आम्ही जंगलचं राजं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 08:34 PM2018-02-28T20:34:20+5:302018-02-28T20:34:38+5:30

लघुकथा : रेंजरच्या आॅर्डरला सर्वांनी माना डोलवल्या तसे रेंजर गाडीत बसले अन् निघून गेले. शेरेदार, चौकीदार सगळे आखाड्याच्या बाहेर पडले. सजूबाई मात्र बराच वेळ टोपल्याबाहेर येणार्‍या पिल्लांना आत लपवत होती अन् टोपल्याभोवती फिरणार्‍या कुत्र्यांना हुसकावत होती..

We are the kings of the jungle | आम्ही जंगलचं राजं

आम्ही जंगलचं राजं

googlenewsNext

- हंसराज जाधव 

गाडी थांबल्याबरोबर पटापट माणसं उतरले. झोपाटा काढून थेट आखाड्यात आले. मागोमाग दुसर्‍या गाडीतून काळा चष्मा घातलेला सुटाबुटातला माणूस उतरला. ड्रायव्हरने घाईने झोपाटा लोटला तसा तो माणूस आत आला. सजूबाई मात्र नेहमीप्रमाणे तिच्या कामात व्यस्त होती. बाहेर येणारी शेळीची पिल्लं टोपल्याखाली झाकत होती. कुत्र्यांपासून पिल्लांना राखत होती. तिनं एकवार सगळीकडं पाहिलं अन् परत लागली आपल्या कामाला. तिला हे नवीन नव्हतं. गेल्या वर्सा-दीडवर्सापासून रोज वस्तीवर कोणी ना कोणी येतच होतं. कायदा सांगत, धमकी देत, ‘कशाला नादी लागता? सगळंच नेतील उचलून’ म्हणत सहानुभूती दाखवत होतं. आज आलेला अधिकारी सोडून बाकी सगळे तिच्या तोंडओळखीचे होते. चौकीदार, शेरेदार तर रोजचेच झालेले.

चौकीदार जवळ येत साहेबाला हळूच म्हणाला, ‘सर, हीच ती सजूबाई!’ साहेबांनी डोळ्यावरचा चष्मा काढून डोक्यावर लावत तिच्याकडे पाहिले. ती एक नाही दोन नाही, गप्प! साहेबांनी तिच्यावरची नजर हटवली. कमरेवर हात देऊन भवताल पाहायला सुरुवात केली. एकूण तीन-साडेतीन एकर जमीन सगळी. त्यात खळं दोन खळं रान आखाड्याचं. माळाकडच्या बाजूनं क्यानाल खोदलेला, जो खोदल्यापासून कोरडाच. वावराच्या वरच्या कोपर्‍यात सागाची पाच-पन्नास झाडं. आखाड्याला लागूनच तुरीचं खळं झालेल्या जागी गुळी पडलेली. कापूस बर्‍यापैकी फुटलेला. हे सगळं पाहात साहेबांची नजर परत सजूबाईवर येऊन थांबली. साहेबच बोलले, ‘काय सजूबाई, जागा खाली करत नाही म्हणं तुम्ही!’ सजूबाई गप्प. टोपल्याबाहेर आलेलं पिल्लू पाय चाटायला लागलं.

‘हे बघा सजूबाई, ही जमीन सरकारची आहे, फॉरेस्ट खात्याची आहे. इतकी दिवस खाल्ली, झालं. आता सरकार वनीकरण करतंय. तुमच्यासारख्या लोकांनी अतिक्रमण केलेल्या जमिनी परत घेतंय. तुमचंच नाही सगळ्या महाराष्ट्रात सुरू आहे हा उपक्रम. खुद्द वनमंत्र्यांनीच मनावर घेतलंय सगळं.’ ‘साहेबच बोलताहेत अन् बाई गप्प उभी आहे मुकी असल्यासारखी! आमच्या अंगावर कशी येते धावून, वाघीण आल्यासारखी?’ शेरेदार जाग्यावरच तणफण करू लागला. त्यानं एकदा साहेबाकडं पाहिलं. न राहून सजूबाईच्या जवळ जात थोडा ओरडलाच, ‘ऐ बाई, साहेब काय म्हणालेत ते ऐकू येतंय की नाही? का बहिरी आहेस? मोठे साहेब आहेत ते. रेंजर साहेब. काय म्हणतात ते ऐक नीट.’ शेरेदाराला रेंजरनी इशारा केला तसा तोे जवळ आला. ‘हिचा मालक कुठं आहे?’ ‘सर, विधवा आहे ती. मुलगा आहे पंधरा-सोळा वर्षांचा. शेळ्या आहेत सात-आठ. असंल चारत माळात कुठंतरी!’ ‘हे बघा सजूबाई!’ रेंजरने पुन्हा मोर्चा सजूबाईकडं वळवला. ‘तीन-चार दिवसांत जमीन मोकळी करा. आखाडा काढून घ्या. सगळं सामान उचलून घ्या. आम्हाला नर्सरी करायची आहे इथं. नाहीतर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल!’ मघापासून गप्प उभ्या असलेल्या सजूबाईनं पिल्लं झाकलेल्या टोपल्याभोवती फिरणार्‍या कुत्र्यांना एकदाचं हुसकावलं आणि साहेबाच्या जवळ येत म्हणाली, ‘खरं आहे साहेब तुमचं! ही आहे जमीन फॉरेस्टची; पण कधी पासून? आमच्या तीन पिढ्या गेल्या साहेब इथंच. आधी आमचा बाप कसीत व्हता. 

त्यानं मला दिली करून खायाला. तीस वर्सांपासून मी खाते. तवा कुठं गेलतं तुमचं खातं अन् सरकार? सरकार झाडं लावा - जगवा म्हणतं, ते काय माणसं मारून? व्वा रे सरकार! आता कुठं जायचं साहेब आम्ही या वयात?’ सजूबाई पोटतिडकीने बोलत होती. तिच्या बोलण्यात आक्रोश होता अन् याचनाही. सजूबाईच्या बोलण्याचा रेंजरवर काही परिणाम झाला नाही. त्याने शेरेदाराला जवळ बोलवले, ‘हे बघा आपल्याला हेडआॅफिसच्या आॅर्डरप्रमाणेच सगळं करावं लागेल. उद्या हिच्या नावे नोटीस पाठवा आॅफिसकडून. चार दिवसांची मुदत द्या अन्यथा डोझरनं काढून फेका सगळा आखाडा!’ रेंजरच्या आॅर्डरला सर्वांनी माना डोलवल्या तसे रेंजर गाडीत बसले अन् निघून गेले. शेरेदार, चौकीदार सगळे आखाड्याच्या बाहेर पडले. सजूबाई मात्र बराच वेळ टोपल्याबाहेर येणार्‍या पिल्लांना आत लपवत होती अन् टोपल्याभोवती फिरणार्‍या कुत्र्यांना हुसकावत होती..
(hansvajirgonkar@gmail.com)

Web Title: We are the kings of the jungle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.