Ball Tampering : कुठे हरवली क्रिकेटमधील सभ्यता?

By Namdeo Kumbhar | Published: March 29, 2018 12:22 PM2018-03-29T12:22:37+5:302018-03-29T12:37:12+5:30

गेल्या पंधरवाड्यात क्रिकेटविश्वात घडलेल्या या घटना पाहून एक प्रश्न तमाम क्रिकेटप्रेमींना पडलाय. तो म्हणजे, 'क्रिकेटमधील सभ्यता कुठं हरवली?'  

Ball Tampering : Where are the ethics In cricket lost? | Ball Tampering : कुठे हरवली क्रिकेटमधील सभ्यता?

Ball Tampering : कुठे हरवली क्रिकेटमधील सभ्यता?

क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड आहे. गल्लीबोळात, इमारतीच्या आवारात, मैदानात किंबहुना मिळेल त्या जागेत क्रिकेट खेळणारी मुले आपल्याला पाहायला मिळतात. गोर्‍या साहेबाने ज्यावेळी क्रिकेटला जगासमोर आणलं तेव्हापासून हा सभ्य लोकांचा खेळ मानला जातो. मात्र, गेल्या काही काळात या सभ्यतेला तडा गेल्याचे दिसत आहे. मैदानावर खेळाडूंचे वर्तन क्रिकेटला साजेसे दिसत नाही. काही वेळा पंच, सामनाधिकारी यांचेही निर्णय आक्षेपार्ह आहेत. श्रीलंकेत झालेल्या निदहास स्पर्धेदरम्यानचं बांगलादेशी खेळाडूंचं वर्तन, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू कगिसो रबाडा याला झालेली शिक्षा आणि आता ऑस्ट्रेलियाच्या त्रिमूर्तीने केलेला प्रताप. गेल्या पंधरवाड्यात क्रिकेटविश्वात घडलेल्या या घटना पाहून एक प्रश्न तमाम क्रिकेटप्रेमींना पडलाय. तो म्हणजे, 'क्रिकेटमधील सभ्यता कुठं हरवली?'  

अलीकडच्या काळात व्यवसायिक क्रिकेटमुळं खेळण्याच्या आणि सामने जिंकण्याच्या विचारसरणीतच आमुलाग्र बदल झाला आहे. पण काळ बदलला म्हणून खिलाडूवृत्ती आणि सभ्यता बदलण्याचे कारण नाही. म्हणजे प्रश्‍न आहे तो खेळाप्रती असलेल्या अभावाचा. क्रिकेट हा खेळ ब्रिटिशांनी जन्माला घातला, तर त्यातील शेरेबाजीचे (स्लेजिंग) बाळकडू ऑस्ट्रेलियाने दिले, असे म्हणायला हरकत नाही. मैदानावरील कामगिरीसाठी रणनीती आखली जाते, पण स्मिथने दिलेल्या कबुलीवरून असे जाणवतं की, ऑस्ट्रेलिया संघ ‘स्लेजिंग’चीही व्यूहरचना करत असतो. 
 
चेंडू कुरतडल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर आयसीसीनं रविवारी स्मिथ, वॉर्नर आणि बेनक्रॉफ्ट यांच्याविरुद्ध कारवाई केली. त्यानंतर जगभरात टीकेला सामोरं जाणाऱ्या क्रिकेट ऑस्ट्रेलियानं कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची, तर कॅमरून बेनक्रॉफ्ट याच्यावर नऊ महिन्यांची बंदी घातली. आयसीसीने या त्रिमूत्रीवर केलेल्या कारवाईवर हरभजनसिंगने जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांना करण्यात आलेली ही शिक्षा फारच सौम्य असल्याचा आरोप भज्जीने केला. आयसीसी खेळाडूंवर शिक्षा करताना भेदभाव करत असल्याची खंत भज्जीने व्यक्त केली. 

"वाह, आयसीसी वाह । ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आयसीसीने जी वागणूक दिली त्या गोष्टीला 'फेअर प्ले' म्हणायचं का? बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली, त्याने ते मान्यही केलं. याबाबतचे पुरावेही आहेत. पण त्याला फारच कमी शिक्षा केली. 2001 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात भारताच्या सहा खेळाडूंना कोणताही पुरावा नसताना दोषी ठरवण्यात आले होते आणि कडक कारवाईही केली होती." हरभजन याबाबत पुढे म्हणाला की,  "ऑस्ट्रेलियामध्ये 2008 साली मंकी गेट प्रकरण झाले होते. त्या प्रकरणात मी दोषी म्हणून सापडलो नव्हतो. तरीही माझ्यावर तीन सामन्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे या खेळाडूंवर आयसीसीने नेमका कोणता न्याय लावला, हे समजणे अनाकलनीय आहे." अशा प्रकारचे ट्विट करत भज्जीने आयसीसीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. 
कदाचीत आयसीसीचे याकडे लक्ष गेलं नसावं. भज्जीच्या या मताशी मी सहमत आहे. कारण आयसीसी या घटनेला फक्त चेंडूशी छेडछाड केली इतकंच पाहतेय. ऑस्ट्रेलिया संघानं केलेली ही साधीसुधी नाही.  सामना जिंकण्यासाठी विचार करून केलेलं मोठं षड्यंत्र आहे. चेंडू कुरतडण्याचा प्रकार एखाद्या खेळाडूनं केला असता तर गोष्ट वेगळी होती. पण या कृत्यामध्ये सर्व संघच सामील असल्याचे मला वाटते. कारण, पराभवापासून वाचण्यासाठी कॅमरून बेनक्रॉफ्ट चेंडूला कुरतडणार असल्याचे सर्व संघाला माहीत होतं. 

