वो सुबह कब आएगी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:05 PM2018-04-28T18:05:43+5:302018-04-28T18:07:02+5:30

ललित : प्रचंड दमछाक नि चढणीचा रस्ता. चालत राहावं एकट्यानं तर कधी सोबतीनं. वळून पाहावं तर कधी दोन पावलांचे ठसे तर कधी पावलं दुप्पट झालेली... मोगरकळ्यांच्या टपोर वाढीला खुणावत ऐटीत चालणारी.

When will that morning comes | वो सुबह कब आएगी..

वो सुबह कब आएगी..

googlenewsNext

- ज्योती कदम

स्व: चे तुकडे इतस्तत: विखुरलेले पाहणं सगळ्यात जास्त अवघड. त्यातून परत स्वत:ची एकरूप एकतानता साधणं त्याहून महाकठीण. विषदंश रत्तीभर असला तरी तो पुरेसा असतोच की जगणं जहरी करण्याला. काचेचे असते श्वास तर केव्हाच तडकून गेलं असतं हे सगळंच. आता किमान तुकड्या-तुकड्यानं का होईना  उरलंय काहीतरी.

जिवाच्या आकांतानं धावत सुटावं पायाखाली रस्ताच नसलेल्या भुईवरून नि सगळ्या दिशाच कोलमडून जावं तसंच काहीसं हे तडकणं. वणवा नेमका कधी पेटतो ती ठिणगी दिसेलच असं नाही; पण कुठंही पेटला तरी वणवाच तो. जाळत जातो तुळशीजवळची मातीही आणि करपवून टाकतो पानोपानीच्या पर्णशिरांना. हिरवीकंच वाढ खुंटतेच पापणी लवते न लवते तोच...

किल्ली दिलेली असली तरी हाडामांसाचं जगणं हे... कोलमडून पडणारच वादळलेल्या क्षणांत. पसाभर सुखाचं दान मागत उभं असलं जगणं. जगण्याच्याच दारात तरी कधी उधळल्या जातील पदरात पडलेले चार सुखाचे दाणे याचं भाकीत करता येतच नाही. सगळंच अनाकलनीय... मज्जातंतूंच्या विणीच्या पलीकडचं; पण कोण देत जातंय किल्ली हे समजतच नाही. नि आपण मात्र मारत राहतो उड्या दरवेशाच्या हाती असलेल्या माकडासारखं... 

प्रचंड दमछाक नि चढणीचा रस्ता. चालत राहावं एकट्यानं तर कधी सोबतीनं. वळून पाहावं तर कधी दोन पावलांचे ठसे तर कधी पावलं दुप्पट झालेली... मोगरकळ्यांच्या टपोर वाढीला खुणावत ऐटीत चालणारी.

ही ऐट मनात घेऊन चालता येईल वाटतं पार डोंगरापल्याड; पण तसं होणार नसतं. मोगरपावलं केव्हाच कोमेजून त्यांच्या ठशांचं अर्घ्यही सूर्याला देऊन बसलेली. क्षितिजाचे भास उगा मिरवत राहतात ताठा त्यांच्या भ्रामक अस्तित्वाचा; पण आपले भ्रम आपल्याच पायवाटेनं संपवलेलं असतात तोपर्यंत. डोंगरापल्याड तर पोहोचणं भागच असतं. नव्हे तो अलिखित नियमच असतो या काचाळ; पण  पारदर्शी वाटेचा. आपण दिलेलं असतं आपल्याच हातांनी आपल्याच हाताच्या झाकल्या मुठीला वचन निरतंर चालत राहाण्याचं. झाकलेली मूठ आपल्याच स्वप्नांनी आच्छादून चालत राहावंच लागतं डोक्यावर आभाळ नि पायाखाली जमीन नसली तरी... मस्तकात भिनलेला तो ठिणगीदंश घेऊन वणव्यालाच कुरवाळत. ठिणगीची अंगारफुलं ओच्यात घेऊन ज्वालागंधाचं अतिरेकी अस्तित्व विरुद्ध दिशेला हाकारत.

किती सहज सोप्पा होता ना यापूर्वीचा रस्ता! मखमल पांघरून मलमल ल्यायलेला. गुलमोहरी गडद छाया घेऊन पळसभारली सावली पेरणारा. प्राजक्ती स्पर्शानं गहिवरून गेलेला. चांदणचाहूल स्मरत नित्य नवी रानहूल पेरणारा. कोकीळगुंजन ऐकवत गरुडभरारी नसानसांत गोंदवणारा. कसलं अनाहुत वळण नि पुढं फक्त निसरडी उतरण!

आता फक्त जाणवतंय ते फक्त लाकडी पुलाचं थरथरत तगून असणं नि पुढं बुडत जाणारी पावलांची रांग... काळाच्या विक्राळ डोहात. हा डोह गिळकृंत करील आता सगळंच हे ठाऊक असूनही ही कसली भयतंद्री... संपता संपत नाही ती विषदंशाची क्षणठिणगी... हलाहल पचवत पुढं जाताहेत पावलं; पण गुलाबी ठसे बघ ना किती साकोळून गेले आहेत! हे असं विषैल तडकणं मनाचं स्वप्नातही येऊ नये कुणाच्याच. वटवाघळं फडफडताहेत मेंदूत अन् विचित्र आर्तता तेवतेय इथल्या दीपमाळेत... अंधाराची अस्तित्वमुद्रा भयाण प्रश्नचिन्हासहित तगून आहे प्रकाशभिंतीवर!! कुठल्या ज्ञानेशाला बोलवावं आता ही भिंत अशीच पुढं चालवत नेण्यासाठी? की ही स्वप्नांची पडझड अशीच पाहत राहावी आता... तूच सांग यानंतर पहाट होणार आहे की नाही? बघ दूरवरून ऐकू येताहेत भावस्वर.. ‘वो सुबह कब आएगी...?’

( jyotikadam07@rediffmail.com )

Web Title: When will that morning comes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.