बुद्धाच्या उंबरठ्यावर !!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:22 PM2018-05-05T18:22:27+5:302018-05-05T18:23:50+5:30
प्रासंगिक : एकदा महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी ‘खरं तर मला बुद्धाच्या काळात जन्माला यावयास पाहिजे होतं. मग मला बुद्धाशी नियमितपणे संवाद साधायला मिळाला असता!!’ अशी खंत जाहीरपणे व्यक्त केली होती. तसे पाहिले तर बुद्ध आणि टागोर यांच्यामध्ये जवळपास २५०० वर्षांचे अंतर!! एकाने मानवी जीवनातील दु:खाची पाळेमुळे शोधली. त्यावर उपाय सांगितला. स्वत: दिव्यज्ञान प्राप्त करून मुक्तीच्या प्रदेशात वावरला, तर दुसऱ्याने मानवी जीवनातील सौंदर्य कागदावर टिपले. जीवनातील मंगलाची पूजा मांडली. साहित्यातील नोबेल पुरस्काराने पायाशी लोळण घेतले अन् तरीही टागोरांना ही खंत होती. यावरून गौतम बुद्धाच्या विचारांचे महत्त्व आपल्या ध्यानी येते.
- विश्वास सोपानराव मुंडे
बुद्धाचे विचार कालातीत आहेत. कारण बुद्धाने मानवी जीवनाचा मूलगामी विचार केलेला आहे. बुद्धाने दु:खाचे स्वरूप, आपल्या जीवनात दु:ख का येते? ते दु:ख दूर करण्याचा मार्ग कोणता? आणि मध्यम मार्ग, ही चार थोर सत्ये (नोबल ट्रूथ्स) सांगितली आहेत. बुद्धाने सांगितल्याप्रमाणे सर्व दु:खांच्या मुळाशी लोभ (ग्रीड) असतो. आपल्याला आवश्यक आहे तितकेच घेणे ही प्रकृती आहे, तर गरजेपेक्षा जास्त साठा करणे ही विकृती आहे. बुद्ध सांगतो की, ही विकृती सर्व दु:खांचे मूळ आहे. मानवाने विकासाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी निसर्गाची बेसुमार हानी केली. पृथ्वी ओरबाडली अन् या लोभाचा दुष्परिणाम आता अखिल मानवी जात भोगत आहे. वाढत जाणारे तापमान, कुठे अतिवृष्टी, तर कुठे दुष्काळ, ऋतुचक्राची दिशा बदलून टाकणारे हवामान बदल, रोगराईच्या आणि युद्धाच्या विळख्यात सापडलेली मानवी जात, हे सगळे अविचारी माणसाच्या लोभामुळे घडत आहे. सारासार विवेकबुद्धी हरवून बसल्यामुळे आणि ‘स्व’च्या पलीकडे विचार करण्याची तयारी नसल्याने ही परिस्थिती जगावर उद्भवलेली आहे. अशावेळी बुद्धांच्या सम्यक विचारांकडे समाजाला वळावे लागते.
बुद्धाने सांगितलेले अष्टांगमार्ग मानवाला सगळ्या परिस्थितीत मार्गदर्शक आहेत. खालील अष्टांगमार्गाकडे दृष्टी टाकली तरी जगातील समस्यांचे निराकरण होईल, यात शंका नाही.
’ सम्यक दृष्टी (अंधविश्वासापासून व भ्रमापासून मुक्त असलेली दृष्टी)
’ सम्यक संकल्प (बुद्धिमान मनुष्याला योग्य असे उच्च विचार)
’ सम्यक वाचा (सत्ययुक्त, दयेने भरलेली आणि निष्कपट असलेली वाणी)
’ सम्यक कर्म (शांत, प्रामाणिक व शुद्ध असलेले कर्म)
’ सम्यक आजीव (कुणालाही दु:ख न देणारी व प्रामाणिक अशी उपजीविका)
’ सम्यक व्यायाम (स्वत:ला वळण लावण्याचा व स्वत:वर ताबा मिळविण्याचा प्रयत्न)
’ सम्यक स्मृती (मन नेहमी जागृत आणि सावध ठेवणे)
’ सम्यक समाधी (जीवनातील सत्याविषयी सखोल मनन-चिंतन करणे)
वरील अष्टांगमार्ग हा बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे. कोणत्याही व्यक्तीने, संस्थेने व देशाने निर्णय घेताना जर वरील अष्टांगमार्गाचा वापर केला, तर सर्व जग हे गुण्या- गोविंदाने पृथ्वीवर नांदेल. कारण अष्टांगमार्गाशी प्रामाणिक राहून घेतलेला निर्णय हा ‘सर्व-जन हिताय, सर्व-जन सुखाय’ या तत्त्वाने पालन करणारा असेल. जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही. दयाभाव चोहीकडे असेल. संसाधनांचा योग्य वापर होईल. सत्यान्वेषणाची प्रक्रिया सदैव सुरू राहील आणि एकूणच अखिल मानवाचे कल्याण आणि सत्य यांची प्रतिष्ठापना जगात होईल.माणूस हा बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मूलगामी चिंतन करून उपाय शोधण्याचे महत्कार्य बुद्धाने केले आहे. वरील अष्टांगमार्ग आपल्याला काय योग्य-अयोग्य आहे, हे समजण्यासाठी लागणारी सदसद्विवेकबुद्धीची जडणघडण करतात आणि अशा सारासार विवेकबुद्धीद्वारे माणूस जगाच्या हिताचे, सर्व मानवजातीच्या कल्याणाचे निर्णय घेत असतो.
