नसलेलं बेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 07:27 PM2018-04-09T19:27:08+5:302018-04-09T19:28:34+5:30
ललित : आभाळून जातं मन... सरी बरसाव्यात एवढं उत्कट वाटत नाही नेहमीच. हे कोंडलेपण सवयीचं होत जातं. मात्र, स्वत:चीच सवय होत नाही स्वत:ला. सूर्य-चंद्राचं धुपाटणं आलटून-पालटून दिवस ठरल्यावेळी उगवतो. मावळतो. येत राहतो तसाच जातोही दिवस. मनाचं पाजळणं थांबता थांबत नाही. कागदावर सांडावी शाई आणि ओघळ जावेत भरकटत तसंच मनाचं सांडणं कवितेच्या कागदावर. तेवढीच एक चिमूट चिमटीत येते बाकी सगळंच अर्धपारदर्शक... धुक्यासारखं!
- ज्योती कदम
खंत कशाची आणि उत्सव कशाचा काही केल्या कळत नाही. पंचमार्क नाण्यासारखे मनाचे भाव... उमटू पाहतं काहीतरी; पण कळतच नाही काही! पाऊस अस्सा खोल दाटतो मनाच्या तळाशी... थेंबाळू पाहतो पापण्यांतून; पण थेंबांचे पाय जडावतात... मणामणाचे साखळदंडच जणू पायांत.
हुरहुर सरसरून येणाऱ्या कोंबाप्रमाणे असते. ती अचानक उगवून येते मनात. सुप्तावस्थेतील असलं तरी बीजच ते. प्रचंड ताकदीनं अमाप ऊर्जेसहित ते अंकुरतं नि थेट भिडतं आभाळाला. जिव्हाळ्याचंही तसंच असतं. आतल्या बाहेरच्या सगळ्या पारदर्शक अपारदर्शक अस्तित्वाला पार भेदून थेट पोहोचवतं मनाला काळाच्या सीमेरेषेबाहेर.
‘तू मला जाणून घ्यायला हवंस...’ या वाक्यावर काय बोलावं? भूतकाळाचा तुकडा हवेनं तरंगत येऊन वर्तमानाला सांधत जातो या अशा जगावेगळ्या अंतर्भूत जाणिवांना जाणून घ्यायचं कसं? खरंतर कुणी आपल्याला जाणून घ्यावं ही आदिम सृजनभूक असावी कदाचित. म्हणून तर हा महाप्रवास... हा खटाटोप. कुणाचं दिसणं किंवा सोबत असणं एवढं पुरेसं असतं का जाणून घेण्यासाठी? कदाचित नाही. यापलीकडं पाहता आलं नव्हे; जाता आलं तर जाणता येईल. मनाच्या खोल तळपायऱ्या उतरत जाऊन स्वत:लाच पहिल्यांदा ओळखता यायला हवं. तेव्हा कुठं सुरू होतो समतल प्रवास दुसऱ्या कुणाला जाणून घेण्याचा... एक उगम... दोन प्रवाह. अनंत विस्तीर्ण अंतरावरून वाहणारे. तरीही समकालीन... समांतर...एकमेकांचा खल्लाळ स्वत:च्या कणाकणांत पेरत परत-परत त्याच त्या वळणांवर उगवत राहणारे. एकमेकांचा विस्तीर्ण विस्तार, सखोल प्रदीर्घ व्यामिश्रता, निरंतर तादात्म्य साधणारा वेग... कसा समजून घ्यायचा?
कोणत्या परिमाणात मोजून घ्यायची ही अंतरीची घालमेल? कसं लेवायचं हे परस्पर समरसतेच वल्कल नि तरीही कसं शाबूत ठेवायचं स्वत:चं अभिन्न अमूर्त अस्तित्व? प्रश्नांची ही मालिका नि उत्तरादाखल परत एक प्रश्नच... सृजनाच्या निरामय वाटेवर चालत राहावं आकाशातला ध्रुवतारा मनात नोंदवत. ज्याची त्याची रेष त्यानंच वाढवत. अतुलनीय परमसामंजस्याचं तेजाळ बोट मनावर लावावं कपाळावर अंगारा लावावा तसं. चिरशांतीच्या पलीकडची निरामय शांतता अनुभवत चालत राहावं आपापल्या रेषांची टोकं घट्ट मुठीत ठेवत. पोहोचू नक्कीच क्षितिजापल्याडच्या त्या ‘चाँद के पार..’
तोपर्यंत रेषांचं जाळं केवढं तरी पसरलेलं असेल; पण आपली रेष आपल्या घट्ट मुठीत शाबूत असेल. अशा नेमक्या वेळी दूरच्या बेटावरून ऐकू येईल साद... खूपशी अस्पष्ट; पण बरीचशी आश्वासक.. ‘चलो दिलदार चलो चाँद के पार चलो...’ लाटांच्या अशा धडकण्यानं पाण्यातल्या चंद्राला पार वितळून टाकावं. पाण्यातला चंद्र... त्याचं वितळणं... आणि अनिवार ओढीचं एक बेट... सगळं कल्पनेतलं. सांडलेल्या शाईतून वाहत आलेले हे ओघळ सोडले, तर बाकी सबकुछ झूठ!! चिरेबंदी जगण्यातला हा रेषांचा पसारा तेवढा खरा... या उंचच उंच भिंती... पण आभाळाचा तुकडा दिसता ठेवलाय कुणीतरी. तेवढाच प्राणवायू... दो बुँद जिंदगी के!! मनाचं पॅरॅलाईज होणं टळतं तेवढंच... सोबतीला परत तेच स्वप्नांचं कोंदटलेपण अन् नसलेल्या बेटाची ओढ!
( Jyotikadam07@rediffmail.com )