गुणदानाचे रहस्य काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 07:26 PM2018-06-23T19:26:28+5:302018-06-23T19:27:09+5:30
प्रासंगिक - गेल्या वर्षी असेच निकाल जाहीर झाल्यानंतर एका मराठी वाहिनीवर विद्यार्थीनींचे इंटरव्ह्यू दाखविले होते. आश्चर्य म्हणजे मुलाखतकाराच्या साध्या प्रश्नांची उत्तरे देतानादेखील या मुलींची तारांबळ उडताना दिसत होती.
- डॉ. विजय पांढरीपांडे
नुकतेच दहावीचे निकाल लागले. यावर्षी एक दोन नव्हे तर चक्क १२० विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यापैकी ८० विद्यार्थी लातूर जिल्ह्यातले (पॅटर्न!) आहेत. खूप विचार केल्यानंतर देखील, मुख्य म्हणजे शिक्षण क्षेत्रात चार दशके घालवूनदेखील हे ‘शंभर टक्के प्रकरणाचे’ गौडबंगाल माझ्या गळी उतरायला तयार नाही. सर्वच विषयांत पैकीच्या पैकी गुण कसे काय मिळू शकतात? गणितासारख्या विषयात ठीक आहे; पण भाषा विषयाचे काय? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीसारख्या विषयांचे काय? जिथे वर्णनात्मक उत्तर असते तिथे एकही चूक होऊ शकत नाही, एकही उणेपण दिसत नाही, किंबहुना जे लिहिले आहे त्यापेक्षा वरचढ असे काही असू शकत नाही हा निर्णय वेगवेगळे परीक्षक, वेगवेगळ्या परिस्थितीत, मन:स्थितीत कसे काय घेऊ शकतात? कारण या सर्वांचे पेपर्स एकाच परीक्षकाने तपासले हे संभवत नाही. मग शंभर टक्के बाबतीत सर्वांचे एकमत कसे काय होते?
गेल्या वर्षी असेच निकाल जाहीर झाल्यानंतर एका मराठी वाहिनीवर विद्यार्थीनींचे इंटरव्ह्यू दाखविले होते. आश्चर्य म्हणजे मुलाखतकाराच्या साध्या प्रश्नांची उत्तरे देतानादेखील या मुलींची तारांबळ उडताना दिसत होती. हुशारीचे तेज कुणाच्याही चेहऱ्यावर नव्हते. देहबोलीतून जाणवत नव्हते. त्याला सर्वोत्तम प्रतिभा कसे म्हणायचे?
आम्ही जेव्हा बोर्डाच्या परीक्षेला होतो त्या काळात म्हणजे ६०-७० च्या दशकात मेरिटमध्ये येणाऱ्या पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची गुणांची टक्केवारी जास्तीत जास्त पंचाएेंशी (८५%) असायची. नव्वद टक्के वगैरे कुणाला माहिती नव्हते. मग गेल्या तीन-चार दशकांत नव्वद टक्क्यांच्या वर विद्यार्थ्यांचे जे पीक वाढले त्यामागे नेमके काय लॉजिक आहे? शिक्षणाचा दर्जा वाढलाय का? विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढली आहे का? प्राध्यापकांच्या अध्यापन पद्धतीत काही आमूलाग्र बदल झालेत का? ते बदल नेमके काय आहेत? शंभर टक्के गुण देणारी मूल्यांकन पद्धत नेमकी काय आहे? हे आमच्यासारख्या पांढऱ्या केसांच्या वयस्करांना समजून घ्यायचे आहे.
माझे बोर्डाला, शिक्षण अधिकाऱ्यांना अन् सरकारी शिक्षण खात्याला असे आव्हान आहे की, त्यांनी शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या या १२० विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिका वेबसाईटवर उपलब्ध कराव्यात. जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळविण्यासाठी काय उत्तर अपेक्षित असते याचे ज्ञान अन् मार्गदर्शन होईल. पालकांना, इतर शिक्षकांनादेखील शंभर टक्केसाठी विद्यार्थ्यांना कसे ‘तयार’ करायचे, याची माहिती मिळेल. शिवाय या शंभर टक्के प्राप्त विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व प्रतिभेचे सर्वांना पारदर्शी दर्शन प्राप्त होईल. या निमित्ताने आणखीन एक अभ्यास सुचवावासा वाटतो. दहावी-बारावीचे हे टॉपर्स आयुष्यात पुढे किती चमकतात, कोणत्या क्षेत्रात नाव कमावतात, कितपत यशस्वी होतात, मुख्य म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात किती जणांचे हे गुणांचे सातत्य टिकून राहते यावर संशोधन व्हायला हवे.
सध्याचे विद्यापीठातील संशोधन बघता, या महत्त्वपूर्ण संशोधनाला दहा-बारा पीएच.डी. पदव्या नक्की मिळतील. कारण संशोधनाचा आवाका फार मोठा असणारय. इथे विद्यार्थ्यांच्या हुशारीवर ताशेरे ओढण्याचा उद्देश नाहीय. त्यांच्या परिश्रमाविषयी देखील शंका घ्यायची नाहीय. प्रश्न आहे तो गुणांची अनावश्यक खैरात करून, खिरापत वाटून त्यांचा फाजील आत्मविश्वास वाढविण्याचा, त्यांना पॅम्पर करण्याचा किंबहुना या अवास्तव गुणवाढीने त्यांची दिशाभूल करण्याचा, त्यांना मृगजळ दाखवून भविष्याविषयी खोटा आभास निर्माण करण्याचा.
अभ्यासात, ज्ञानाच्या बाबतीत शंभर टक्के, परफेक्ट असे काहीही नसते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक उत्तरात, प्रत्येक स्पष्टीकरणात, प्रत्येक विश्लेषणात सुधारणेला वाव असतोच. गीतेवर शेकडो टीका उपलब्ध आहेत. त्या प्रत्येक टीकेचे/समीक्षेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. ज्ञानाच्या बाबतीत अमुक एक शंभर टक्के अन् बाकीचे निकृष्ट असे काही नसते. बारा गुणिले पाच बरोबर साठ हे एकमेव परफेक्ट उत्तर गणितासारख्या विषयातच संभव आहे; पण इतर विषयात प्रत्येक उत्तराला आणखीन् उत्तम, आणखीन वेगळा, अधिक अचूक असा पर्याय असू शकतो. त्यामुळे शंभर टक्के गुणदान हे अति वाटते. अशक्य वाटते. ही जी भरमसाठ गुणवाढ दिली जातेय त्यामागचे रहस्य समजून घेणे फारसे कठीण नाही. गेल्या चार दशकांत शालेय/व्यावसायिक/उच्चशिक्षणाचे खाजगीकरण झाले आहे. व्यापारीकरण झाले आहे. लाखो करोडोंचा व्यवसाय करणारी ट्यूशन इंडस्ट्री जोमाने वाढली आहे.
या वेगवेगळ्या संस्थांमध्ये, व्यवस्थापनांमध्ये व्यावसायिक स्पर्धा वाढल्या आहेत. या व्यावसायिक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा बळी जातोय, पालकांची दिशाभूल होतेय. मुख्य म्हणजे तरुण विद्यार्थ्यांना गुणांच्या पांगूळगाड्याची सवय लावली जातेय हे खरे दु:ख आहे. जाता जाता शंभर टक्के (किंवा नव्वदीच्या वरचे टक्के) मिळविणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना एकच सांगणे आहे - ‘उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका !’ सुज्ञांना अधिक सांगणे न लगे...
( vijaympande@yahoo.com )