नसत्या उचापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 07:45 PM2018-07-14T19:45:02+5:302018-07-14T19:46:10+5:30

विनोद : आपले म्हणणे एवढेच असते की व्वा! जायचे तिथे जा, पण उगाच फोटो टाकून लोकांना हैराण करू नका. कधी कधी सोशल मीडियावरील पर्यटनाचे फोटो पाहून असे वाटते की भारत हा पूर्णत: विकसित देश असून, येथील लोक वर्षभर मजा आणि फक्त मजाच करीत असतात. 

useless work | नसत्या उचापती

नसत्या उचापती

googlenewsNext

- आनंद देशपांडे

सोशल मीडियाने गेल्या काही वर्षांत लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे हे निश्चित. सातत्याने अनेक लोक कुठे कुठे फिरत असतात. पूर्वी पर्यटन म्हणजे फक्त तीर्थक्षेत्रांना भेटी एवढेच मर्यादित होते, पण आजकाल समुद्रकिनारे, धबधबे असणारी ठिकाणे, कोकण, गोवा किंवा काहीच नाही जमले तर शनिवार, रविवार जवळपासचा एखादा पिकनिक स्पॉट, अशा ठिकाणी लोक फिरायला जात असतात. आपण सामान्य लोक बिचारे कसेबसे आयुष्य जगत असतो आणि अचानक बायकोची एखादी मैत्रीण फेसबुकवर किंवा व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर ‘सेल्फी फ्रॉम तारकर्ली बीच’ असा मनमोहक फोटो टाकते आणि आपल्या पोटात गोळा उठतो. कुटुंबाने ‘तो’ फोटो पाहिला की पहिली प्रतिक्रिया येते आणि ती म्हणजे, ‘तुम्हाला कशाचीच हौस नाही. लोक पाहा किती मजा करतात’.

आपण फेसबुक पाहावे तर आठ आठ जणांच्या टोळ्या कधी ठोसेघर धबधबा तर कधी मुरूड जंजिरा, कधी काशीद बीच तर कधी मीरामार बीच, असे फोटो टाकून आपल्याला हैराण करीत असतात. पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या आमच्या मराठवाड्यातील लोकांना तर सोशल मीडियावरील दिसणारे पाणी पाहून डोळ्यात पाणी येण्याची वेळ येते. आपले म्हणणे एवढेच असते की व्वा! जायचे तिथे जा, पण उगाच फोटो टाकून लोकांना हैराण करू नका. कधी कधी सोशल मीडियावरील पर्यटनाचे फोटो पाहून असे वाटते की भारत हा पूर्णत: विकसित देश असून, येथील लोक वर्षभर मजा आणि फक्त मजाच करीत असतात. येथील लोकांना कशाचीच ददात नसून आनंद कसा मिळवायचा ते या देशातील लोकांकडून शिकावे असेही वाटू शकते. बरे, त्याच वेळेला सर्वेक्षणाचा रिपोर्ट येतो की आपल्या देशाचा हॅप्पीनेस इंडेक्सप्रमाणे एकशेछप्पन देशांमध्ये एकशे तेहतीसावा क्रमांक आहे. मग ते सोशल मीडियावरील फोटो खरे की हा रिपोर्ट खरा असा प्रश्न पडतो.

काही लोक अचानक आपली युरोप वारी सुरू करतात आणि मग दुसऱ्या दिवशीपासून त्यांचे स्वित्झर्लंड, जर्मनी, पॅरिस, तो आयफेल टॉवर, पिसाचा झुकता मनोरा, असे फोटो नियमित येणे सुरु होते. इकडे आपल्याला आपल्या गावाकडे जाऊन चार एकर कोरडवाहू जमीन पाहायला जाण्यास वेळ नाही आणि तिकडे लोक लंडनच्या मादाम तुसा म्युझियममध्ये मोदींच्या मेणाच्या पुतळ्याबरोबर फोटो काढण्यात मग्न आहेत, तेव्हा आपलेच आयुष्यात काहीतरी चुकत आहे असे वाटत राहते. काही महाभाग फोटो काढताना पिसाच्या मनोऱ्याच्या बाजूला एवढे झुकतात की त्या मनोऱ्याला पण आपल्या कमी झुकण्याची लाज वाटेल. याशिवाय वीक एण्ड पर्यटनाचे वेगळेच प्रकरण आहे. वीक एण्डला एवढी धम्माल केली जाते यावरून तुम्हास वाटेल की व्वा! आठवडाभर यांनी किती काबाडकष्ट केले असतील.

पाच दिवस मरोस्तोवर काम केल्यानंतर शनिवार, रविवार मजा केली तर बिघडले कुठे? हा बिनतोड सवाल आहे, यात वाद नाही. पण मग पाच दिवस हे लोक जर इतके कष्ट करीत असतील तर देश एव्हानापर्यंत क्रमांक एकची महासत्ता व्हायला हवा होता. कुठल्याही टुरिस्ट स्पॉटला गेल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य माणसाला काही समजेनासे होते. परग्रहावरून आलेल्या माणसांसारखे ती बर्मुडा घातलेली पोरे-पोरी, त्यांच्या अवाढव्य देहासाठी पुरवठा करणारी त्यांच्या हातातील ती वेफर्स किंवा तत्सम पाकिटे ते हादडत असतात. काही अतिउत्साही लोक गाडीतून उतरताच आधी मोबाईलवर फोटो काढण्याच्या घाईत असतात.

फोटो काढून झाला की लगेच तो फेसबुकवर अपलोड करायचा असतो. आपल्यासारख्या निसर्गप्रेमी माणसाला या लोकांना म्हणावेसे वाटते, ‘निसर्ग पाहायला आलास तर किमान भरल्या डोळ्यांनी तो पाहून तरी घे, अनुभवून तरी घे आणि नंतर काढ फोटो’, पण ऐकतोय कोण? एका आठवीतील मुलाने चौकशी केल्यानंतर दिलेल्या उत्तराने तर माझ्या डोळ्यात पाणीच आले. ‘आम्ही नेचर पाहण्यासाठी गेलो होते, पण सारखी झाडेच मध्ये मध्ये येत होती’ हे ऐकून तुम्हीही गहिवरून गेला असता.

एक मित्र परवा सांगत होता, ‘आरे यार दोन तीन महिने झाले फार स्ट्रेस झाला होता, मग काय काढली गाडी आणि विथ फॅमिली कोकण फिरून आलो’. मला अशा लोकांचा फार फार हेवा वाटतो. कारण फॅमिलीसह फिरणे किंवा फिरायला जावे लागणे हाच एक मोठा स्ट्रेस आहे आणि दुसरे म्हणजे ज्यांच्यामुळे स्ट्रेस आलाय त्यांनाच सोबत घेऊन फिरल्यास तो कमी कसा होईल हाही एक मोठाच प्रश्न आहे. असो, ज्याचे त्याचे प्रश्न असतात, आपण कशाला नसत्या उचापती करायच्या?
( anandg47@gmail.com )

Web Title: useless work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.