खरंतर, जागतिकीकरणानंतर अधिकाधिक नफा आपल्याच देशाने कमवावा, अधिकाधिक संसाधनांवर आपला ताबा हवा, या महत्त्वाकांक्षेपायी आज जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात तर व्यापार युद्ध सुरू झाले आहे. रशिया आणि अमेरिका यांच्यात अजून एकदा शीतयुद्ध सुरू झाले आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने मध्य आशियातील नद्यांवर आपला ताबा मिळवला आहे. सत्ता मिळवण्यासाठी दहशतवादाने थैमान घातले आहे. एकूणच मानवी जात संकटात सापडली आहे. अशावेळी सगळे जग शांती नांदावी, यासाठीही प्रयत्न करीत असते. आपसूकच जगाचे लक्ष बुद्धाकडे वळते. कारण बुद्धाचे विचार शांतीचा संदेश देतात. अहिंसा आणि शांती ही जगाच्या उत्थानासाठी सर्वाधिक महत्त्वाची तत्त्वे आहेत, असे बुद्धाचे प्रतिपादन आहे.
युद्धाने समस्या सुटत नाहीत. किंबहुना अधिक जटिल बनतात. कारण युद्ध झाले तरी शांतीसाठी दोन्ही बाजूंनी संवाद साधला जातो. नेमके हेच सूत्र बुद्धाला उमगले होते. २५०० वर्षांपूर्वी जेव्हा रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून कोली आणि शाक्य यांच्यात युद्धसदृश परिस्थिती उद्भवली होती, तेव्हा बुद्धाने कोली आणि शाक्य यांचे समसमान प्रतिनिधित्व असणारा लवाद नेमावा आणि सामंजस्याने पाणी प्रश्न सोडवावा, असे सुचविले होते. या प्रसंगावरूनच बुद्ध हा काळाच्या फार पुढे होता हे कळते. आज राज्या-राज्यांमध्ये नदीच्या पाण्यावरून संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या परिस्थितीत बुद्धाने सांगितलेल्या सामंजस्यपूर्ण भूमिकेची गरज आहे. जगात तिसरे महायुद्ध हे पाण्यावरून होईल, अशी भाकिते केली जात आहेत. हे भाकीत खरे ठरेल की काय, अशी परिस्थिती उद्भवलेली असताना, बुद्धाने सांगितलेल्या सामंजस्याच्या मार्गावरून जग चालले नाही, तर काय होईल, याची फक्त कल्पनाच केलेली बरी.एकूणच, मानवता, करुणा आणि अहिंसा हेच सर्व व्यापार, राजकारण आणि परराष्ट्र नीतीच्या केंद्रस्थानी असावयास हवे. तसे असेल तरच जगामध्ये शांती प्रस्थापित होईल; अन्यथा तिसरे महायुद्ध व्हायला वेळ लागणार नाही, हे एव्हाना सगळ्यांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे आपल्याला आता बुद्ध शोधावा लागणार आहे. आचरणात आणावा लागणार आहे.
दैनंदिन जीवनात प्रज्ञा, शील आणि करुणा या महान तत्त्वांची अंमलबजावणी करावी लागेल. तरच समाजस्वास्थ्य चांगले राहील आणि समाज निकोप असेल, तरच देशात आणि पर्यायाने जगात अखिल मानवजातीचे शांतीपूर्ण सहअस्तित्व टिकेल. एकूणच, युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या जगाला बुद्धाच्या उंबरठ्यावर आणावे लागेल. तरच संपूर्ण पृथ्वीवर शांतता आणि करुणेची पौर्णिमा पाहावयास मिळेल. अशी पौर्णिमा उगवावी यासाठी प्रयत्न करण्याची सद्बुद्धी जगातल्या प्रत्येक माणसाला लाभो !!
(लेखक हे आयएएस अधिकारी आहेत.)