‘जायकवाडी धरणाच्या ‘लालफितीचे बळी’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:32 PM2018-01-23T18:32:03+5:302018-01-23T18:33:04+5:30

वर्तमान : साधारणत: चार दशकांहून अधिकचा काळ लोटला. पैठण तालुक्यात काठोकाठ भरून दुरून वाहणारा ‘पाट’ आणि सागरासारखे विशाल ‘धरण’ उशाशी घेऊन आमची पिढी मोठी झाली; तर एक मातीत खपली. शेताच्या माथ्यावर उभे राहून पायाच्या टाचा उचलून जरासे पाहिले, तर अनेक हंगामांत फेसाळणारे सुख डोळ्यांना स्पष्ट दिसते. कधी तर ते बांधापर्यंत येईल या अतीव ओढीने वाट पाहत भुईचे तारुण्य करपले; पण ‘भोग’ संपले नाहीत. पुन्हा या तीन दशकांनी पडझडीचा, निसर्गाने अवकृपेचा ‘काळ’ दाखवला म्हणून असंख्य माणसांनी या दुष्काळी भूभागात ‘दोरखंड’आपलेसे केले. भेगाड पडले जमिनीला की ‘पाय’आपोआप भेगडात जातात. तशी माणसे एकामागोमाग एक भेगाडात चालती झाली; परंतु पांढर्‍या कपड्यातील टोळ्यांना अन् सूटबुटधारी प्रशासानाच्या बुडाला लागली नाही ‘आग.’ त्यांच्यासाठी तो केवळ असतो एक ‘सामान्य’ प्रश्न लालफितीतला..!

'Victim of red carpet of Jaikwadi dam' | ‘जायकवाडी धरणाच्या ‘लालफितीचे बळी’ 

‘जायकवाडी धरणाच्या ‘लालफितीचे बळी’ 

googlenewsNext

- गणेश मोहिते

तर गोष्ट अशी आहे, की कपाशीवर बोंडअळी ‘पडली म्हणून हातातोंडाशी आलेले पीक गेले. बचत गटाचे घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेपोटी आमच्या परिसरातील एका महिला शेतकर्‍याने याच आठवड्यात आत्महत्या केली. गेल्या आठवड्यात याच परिसरात बापावर लग्नाचा बोजा नको म्हणून एका मुलीने आत्महत्या केली. या दोन आत्महत्या स्त्रियांच्या आहेत हे आणखी भयानक. शेतकरी ‘स्त्री’ गंभीर आहे, सहनशील आहे. वगैरे या दांभिक विचारवंतांच्या कल्पना येथे खोट्या ठरू लागल्या. ‘जगण्याचे दोर कापले गेले, की स्त्री असो वा पुरुष तो टोकाचे पाऊल उचलतो’ हे यातले सत्य; पण पुढे काय? तर वर्तमानपत्रात बातमी येते, उद्या त्याची रद्दी होते. दप्तरात दोन आकड्यांची वाढ. या पलीकडे सरकार पातळीवर या मृत्यूचे ‘मूल्य’ काय हो. निगरगट्ट राजकीय व्यवस्था आणि सुस्त प्रशासन या जोखड्याने घेतलेले असे अनेक ‘बळी’ उघड्या डोळ्यांनी आपण फक्त पाहत बसायचे. बाकी तसे आपल्या हातात उरते काय?

१९७६ च्या आसपास आमच्या परिसरातील सर्वात मोठे मातीचे धरण तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते देशाला अर्पण केले. या घटनेला चार दशकांहून अधिकचा काळ लोटला. धरणाची उभारणी सुरू झाली. त्याच्या लाभ क्षेत्रात येणार्‍या हजारो शेतकर्‍यांना समाधानाचे भरते आले. खरं तर या धरणासाठी सुपीक जमीन मोजून काही माणसे विस्थापितांचे दु:ख काळजात घेऊन रस्ता मिळेल तशी विखुरली. धरणाच्या आजूबाजूच्या परिसरातील माणसे आपल्या हक्काचे पाणी आपल्याच परिसरातील गावागावांत नवी ‘वहिवाट’ घेऊन येईल म्हणून फुलारून आली. मात्र, चार दशकांहून अधिकचा काळ लोटला तरी धरणाच्या ईशान्य बाजूच्या पायथ्याशी वस्तीला असलेला सत्तर टक्के समूह तहानलेलाच राहिला. ‘धरण उशाला, कोरड घशाला’ ही म्हण जर कोणी जाणत्या माणसाने प्रसवली असेल, तर तो याच परिसरातील असला पाहिजे, अशी माझी खात्री आहे. विस्तीर्ण, महाकाय जलायशयाच्या ईशान्य दिशेला असलेला या भूभागाला वाकड्या दाखवत पोटात पाणी घेऊन वाहणारे ‘पाट’ सरळ जेव्हा एकरेषेत पूर्वेला निघून जातात तेव्हा माणसे आपल्या आयुष्याची दिशा बदलली म्हणून फक्त नशिबाला दोष देतात.

