झीरो बजेट शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:07 PM2018-07-07T16:07:12+5:302018-07-07T16:07:48+5:30
लघुकथा : हे सगळ्या गोष्टी बाजूला उभ्या असलेल्या गोविंदराव वाघमारेला पटल्या. तो पटकन म्हणाला, ‘देवबा सूर्यवंशी म्हणते ते खरं हाये. लोकाच्या जिवाला धोका हाये.’ मधीच रमेश गाढे म्हणाला ‘मग काय करावं सांगा की?’ देवबा पटकन म्हणाला, ‘मी तर विषमुक्त भाजीपाला पिकवणार.’
- महेश मोरे
सगळ्या वावरात शेणखत टाकलं होतं. गाई-म्हैशी चांगल्या खंडीभर ढोर बाळगली होती. देवबा सूर्यवंशी शेतात नवनवीन प्रयोग करीत होता. त्यानं जनावराच्या राखणीला एक गुराखी ठेवला होता. आजच्या दापशेडच्या विश्वनाथ गोविंदराव होळगेची विषमुक्त शेती पाहून आला होता. त्याच्या मनी रात्रंदिवस विश्वनाथ होळगेची शेती दिसत होती. त्याचं शेणखतानं चांगलंच रान पिकत होतं. शेतीला काही तरी जोडधंदा करावं म्हणून त्याच्या डोक्यात सारखे विचार येत होते. म्हैशीचे दूध काढणे झाले होते.
इतक्यात रमेश गाढे आलेला. उभ्या उभ्याच म्हणाला, ‘‘सगळ्या वावरात शेणखत टाकलं. काय विचार हाये. कोणतं पीक घेयाचं. बापरे! तुव्हं मिरच्याचं रोप तर बरचं मोठं झालं. पाणी पडल्या-पडल्या लावतू काय की. वांगे, टमाट्याचं रोप बी तयार झालं. बऱ्याच दिस झाले तुह्या शेतात आलो नाही. तूही तयारी लई जोरात चालली.’’ बकिटीतले दूध कॅनमध्ये टाकता-टाकता देवबा म्हणाला, ‘‘तूला काय गोबीचा पैसा, टमाट्याचा पैसा, तुऱ्याचा पैसा, कदूचा पैसा मावना झाला तुह्याजवळ. तुला काय कोणतंही औषधी माकूळ फवारायलास. त्या वांग्याला डबल-डबल फवारतूस. तूव्हं कोणतंच वांगं किडकं नसतं. सगळ्या भाजीपाल्यावर औषधी फवारतूस. लोकांच्या आरोग्याचा जरा विचार कर.’’
‘सगळेजणच माकूल औषधी मारतात, मी थोडाच एकटा मारतो का?’
‘पणिक किती दिस रासायनिक खत टाकून-टाकून जमिनीचा पोत बिघडला. गिराईक आपल्या भरोशावर भाजीपाला विकत घेते. हे तुव्हं बरोबर नाही. किती रोग वाढत हायेत तू माणसायला विष खावू घालतूस.’ हे सगळ्या गोष्टी बाजूला उभ्या असलेल्या गोविंदराव वाघमारेला पटल्या. तो पटकन म्हणाला, ‘देवबा सूर्यवंशी म्हणते ते खरं हाये. लोकाच्या जिवाला धोका हाये.’ मधीच रमेश गाढे म्हणाला ‘मग काय करावं सांगा की?’ देवबा पटकन म्हणाला, ‘मी तर विषमुक्त भाजीपाला पिकवणार.’
‘हा! हा!’ मोठ्याने रमेश गाढे हसला. म्हणाला ‘रासायनिक खताबिगर अन् औषधी फवारल्याशिवाय उत्पन्नच निघत नाही. निघाले विषमुक्त भाजीपाला पिकवायला. असं करणं म्हंजी उलटी गंगा आणणं होय.’
‘तुला काय झालं हसायला देवबा म्हणतो ते खरं हाये. मी बी विषमुक्त भाजीपाला पिकवणार.’
‘त्याला घडई परीस मडई जास्त लागते. मग तुम्ही अंदर येणार फाशीच घेणार.’ ‘तसं न्हाई रमेश आज शहरातली माणसं असा संकरीत भाजीपाला खाऊन कंटाळलीत.’
‘मी देवबा म्हणेन तेच करणार.’
करा बाबा काही बी... असं बोलून रमेश गाढे निघून गेला. गोविंदराव वाघमारे अन् देवबा सूर्यवंशीने एकमेकाच्या हातावर टाळी दिली. दोघांनीही मनाशी खूणगाठ बांधली. विषमुक्त भाजीपाला पिकवणे सुरू झाले. त्यासाठी दोघांनी अपार मेहनत घेतली. त्यांना साथ दापशेडच्या विश्वनाथ होळगे यांनी दिली. त्यांनीही विषमुक्त भाजीपाला पिकवला. आता विक्री कोठे करणार हा प्रश्न त्यांना पडला. झीरो बजेट नैसर्गिक शेती ही संकल्पना त्यांनी अॅड. उदय संगोरेड्डीकर यांना सांगितली. त्यांच्या घरासमोर चिखलवाडी कॉर्नरला नांदेड येथे विषमुक्त भाजीपाला विक्री होऊ लागला. बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवशी भाजीपाला विक्री केंद्र सुरू झाले.
सात ते अकरा असा वेळ ठरला. तोंडोतोंडी प्रचार वाढत गेला. विषमुक्त भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी की गर्दी वाढू लागली. देवबा सूर्यवंशीच्या प्रयत्नाला यश आले होते. झीरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रचार विश्वनाथ होळगे करू लागला. विषमुक्त भाजीपाल्याला शहरातील माणसे मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागले. देवबाचा जोडधंदा यशस्वी झाला. आता विश्वनाथ होळगे व देवबाच्या झीरो बजेट शेतीकडे रमेश गाढे बी वळला होता.
( maheshmore1969@gmail.com )