमुखाने कधी सार्वजनिकरीत्या ऐकली किंवा त्यांच्याशी प्रचार सभा वगळता दुहेरी संवाद साधला असे चित्र दृष्टीस पडले नाही. अर्थात काहींना ते स्वप्न सिद्धांताच्या पातळीवर अनुभवयास मिळाले असेलही. परंतु अशा सिद्ध साधकभक्ती सिद्धांताच्या आकलनाचा आपला आवाका नसल्याकारणाने व दृश्य चित्रावरच आपला विश्वास असल्याने हे संवादी चित्र दृष्टीस पडले, असे ठामपणे म्हणू शकत नाही. त्यांच्या परदेशगमनातील सातत्याने हे शक्य झाले नसेलही कदाचित; हे ही आपण समजून घेऊ शकतो. परंतु आज संघटनांच्या मांडवाखाली एकवटून आक्रोश करणाऱ्या कष्टकऱ्यांना हे कोण आणि कसे समजवणार! एक तर ते संघटित होऊन प्रश्न विचारत आहेत हेच गैर ना? अर्थात बिनबोभाट, मूकपणे सहन करण्यापलीकडे त्यांनी अगदी संप वगैरे असली ‘डावी’ भाषा बोलणे हा तर मोठा अनर्थच की हो! 

हा अनर्थ वाटणाऱ्यांना या प्रतीकात्मक कृतीचा उद्याच्या काळात खोलवर होणारा परिणाम कळण्यासाठीचे शहाणपण या व्यवस्थेत असायला हवे असते. ते जर नसेल तर मग ‘शेतकरी संप’ वगैरे ही ऐतिहासिक घटना किंवा भविष्यातील विपरीत संघर्षाचे सूचन असे काही न वाटता हा प्रसिद्धी स्टंट वाटू शकतो. जसा तो आपल्या कृतिशील (?) केंद्रीय कृषिमंत्र्यांना या समयी वाटला. खरं तर यापेक्षा मोठे देशातील शेतकऱ्यांचे दुर्दैव असू शकते काय! ज्या माणसावर या समूहाचे प्रश्न समजून घेण्याची, त्यांचा आक्रोश का निर्माण होत आहे? त्याचा अन्वयार्थ लावणे, त्यामागील कारणं शोधणे व त्यानुसार धोरणात्मक बदल करून देशाचे कृषी धोरण ठरवायची संवैधानिक जबाबदारी खांद्यावर असताना. असा माणूस जबाबदारी झटकून हा मूठभर शेतकऱ्यांचा प्रसिद्धीचा खटाटोप म्हणून आंदोलनाची संभावना करीत असेल; तर ही कृषक समूहाची ‘हेटाळणी’ नाही का?  

देशभरात शेतकऱ्यांच्या विविध संघटना आहेत. भल्या त्या वेगवेगळ्या विचारधारा, प्रवाह अथवा पक्षांची बांधिलकी मानणाऱ्या असतीलही. परंतु त्या मांडत असणारे प्रश्न, हे तर शेती-माती, कष्टकरी वर्गाशी निगडितच आहेत ना. हे प्रश्न समोर कोण मांडते, यापेक्षा ते प्रश्न, समस्या काय आहेत? हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे नाही का? अमुकतमुक संघटना ते विषय लावून धरत आहेत म्हणून, ते विषय दुर्लक्षून कसे चालतील? परंतु गतवर्षीच्या शेतकरी संपाच्या वेळी आणि आताच्याही शेतकरी संप, आंदोलनाच्या मागे विरोधी पक्ष आहे, ते काय खरे शेतकरी आहेत काय? असे म्हणून राज्यकर्ते वेळ मारून नेत असतील तर त्यांच्या नियतीवर शंका घेण्यास जागा आहे. त्यामागील कारण, वेदना समजून न घेता, त्याचं सोयरसुतक न मानता, उलट त्यांच्यासाठी होणाऱ्या आंदोलनाला पाठ दाखवून, त्यास प्रसिद्धी स्टंट  म्हणून कोणी हिणवत असेल, तर ही  मानसिकता कष्टकऱ्यांच्या आक्रोशला अधिक कारणीभूत आहे.

म्हणून....या बुडबुड्यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन कधी तरी या कष्टकरी समूहाच्या यातना समजून घेता येतील का? शब्दांचे फुलोरे करून किंवा नुसत्या शाब्दिक डरकळ्यांनी हे प्रश्न सुटणार नाहीत. हे यांना कधी कळेल काय? देशभरात शेती व शेतीवर अवलंबून असलेली व्यवस्था मोडकळीस आली असताना तुम्ही धोरणकर्ते मात्र ‘शुशेगाद’आहात. उलट रोज रंगीबेरंगी कपडे घालून चंदेरी दुनियेतील माणसांच्या पुढे एक पाऊल टाकायला तुम्ही सरसावलात. तुम्हाला उद्ध्वस्त होत जाणाऱ्या कष्टकरी समूहाच्या यातना जाणिवेच्या पातळीवर स्पर्श करतील असे आताशा वाटत नाही. ‘गर्दीचा गहिवर टिपून समूहाचा चेहरा बनायला ‘गर्दीची स्पंदनं टिपता आली पाहिजेत. लाखो लोकांचा वेगवेगळ्या पातळ्यांवर चाललेला आक्रोश मनाला छेदून गेला पाहिजे तुमच्या.

‘रक्ताचे पाणी अन् घामाची माती’ करून पिकवलेले रस्त्यावर ओतून तुमच्या नावाने ‘शिमगा’ करताना त्या कष्टकऱ्याच्या मनाला होणाऱ्या वेदनांनी काळीज चिरत गेलं पाहिजे तुमचे. वातानुकूलित वातावरणात बसल्यानंतर त्याच्या व्यथा, वेदनांचा विसर पडत असेल तर तुमचा ‘पाषाण’ झाला समजावे का? पण  पाषाणालाही एक वेळ पाझार फुटतो म्हणे; कारण तोही मातीच्या पोटातूनच आल्याची खुणगाठ पक्की ठेवतो मनाशी.. आपण मात्र बदलतो रंग सरड्यासारखा, बदलतात आमचे प्राधान्यक्रम. भाषणात तितके गर्जतो आम्ही. कृतीत मात्र शून्य. मागे फक्त संभ्रम. दिवसेंदिवस ‘बळी’ पातळात गेला काय, आणखी काय! त्याचे हे सनातन दु:ख यांना कळणारही नाही. कारण तुकोबांनी सोप्या शब्दात नोंदवलं.

‘साखरेची चव मुंगी कैसे चाखे। जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे।।

कासवाची पिले दूध कैसे पीती। जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे।।

पाण्यातला मासा झोप घेतो कैसा। जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे।। 
 

( dr.gamohite@gmail.com )

Web Title: They should be their descendants ... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.