उशाला धरण असताना टँकरसाठी तहानलेली गावे जगाच्या पाठीवर कुठे पाहायची असतील, तर या भागात दुष्काळी पर्यटनाला मोठा वाव आहे. गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ हा दुष्काळी भाग सिंचन व पिण्यास हक्काचे पाणी मिळावे म्हणून संघर्ष करतो आहे; परंतु लालफितीत अडकलले शेतकर्‍यांच्या डोळ्यातले हे स्वप्न सत्यात उतरत नाही. निवडणुकीचा हंगाम आला की मंत्री, संत्री येतात, योजनेच्या घोषणा देतात, कार्यभाग साधला, की परागंदा होतात. पदरात काही पडत नाही. वीस वीस वर्षे कागदावरची योजना प्रत्यक्षात येत नाही. आलीच तर तिला निधीअभावी ‘मारली’ जाते. उरली सुरली नेते, अधिकारी, गुत्तेदारांच्या घरात ती ‘पाणी’ वाहते. सामान्य माणसांच्या डोळ्यातल्या स्वप्नांची ‘होळी’ करणार्‍या ‘औलादी’ याच मातीत पोसल्या गेल्यात हे विशेष. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर या परिसरातील शेतीसाठी एक उपसा सिंचन योजना मंजूर झाली. अल्पावधीत कामाने गती घेतली; परंतु शासन बदलले तशी योजना गाळात रुतली. वर्षाकाठी थोडाफार निधी देऊन फक्त योजना जिवंत ठेवली जाते. 

लोकप्रतिनिधी, अधिकारी, कंत्राटदारांच्या साटेलोट्याने योजना लुटली जाते. वर्षानुवर्षे योजना सडली, की तोट्यात जाते. तोट्यात गेली, की झालेली कामे मातीत जातात. योजना पूर्ण होण्याचे स्वप्न पाहणार्‍या डोळ्यातल्या स्वप्नांची माती होते. गंमत अशी, की गेली नऊ वर्षे एका योजनेसाठी भूसंपादन केल्यानंतरही शेतकर्‍यांच्या जमिनीचे ‘भाव’ ठरविण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांना एकदाही वेळ मिळत नाही. हे विश्वास न बसणारे सत्य. हे उदाहरण येथे प्रातिनिधिक समजायला काय हरकत; पण सत्य आहे!
हजारोंच्या संख्येने राज्यात आत्महत्या होत असतानाही आमचे शासन व प्रशासन शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर किती गंभीर आहे याचा हा नमुना. आपल्या भागात येत्या काळात धरणाचे पाणी येईल आणि आपली तहान भागेल हे ‘ओले’ स्वप्न डोळ्यात घेऊन तीस-चाळीस गावांच्या पट्ट्यात गेल्या चार वर्षांत तीस-चाळीस शेतकर्‍यांनी स्वत:ला उद्ध्वस्त करून घेतले. हे ‘बळीह्ण कोणी घेतले? हे सांगायला कोणाची गरज नाही.

आज मरणारा शेतकरी कोरडवाहू, अल्पभूधारक आणि जास्तीत जास्त कापूस उत्पादक आहे. त्याच्या शेतीला पाणी नाही, पिकाला भाव नाही, उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ आणि दुसरीकडे अस्मानी सुलतानीचे संकट यात आमचा सामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर भरडला जातोय. त्याच्यासाठी फक्त चहूबाजूंनी नाना वल्गना तितक्या ऐकू येतात. प्रत्यक्षात ‘लालफितीत’ अडकून त्याचा ‘बळी’ घेण्यापलीकडे काहीही घडत नाही हे सत्य..!

( dr.gamohite@gmail.com )

Web Title: 'Victim of red carpet of Jaikwadi dam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.