कोणत्याही खेळामध्ये जय-परायज असतोच आणि प्रत्येक खेळाडूने खिलाडू वृत्तीनं पराभव किंवा विजय मोकळ्या मनाने स्वीकारायला हवा. पण काही जण क्रिकेटच्या सभ्यतेची ऐशीतैशी करत असतात. जिंकण्यासाठी सर्वस्व बहाल करण्याचा खेळ एकीकडे होत असताना, दुसरीकडे खिलाडूवृत्ती पायदळी तुडवली जाऊन स्वतःविषयीचा आदर कमी करतात. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केलेल्या कृत्यामुळं त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. कांगारुंची खिलाडूवृत्ती लृप्त झाली आहे का? आपला पराभव ते पचवू शकत नाहीत का? विजयासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू कोणत्याही स्तराला जाऊ शकतात असेच काहीसं चित्र समोर आलं आहे.
 
खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या लेग स्पिनरच्या रूपाने स्मिथने संघात जागा मिळवली. इंग्लंडविरोधातील अ‍ॅशेज् मालिकेत त्याने तिसऱ्या कसोटीत कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 239 धावांची खेळी केली. त्याने 2017 मध्ये 1000 धावादेखील पूर्ण केल्या. सलग चौथ्या वर्षी त्याने ही कामगिरी केली. कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये स्मिथ अव्वल स्थानावर आहे. 26 व्या वर्षी कर्णधारपद स्वीकारणाऱ्या स्मिथवर कर्णधारपदाच्या दबावाचा परिणाम झाला नाही. स्मिथची तुलना नेहमीच महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली जाते. पण स्मिथने केलेल्या घोडचुकीनंतरही त्याला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणायचं का? स्मिथचा खोटारडेपणा सर्वांसमोर उघड होण्याची ही काही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी भारताविरोधात झालेल्या कसोटी सामन्यामध्ये तो वादात अडकला होता. त्यावेळी आयसीसीनं कोणतीही कारवाई केली नव्हती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ पायचीत झाला, तेव्हा त्याने ‘डीआरएस’ घेऊ की नको हे ड्रेसिंग रूमकडे पाहून विचारलं होतं. 2016 मध्ये पंचाने दिलेल्या निर्णयावर स्मिथने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं त्याला दंडाला सामोर जावं लागले होते. एखाद वेळा चूक झाली तर माफ केलं जातं पण तीच चूक पुन्हा पुन्हा होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे का? 

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅलकम टर्नबुल यांनी चेंडूच्या छेडखानी प्रकरणानंतर क्रिकेटची प्रतिमा सुधारण्यासाठी या खेळातून स्लेजिंग संपविण्याचे आवाहन केले आहे. टर्नबुल यांनी छेडछाड प्रकरण ऑस्ट्रेलियासाठी मानहानीकारक असल्याचे म्हटले आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानाला जगासमोर खेद व्यक्त करावा लागणे किंवा माफी मागावी लागणे कितपत योग्य आहे. जर क्रिकेटला पुन्हा एकदा आदर्श आणि सभ्यतेचा खेळ म्हणून प्रतिमा निर्माण करायची असेल तर क्रिकेट स्लेजिंगवर अंकुश लावायला हवा. स्लेजिंग करणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाई व्हायला हवी. स्लेजिंगला क्रिकेटमध्ये कुठेही स्थान नसले पाहिजे. क्रिकेट पुन्हा एकदा आदर्श खेळ म्हणून जगापुढे यावा. एवढी हातचलाखी करूनही त्रिकुटावर आयसीसीने फक्त एका सामन्याची बंदी आणि सामन्याच्या मानधनातील रक्कम कपात केली आहे.  हीच परिस्थिती भारत ऑस्ट्रेलियात खेळत असताना घडली असती आणि विराट कोहलीकडून असा प्रकार झाला असता, तर हरभजन-सायमंड्‌स यांच्यातील मंकी गेट प्रकरणाप्रमाणे रान उठवले गेले असते. म्हणूनच क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे काय?, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

Web Title: Ball Tampering : Where are the ethics In cricket lost?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.