ज्यांची बाग फुलून आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 07:43 PM2018-04-07T19:43:38+5:302018-04-07T19:47:08+5:30
अनिवार : मयुरी सांगत होती लग्न ठरलं, साखरपुडाही झाला. लग्नाच्या काही दिवस आधी अचानक एक दिवस सासरे घरी आले आणि तिच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही लग्नाचा फेरविचार करावा कारण आमचा मुलगा नोकरी करणार नाही म्हणतोय. त्याऐवजी कोणती तरी संस्था काढायची म्हणतोय, बघा. मग मयुरी आणि सुरेश राजहंस यांची भेट झाली. भेटीत त्यांनी सांगितले, तमासगीरांच्या मुलांच्या शिक्षणासाठीच ते कार्य करणार आहेत. तमासगीर आणि त्यांची सगळी पार्श्वभूमी तिने ऐकली आणि तिनेही त्यांना साथ देण्याचे ठरवले. माहेर, सासर, नातेवाईक सगळ्यांच्या विरोधातच २८ मे २०११ रोजी त्यांचं लग्न झालं आणि लग्नाच्या आठव्या दिवशी ५ जून रोजी १३ मुलांसह सासूबार्इंच्या पाठिंब्यानं बीड जिल्ह्यातील शिरूरकासार तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब येथे सेवाश्रमचं काम सुरू झाले.
- प्रिया धारूरकर
तिला विचारलं, लहानपणापासून समाजकार्याची आवड होती का? ती म्हणाली नाही मला काही फारसं माहिती नव्हतं, कळतंही नव्हतं; पण जेव्हा या मुलांबद्दल ऐकलं, पोटासाठी चाललेली यांच्या जन्मदात्यांची फरपट समजली, या मुलांची दैन्यवस्था बघितली तशी माझ्यातली यशोदा आईपण घेऊन या मुलांसाठी उभी राहिली.
गेल्या सात वर्षांपासून या मुलांचा खूप लळा लागलाय. आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटतंय.
ती सांगत होती, २००६ साली दीपक नागरगोजे यांच्या शांतीवनमध्ये काम करताना सुरेश यांनाही आपण स्वतंत्रतेनी काही सामाजिक कार्य करावे असे वाटू लागले. त्यासंदर्भात त्यांची चर्चाही झाली आणि नेमके त्याचवेळी कोल्हाटी समाजातले डॉक्टर आणि लेखकही असणारे ‘किशोर शांताबाई काळे’ यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचं ‘कोल्हाट्याचं पोर’ हे आत्मचरित्र चर्चेत आलं. तेव्हा त्या समाजाची एकूण अवस्था, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ, त्यांचं एकूणच फरफाटलेलं जीवन समोर आलं. मग त्यांच्यासाठीच आयुष्य वेचायचं ठरवलं. त्या अनुषंगाने वर्षभर महाराष्ट्रभर फिरून, वस्त्या वस्त्यांवर जाऊन एकूण २५३ वस्त्यांचा सर्व्हे केला. तेव्हा अनेकानेक गंभीर बाबी समोर आल्या. तमाशा ही खरं तर महाराष्ट्राची लोककला; पण या लोककलावंतांचं किंवा कलावंतिणींच्या आयुष्याची मात्र वाताहत. लोकाश्रयावर चालणारी, फारसे उत्पन्न नसणारी कला. शासन दरबारीही यांच्यासाठी कोणत्या योजना नाहीत. पोटासाठी वर्षातले ९ महिने ते पालावर. साधारण नवरात्राच्या ५व्या, ७ व्या माळेपासून ते ज्येष्ठीपौर्णिमेपर्यंत गावोगावी फिरस्ती त्यामुळे मुलं कोणा नातेवाईकाच्या भरोशावर सोडलेले. रस्त्यावर, एकटीच वाढणारी ती मुलं मग शिकण्याऐवजी चोऱ्यामाऱ्या करतात, भंगार गोळा करतात, गारेगार विकतात, वीटभट्टीवर कामाला जातात आणि अत्याचारालाही बळी पडतात. लैंगिक शोषण होतं. त्यांच्यात हळूहळू गुन्हेगारीवृत्ती जन्म घेती. हे सगळं थांबलं पाहिजे. या सैरभैर मुलांना शिक्षण दिले तर कुठेतरी हे थांबेल. या उद्देशानीच हा सेवाश्रम आम्ही सुरू केला आहे. राहत्या जागेतच वर्ग भरवत ‘आनंद निकेतन’ ही शाळा सुरू केली.
