गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 07:38 PM2018-06-23T19:38:39+5:302018-06-23T19:39:04+5:30
लघुकथा : देवानंद लहानपणापासून शेतात राबत आलेला. पावसाळा तोंडावर आला की, तो मुडा तोडायला जायचा. माळरानात बैलगाडी घेऊन जायचा. तो मुडा तोडायला एकटा जायचा नाही. सोबत अविनाशला घेऊन जायचा. देवानंदचा सख्खा भाचा अविनाश. मामा जे काम सांगेल ते काम अविनाश पटापट करायचा.
- महेश मोरे
रोहिणी संपल्या होत्या. पावसाळा तोंडावर आला होता. आभाळात ढग जमत होते. देवानंदने जमिनीचा उदिम केला होता. नांगरून, वखरून ठेवलं होतं. जमिनीला कसं लेस केलं होतं. देवानंद लहानपणापासून शेतात राबत आलेला. पावसाळा तोंडावर आला की, तो मुडा तोडायला जायचा. माळरानात बैलगाडी घेऊन जायचा. तो मुडा तोडायला एकटा जायचा नाही. सोबत अविनाशला घेऊन जायचा. देवानंदचा सख्खा भाचा अविनाश. मामा जे काम सांगेल ते काम अविनाश पटापट करायचा. बैलगाडीत पाळी होते म्हणून अविनाश सुखाहून जायचा. माळरानात गेल्यावर दिवसभर सागाच्या झाडाचे पाने तोडायचे. सागाच्या झाडाचे मोठं- मोठे पानं. पानंच्या पानं तोडल्यावर मग ते एकावर एक रचल्या जायचे. त्याचा भला मोठा मुडा तयार व्हायचा.
कोण किती पानं तोडते. दिवसभर पानं तोडण्याची जणू काही शर्यतच. ज्याच्या- त्याच्या शक्तीवर मुडे तयार होत होते. सूर्य माळवयाच्या आत मुडे गाडीत टाकल्या जायचे. मग मुडे आणल्यावर सागाच्या पानाने घरावरचं झोपडं देवानंद आणि अविनाश शेकारायचा. तव्हा कोठं त्याचं घर गळत नसे. कव्हा सागाचे पानं नाही सापडले तर मग देवानंद व अविनाश पळसाच्या पानाचा व्हरका तोडायचा. तो व्हरका मातीच्या भिंतीवर टाकून वरतून माती टाकायचा. पांढऱ्या मातीच्या भिंतीला तो पडू देत नव्हता. देवानंद व अविनाशला वाचनाची गोडी. देवानंदने मातीत राबलेल्या अनुभूतीच्या कविता लिहिलेल्या एक संग्रह निघल एवढ्या कविता त्याच्या वहीत टिपलेल्या.
देवानंद पाऊस पडल्यावर पेरणी करून घेयाचा. रात्रंदिस शेतात कष्ट करायचा. पणिक सालचंदीच व्हायची. देवानंदच्या मनात सारखं यायचं. शेतीसोबत काही तरी जोडधंदा करावं. तरच बरकत येईल. नाही तर शेतीच्या अमदानीतून काहीच उरत नव्हतं. देवानंदचं मन सारखं कुठल्या न कुठल्या तरी विचारात गुरफटलेलं असायचं. त्याला शेतीसोबत काही तरी नवीन करावं असं वाटायचं. पणिक पैशावाचून सगळं आडून बसायचं. पंधरा साल दयानंदनं ती कळ तशीच सोसली. पणिक त्याचं मन त्याला नव्या गोष्टीकडे वळवत होतं. बरं दुकान टाकावं त्याला पण पैसा लागते. घरी आयुष्याला चिकटलेली गरिबी होती. मग करावं तरी काय? असा प्रश्न देवानंदला पडायचा. त्याच्या जिवाची घालमेल होत होती. त्याचा हिरमोड होऊ लागला. पणिक देवानंद लई जिद्दी. शेतीला काही तरी जोडधंदा करायचा म्हणून देवानंदने मनाशी खूणगाठ बांधली.
शेतात कष्ट करीत करीत देवानंद जमा झालेले पैसे बँकेत टाकू लागला. सालभरात थोडी बहुत रक्कम जमू लागली. तो जास्तीत जास्त उत्पन्न काढू लागला. मग शेतीला पूरक जोडधंदा म्हणून देवानंदने ट्रॅक्टर विकत घेतला. त्याच्या ट्रॅक्टरची गर्र-गर्र चाकं फिरू लागली. देवानंद लई चिवट शेती करत करत ट्रॅक्टर चालू लागला. थोड्या थोड्या कमाईतून तो ट्रॅक्टरचे हप्ते भरू लागला. पणिक ट्रॅक्टरला बारमाही काम लागत नव्हतं. ट्रॅक्टर घरी बसून राहू लागलं. बँकेचं कर्ज कहानं फेडावं असा प्रश्न त्याला पडू लागला.
देवानंदच्या डोक्यात नवनवीन विचार येऊ लागले. ट्रॅक्टरच्या पुढे काही तरी वेगळं काम करावं. आपण या ट्रॅक्टरवर थांबलो तर त्याचे टायर जसे घासले तसे आपण घासतच जाणार काठोणावनी. त्याचं मन शेतात काम करत करत भरारी मारू लागलं. देवानंदने ट्रॅक्टर खटारा होण्याआधी विकून टाकला. मग एक टॅक्सी गाडी घेतली. देवानंदनं जिद्द सोडली नाही. ज्या दिवशी भाडे लागल त्या दिवशी तो भाडे घेऊन जाऊ लागला. ज्या दिवशी भाडे नाही त्या दिवशी शेतात काम करू लागला. पुढे त्याच्या कष्टाला फळ येऊ लागलं. देवानंदनं एकच्या दोन गाड्या घेतल्या. तो शहरातील भाडे टाकीत होता.
मोठमोठ्या साहेबांच्या ओठावर देवानंदचं नाव खेळू लागलं. त्याच्याजवळ बारा गाड्या झाल्या. तो अनेकाला रोजगार देऊ लागला. त्याने अविनाश स्वामीला गाडी घेऊन दिली. अविनाश या व्यवसायात चांगलाच रमला. बसस्टँडवर एस.टी.ची वाट थांबलेला मी इतक्यात एकदम अविनाशने माझ्याजवळ गाडी आणून उभी केली. मी चकितच झालो. बघतो तर अविनाश... गाडीचा काच खाली करत अविनाश म्हणाला, ‘बसा सर मी नांदेडलाच निघालो. हदगावचे भाडे होते. सोडून आलो. मग सर काय म्हणते शेती.’ काय सांगू शेतीचे तमाटे रोडवर, दूध रोडवर. कुणालाच संवेदना नाही.शेतकऱ्याला कुणीच वाली नाही. आगीतून निघून फुफाट्यात. त्यामुळं जोडधंद्याकडे वळलो सर. मागील गोष्टी निघाल्या. मी म्हणालो, ‘अविनाश ही गाडी बरी वाटते की, ती आपली बैलगाडी...’ त्यावर अविनाश म्हणाला,‘सर या गाडीचा कोणाला धक्का लागला तर आमचं काही खरं नाही. आपल्या बैलगाडीची मज्जा काही न्यारीच.’
( maheshmore1969@gmail.com )