यादवकालीन रामनारायण मंदिर अर्थात खोलेश्वर मठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:40 PM2018-01-19T19:40:35+5:302018-01-19T19:42:26+5:30
स्थापत्यशिल्प : बीडमधील अंबाजोगाई हे यादवकालीन ‘आम्रपूर’ मोठे संपन्न नगर म्हणून प्रस्थापित पावले होते. हा विकास अकराव्या शतकापासून सुरू होऊन सिंघन राजाचा प्रसिद्ध आणि पराक्रमी सेनापती, खोलनायकाच्या वास्तव्य काळापर्यंत झालेला दिसतो व ती प्रांतिक राजधानी म्हणून मान्यता पावलेली दिसते. अंबाजोगाईचे यादवकालीन प्रासादिक वर्णन आपण मागे चौबारा गणेशाचे मंदिराचा अभ्यास करताना काही प्रमाणात अभ्यासले होते.
- साईली कौ. पलांडे-दातार
१३ व्या शतकातील खोलेश्वराची कन्या लक्ष्मी निर्मित खोलेश्वर मठ मंदिराचा आढावा आपण आजच्या लेखात घेणार आहोत. आज जैत्रपाल गढी परिसरस्थित मंदिराचा परिसर, त्या काळात ब्रह्मपुरी नावाने ओळखला जात होता. या मंदिराची पार्श्वभूमी व निर्मितीची विस्तृत माहिती आपल्याला मंदिरातील प्रवेशद्वाराच्या डावीकडील गुळगुळीत प्रस्तर शिळेवर कोरलेल्या संस्कृत- मराठी अभिलेखातून मिळते. यादव सेनापती खोलेश्वर व त्याचा मुलगा रामदेव यांच्या विविध पराक्रमाची प्रशस्ती या लेखात नोंदविलेली आहे. मंदिर पूर्ण होण्याचा व लेखाचा काळ शके ११६२ दिला असून, तिथीप्रमाणे तारीख शनिवार, २७ आॅक्टोबर सन १२४० येते. प्रशस्तीकाराचे नाव वाग्देवता भट्ट ( संस्कृत- वागीश कविराज) असून नोवरें गावच्या रेमेयाचा मुलगा, जोईयाने हा २७ ओळींचा लेख खोदल्याची नोंद आहे. देवभोगासाठी बांधडे गावातील २ मळे व ३ घाणे दिलेले आहेत. मुखमंडप, दोन अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ, चौकोनी गर्भगृह व निरंधार प्रदक्षिणा मार्ग, असा सर्वसाधारण तलविन्यास आहे. मंदिर ५ फूट उंच जोत्यावर उभे आहे व पायर्या चढून मुखमंडपातून आपण मंदिरात प्रवेश करतो. मंदिराला मुखमंडपाखेरीज वामनभिंती असलेले दोन अर्धमंडप आहेत. जे आज विटांचे बांधकाम करून बंद केलेले दिसतात.
अर्धमंडपात व मुखमंडपात बसण्यासाठी कक्षासने केली आहेत. चौरस सभामंडपात स्तंभाची अष्टकोनी रचना करून त्यावर पेललेल्या दगडांच्या वर्तुळाकार रचनेआधारे छत उंच नेलेले आहे. या छताच्या प्रकाराला ‘उक्षिप्त वितान’ असे म्हणतात. वर्तुळाकार रचनेच्या मध्यभागी दगडाचे पुष्पशिल्प बसविले आहे. या भव्य सभामंडपात मध्यभागी भौमितिक चौरस पीठावर वर्तुळाकार रंगशीला बसवलेली आहे. मंदिरातील एकूण स्तंभ ३२ असून, ते दोन वेगवेगळ्या चौकोनी आकाराचे, उत्तर यादवकालीन शिल्पविरहित आहेत.
सभामंडपाच्या मागील बाजूस दोन फांसना शिखरे असलेली देवकोष्ट असून, एकात शेंदूर लावलेली गणेशाची व दुसर्यात खंडित नृत्यशिवाची मूर्ती आहे. नृत्यशिवाची मूर्ती अष्टभुज असून भुजंगत्रास मुद्रेतील आहेत. खाली शिवगण विविध वाद्ये वाजवताना दाखविले आहे. अंतराळातील देवकोष्टे चार थरांची फांसना शिखरयुक्त असून, एकात छोटी भैरव मूर्ती व दुसर्यात तांदळा आहे.
गर्भगृहाची द्वारशाखा पंचशाखा नंदिनी प्रकारची असून, विलक्षण सुंदर आहे. व्याल, पत्र स्तंभ आणि रत्न शाखेबरोबरच येथे वीर नराची शाखा असणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. खोलेश्वर पुत्र रामदेवाच्या पराक्रमी मृत्यूची आठवण करून देणारे हे वीर, प्रभावी युद्ध आवेशात कोरले आहेत. द्वारशाखेच्या पायापाशी वैष्णव द्वारपालांच्या खंडित मूर्ती आहेत. ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात आज शिव पिंड आहे. जी नंतरच्या काळात आहे. मंदिरातील मुख्य मूर्ती आज अस्तित्वात नाही. गाभार्यात एक खंडित उमा महेश्वर आलिंगन मूर्ती ठेवलेली आहे. याखेरीज सभामंडपात एक पूर्व मध्ययुगीन ब्रह्मदेवाची द्विभुज मूर्ती आहे. हातात सृक व पुस्तक आहे. पायापाशी हंस आणि चौरीधारी दासी कोरलेली आहे.
गर्भगृह, अंतराळ व सभामंडपाच्या बाह्यभागावर चौकोनी पीठ, रत्न थर, पद्म, कुंभ, थर दिसतात. कुंभ भागावर विशिष्ट ठिकाणी देवता मूर्तीचे अंकन आहे. जंघेवर कुमुद, पद्म, केवल हे थर असून वर अर्धस्तंभाची मालिका कपोतापर्यंत नेलेली आहे. सभामंडप चौकोनी आकाराचा असून गर्भगृह चौरस आहे व पंचरथ आहे. उत्तर, पश्चिम व दक्षिण बाजूंना तीन देव कोष्ट असून, त्यात अनुक्रमे नटेश्वर शिव, विष्णू व विदीर्ण नरसिंहाच्या मूर्ती आहेत. याव्यतिरिक्त बाह्यभागावर शिल्पांकन आढळत नाही. मूळ शिखर, जे कदाचित विटांचे असावे. आज ते अस्तित्वात नाही. बाह्य मूर्तींवर व बाह्य भागावर चुना, रंग लावल्याने ह्या मूर्तींची ओळख पटणे अवघड झाले आहे. मंदिर परिसरात नाग शिल्प व काही वीरगळ आढळतात. मंदिरामुळे पराक्रमी स्मृतींना उजाळा द्यावा!
( sailikdatar@gmail.com)