मयुरी सांगत होती ताई खूप सुंदर आणि गोड मुलं आहेत ही. तमाशाचे दोन प्रकार आहेत संगीत बारी किंवा कला केंद्र आणि तंबूतला किंवा ढोलकी फडाचा तमाशा त्यातल्या ढोल की फडाच्या तमाशातल्याच तमासगीरांची मुले आम्ही घेतो. कारण कला केंद्रातल्या कलावंतिणी बरं कमावतात.
वेगवेगळ्या फडातून आलेल्या या प्रत्येकाची कहाणी वेगळी. एकच आई असलेल्या दोन मुलांचे नाव, जात, वडील वेगळे तर कोणाला व्यसनी बापाने स्वत:च्या व्यसनासाठी भीकेला लावलेलं तर कोणाची आई मुलं आजीकडे ठेवून तमाशात गेली ती परतलीच नाही. कोणाच्या आईचा बापाने खून केल्यामुळे बाप जेलमध्ये आहे. करुण कहाण्यांनी मुसमुसलेलं बालपण, त्यांना कोणताच धरबंध नसल्याने त्यांची भाषाही आपल्याला लाजिरवाणी वाटणारी. कोणतेच संस्कार नसल्यामुळे त्यांना प्रवाहात आणताना सुरुवातीला थोडं अवघड जातं. गोड बोलत, प्रेम करत, त्यांच्यात विश्वास निर्माण करावा लागतो. वैयक्तिक स्वच्छता शिकवावी लागते. त्यांचा मुळापासून अभ्यास घ्यावा लागतो. पण आज ही मुले चांगले गुण घेत शिकत आहेत. कुटुंबातील घटक बनत आहेत. सुसंस्कृत नागरिक घडवण्याचा वेगळाच आनंद आम्ही दोघे घेत आहोत.
जास्तीत जास्त तमाशातल्या मुलींना बाहेर काढणे हे आमचं उद्दिष्ट आहे. तसं हे जिकिरीचे कारण सोळाव्या वर्षी पैशांसाठी पायात घुंगरू बांधून तिला फडावर उभं केलं जातं. त्यामुळे तिच्या पालकांचं, नातेवाईकांचं समुपदेशन करणं म्हणजे एक प्रकारे संघर्षच असतो. त्यातही ती सुंदर असेल तर अजून अवघड; पण आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. यशस्वी होतो. मात्र एकीला ती मोठी झाल्याचं कळल्यावर तिच्या मामांनी तिला बळजबरी नेलेच, त्यावेळी आम्ही हतबलच झालो होतो.
‘ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी, ज्यांचे नाते सूर्यकुलाशी त्यांनी थोडा उजेड द्यावा’ या दत्ता हलसगीकर यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे थोडा उजेड देण्याचा प्रयत्न करत थोर समाजसेवक विकास आमटे, आनंदवन मित्रमंडळ, मैत्र मांदियाळी, सुरेश जोशी, आमदार विनायक मेटे यांच्यासह मोलाची मदत करणाऱ्या अनेक व्यक्ती या सर्वांच्या सहकार्याने आमची वाटचाल चालू आहे.
जाणीवपूर्वक बहिष्कृत ठेवलेल्या या समाजाबद्दल लिहिताना कवितेच्या पुढच्या ओळीही आठवू लागल्या, ‘आभाळाएवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे’.
( priyadharurkar60@gmail.com )