दौलताबादचा अनोखा पैलू : जलव्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:26 PM2018-05-05T18:26:44+5:302018-05-05T18:28:02+5:30

स्थापत्यशिल्प : सर्वगुणसंपन्न दुर्गाधिपतीची प्रत्येक भेट ऐतिहासिक स्थापत्य शैलीतील नवनवीन आविष्कार समोर आणणारी असते. मागच्या लेखातून आपण किल्ल्याचा इतिहास पाहिला. सामरिक युद्धरचना, नगररचना पाहिली. या किल्ल्याबद्दल जितके लिहावे तेवढे थोडेच! आजच्या या दौलताबादसंदर्भातील शेवटच्या लेखामध्ये मध्ययुगीन स्थापत्यकारांच्या अशाच एका अप्रतिम रचनेविषयी... ते म्हणजे सध्याचा तुमचा-आमचा जिव्हाळ्याचा विषय.. जलव्यवस्थापन!!

The unique aspect of Daulatabad: water management | दौलताबादचा अनोखा पैलू : जलव्यवस्थापन

दौलताबादचा अनोखा पैलू : जलव्यवस्थापन

googlenewsNext

- तेजस्विनी आफळे

भारतातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरुवातीच्या मध्ययुगीन काळापर्यंत ही विविध प्रकारच्या विहिरी, तलाव, हौद अशा साठवणव्यवस्था प्रकारात मोडणारी होती. अगदी हडप्पा संस्कृतीतील धोलाविरा, लोथल शहरांमधील पाणी अडवण्याची व्यवस्था, पाण्याचे तलाव, जुनागढचा मौर्य काळातील सुदर्शन तलाव, विविध लेण्या-किल्ल्यांमधील पाण्याची टाकी, मंदिरांशी संलग्न हौद, पुष्करणी, सुरेख बारव अशी अनेक उदाहरणे आहेत. एका ठिकाणाहून दुसरीकडे पाणी वाहून नेण्यासाठी पाट, कालव्यांचा उपयोग केला जाई.

देवगिरी या समृद्ध यादव राजधानीतील पाणीव्यवस्थेचे दाखले नगरतलाव, पायऱ्या-पायऱ्यांच्या विहिरी आणि १९८०च्या दशकात झालेल्या उत्खननात अनेक घरांच्या अवशेषांमध्ये आढळलेल्या कूपिका दिसून येतात. याच काळात मुख्य किल्ल्यावरील कवडी आणि मोती टाकी खोदून पाण्याची तहान भागवली गेली असावी. पुरातत्व खात्याच्या एका नोंदीनुसार तर नंतरच्या काळातील एक शिलालेख सरस्वती विहिरीतील पाणी फक्त पिण्यासाठी असून इतर गोष्टींसाठी वापराची सख्त मनाई असल्याची ताकीद देतो.

पुढे काही दशकांत वेड्या महंमदाने आपल्या राजधानीसाठी परत एकदा या शहराला सजविताना अनेक प्रासाद, बागा, हौद, हमाम बांधल्याचे इतिहासात नमूद आहे. उत्तरेकडील डोंगरातून उतरणाऱ्या घळीतील पाण्यावर बांध घालून एका खाली एक तलाव बांधायचे कार्य महंमद तुघलकाचा भाऊ कुतलघ खानाने केले असा इतिहास संशोधकांचा होरा आहे. आपल्या सर्वांनाच ज्ञात असलेला आजचा मोमबत्ता तलाव अथवा अब-पाश- दारा या तीन तलावांतील सगळ्यात खालचा! उत्तरेकडील पठारावर परीयों का तालाबसह अनेक तलाव हारीने आहेत. ते अशा योजनेचे भाग असावेत का याबद्दल आपण आजतरी फक्त अनुमानच बांधू शकतो. लवकरच महंमदाला त्याची स्वप्नं आवरती घेऊन दिल्लीला परत जायला भाग पडले. त्यामागे दौलताबाद परिसरात सतत भासणारी पाणीटंचाई एक महत्त्वाचे कारण होते. बहामनी काळात राजधानी जरी नसली तरी दौलताबादचे महत्त्व कमी झाले नाही. किल्ल्याला वेढून असणाऱ्या पाण्याच्या संरक्षक खंदकाची निर्मिती याच काळातील असावी, असे मानले जाते.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला निजामशाही वजीर मलिक अंबरच्या काळात बांधला गेलेला पाणी संचय, पुरवठा आणि सुनियोजित वापर अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये जलभियांत्रिकीच्या ज्ञानाने उंची गाठली. औरंगाबाद शहर आणि येथील मध्ययुगीन जलव्यवस्थापन ही याच मुत्सद्यांची देण!
प्रचंड आकाराचा पाणी संचयासाठीचा हत्ती तलाव मलिक अंबरच्या जलव्यवस्थापनाचाच भाग. या काळात गुरुत्वाकर्षण तत्त्वाचा उपयोग करून खापराच्या नळातून महाकोट व कालकोटात पाणीपुरवठा केला गेला. नळव्यवस्थेचे भग्नावशेष आजही उच्छवासांच्या रूपात किल्ल्यात आहेत. अशीच पाणी पुरवठापद्धती अहमदनगर, बुºहाणपूर, बिदर, गुलबर्गा अशा दक्खनी सुलतानी शहरांत दिसते. महाकोटाच्या उत्तर भागात वसलेल्या बहामनी-निजामशाहीकालीन राजनिवासातील चार-बागा, कारंजी आणि हमाम सुनियोजित पाणी वापराची उत्तम उदाहरणं आहेत. हमाममध्ये शौचकुपासहित संपूर्ण इमारतीत आवश्यकतेनुसार खापरी नळांद्वारे केलेली गरम व थंड पाण्याची व्यवस्था हे येथील वैशिष्ट्य.

ज्या पाणीटंचाईला कंटाळून देवगिरीला राजधानी बनवायचं वेड्या महंमदाचं स्वप्न चौदाव्या शतकात अपूर्ण राहिलं, त्याच पाणीटंचाईचा सामना एकविसाव्या शतकातील दौलताबाद आणि परिसरही करीत आहेत. तुटपुंज्या पावसाच्या पाण्याचे उत्तम नियोजनाचे, जलअभियांत्रिकीचे अप्रतिम उदाहरण असणारी ही मध्ययुगीन जलव्यवस्था आज भग्नावस्थेत आहे. खरे तर, सतत मोठमोठ्या पैसे-वेळखाऊ प्रकल्पांमागे धावण्याआधी स्वत:ला तांत्रिकदृष्ट्या आधुनिक मानणाऱ्या आपल्यासाठी जाणिवा जागृत ठेवून आपल्याच ऐतिहासिक ठेव्याला पुनरुज्जीवित करणे हा ही एक उपाय आहे का...?

 ( tejas.aphale@gmail.com )

Web Title: The unique aspect of Daulatabad: water management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.