आनंदाचं झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 06:54 PM2018-02-17T18:54:56+5:302018-02-17T18:55:14+5:30

ललित : संक्रमण ऋतुंचं होतं तसं मनाचंही होतंच की.. संक्रांतीच्या मधुर मधाळ सवाष्ण क्षणांचं वाण लुटून झालं नि स्निग्ध उबदार स्नेहल पृथ्वीचा रंग पालटू लागलाय तसा मनाचाही.. रस्त्याच्या दुतर्फा नटून मुरडून उभी असलेली झाडं वाढत्या उन्हाच्या झळांनी निस्तेज वाटू लागतील आता येत्या काही दिवसात. हिरवागार साजशृंगार हळूहळू पिवळसर मातकट होऊ लागेल. चराचराची काहिली वाढत जाईल तशी मनाचीही वाढेलच.  गर्द हिरवेपणाला गहिरी मिठी देऊ पाहणारं मन उगाचंच अस्वस्थ उदास होतं या संक्रमणाच्या बोथट क्षणांमध्ये. 

Tree of Happiness | आनंदाचं झाड

आनंदाचं झाड

googlenewsNext

- ज्योती कदम

सृजनाचं वेड कुठे गळून जातं कुणास ठाऊक नि उरते फक्त विषण्ण काहिली. मनाचा कॅन्व्हास कोरा करकरीतही वाटत नाही अन् रंग-रेषांचं औत्सुक्यही उरत नाही. उत्कट प्रतीक्षेची अनावर ओढ संपते अन् विझू -विझू होत जातो मनाचा कण नि कण.. आठवांचा निष्पर्ण पसारा तेवढा विखरत जातो मनाच्या तळघरात. हाकेच्या कक्षेबाहेर पोहोचलेल्या आपल्या माणसांची आठव रेंगाळत राहते मनात.. मनातून डोळ्यांत. वाटतं, उठावं नि चटकन घुमवावा एखादा दूरध्वनी क्रमांक नि सांगत सुटावे जगण्याचे हाल त्या कक्षेबाहेरील माणसाला. पण असा कोणताच क्रमांक असे कोणतेच नेटवर्क नसतेच उपलब्ध तिथल्या माणसाला बोलता येईल असे. सगळी उन्हं अंगावर येतात नि वाटतं आपलं घर कायमचंच बांधलं गेलंय उन्हात. रेडिओवर आर्त गाणं चालू असतं ‘ना चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कोनसा देस..तुम चले गए..’ उन्हं भरून येतात मनात, डोळ्यात नि जगण्यातही. स्वत:ची सावली ही चक्क डोक्यावर येऊन थांबते. विलक्षण तगमग नि एकटेपणाची साथसंगत तेवढी जाणवत राहते. स्वत:चे श्वासही काजव्यासारखे बंदिस्त होऊन जातात स्वत:च्याच मनाच्या काडीपेटीत. श्वासांचा अंधुक प्रकाश तेवढा पेटीच्या फटीतून जाणवत राहतो.. अरेच्चा अजून जिवंत आहोत तर आपण!

ओह, याचाच अर्थ  लवकरच बदलणार आहे हा ही ऋतू.. याचीच खूणगाठ म्हणजे हे स्रवणारे निळसर प्रकाशतरंग. आता तर तग धरायलाच हवी नि स्वागतशील ही राहायला हवंच की परत नव्या ऋतुबदलाला.

बदलत जाणं हेच फक्त चिरस्थायी असतं हे समजून येतं जातं आपोआप जेव्हा पानं गळू लागतात.. फळं पिकून फळांच्या बिया करड्या होत जातात.. झाडाची साल खरबरीत होत जाते.. बुंध्याच्या आत वर्तुळावर वर्तुळ गिरवले जातात.. झाडाचं वय नेमकं किती असावं याचा अंदाज येत जातो ते या गोलाकार वर्तुळांनी. परत पटत जातो बदल हाच चिरस्थायी बाकी सगळं निमिषमात्र!

झाडावर उमलून वार्‍यासवे गुजगोष्टी करणार्‍या पाना-फुलांचं गिरकत मातीवर येऊन निर्माल्य होत जाणं मनाला घोर लावतं. खिन्नता दाटून येते चोहीकडे. नकोनकोसा होतो हा मातकटपणा. मग हळूच डोकावतं एक गुलाबीसर पोपटी छटेचं हिरवंसं पान कुण्या एका अज्ञात फांदीवर.. कौतुकानं निरखत पाहत राहिलं तर काही काळाने अशीच पोपटी चोंच हळुवार बाहेर काढत कितीतरी इटुकली पानं चिवचिवत असतात. एखादी कळी डोलावते मान या पानांच्या भाऊगर्दीत.. पाहता पाहता ऋतू कू स पालटू लागतो अगदी सहजगत्या. मनाचंही तसंच होऊ द्यावं. काळ्याकुट्ट मातकट रंगात नको जास्त गुंतून घ्यायला. त्यापेक्षा शोधत राहावा चिमूटभर हिरवेपणा. ऋतू पालटू देत कितीही आपणही झाड व्हावं. ‘ऋतू बदलला की पाखरं प्रदेश बदलतात, तू मात्र झाड हो कधीच न बदलणारं..’ तू म्हणतोस ना नेहमी! बघ माझं ही एक झाड झालंय..आनंदाचं झाड.

( Jyotikadam07@rediffmail.com )

Web Title: Tree of Happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.