Blog : अजिंक्य... तुझ्या हातात IPL ट्रॉफी पाहून जाम भारी वाटतंय! बाकीच्यांच्या पोटात मात्र दुखतंय
By स्वदेश घाणेकर | Published: May 30, 2023 01:18 PM2023-05-30T13:18:11+5:302023-05-30T13:20:07+5:30
CSKच्या या विजयात एक Unsung हिरो होता आणि तो म्हणजे आपला अज्जू... अजिंक्य रहाणे... मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स , कोलकाता नाइट रायडर्स या संघांकडून आयपीएल खेळलेल्या अजिंक्यला एकदाही ट्रॉफी उंचावता आली नव्हती, परंतु आज त्याचे हेही स्वप्न पूर्ण झाले...
इंडियन प्रीमिअर लीगचे १६ वे पर्व हे महेंद्रसिंग धोनीमय होते... चेन्नई, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, पंजाब, कोलकाता, राजस्थान, अहमदाबाद जिथे जाऊ तिथे MS Dhoniचे समर्थक मोठ्या संख्येने आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या प्रत्येक सामन्यात मग तो घरी असो किंवा बाहेर.. पिवळा जनसागर आलेला पाहायला मिळाला. धोनीशी सर्वांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत आणि 'थाला'ही या संघाशी व फॅन्सशी जोडला गेला आहे. त्याच्या प्रेमापोटीच ही सर्व गर्दी उसळली होती आणि धोनीच्या शिलेदारांनी पाचवे जेतेपद जिंकून त्यांना निराश नाही केले... पण, धोनीच्या व CSKच्या या विजयात एक Unsung हिरो होता आणि तो म्हणजे आपला अज्जू... अजिंक्य रहाणे... मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स , कोलकाता नाइट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांकडून आयपीएल खेळलेल्या अजिंक्यला एकदाही ट्रॉफी उंचावता आली नव्हती, परंतु आज त्याचे हेही स्वप्न पूर्ण झाले... या स्वप्नासाठी तो आतल्याआत झुरत होता... संधीची वाट पाहत होता आणि कॅप्टन कूलने त्याची ही भूक ओळखली अन् संधी दिली...
आयपीएल ऑक्शनमध्ये जेव्हा अजिंक्य अनसोल्ड राहिलेला.. तेव्हा आपल्या पठ्ठ्याची आयपीएल कारकीर्दही संपुष्टात येतेय की काय अशी भिती वाटली होती. पण, CSK च्या मॅनेजमेंटने अखेरच्या क्षणाला अजिंक्यला ५० लाखांच्या मुळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले... डॅडी आर्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या CSK चा हा निर्णय कदाचित त्यांच्या चाहत्यांनाही पटला नव्हता... ज्या खेळाडूला भारतीय कसोटी संघात स्थान टिकवता आले नाही, त्याला महेंद्रसिंग धोनीने CSKच्या संघात का बरं घेतलं असावं, हा सवाल नक्की त्यांना पडला असेल.. त्यात काही चुकीचंही नव्हतं.. अजिंक्यची आंतरराष्ट्रीय कामगिरी ढासळलेली होती. तो रणजी करंडक स्पर्धेत चांगला खेळत होता, परंतु त्याचा ट्वेंटी-२०शी कनेक्ट तुटल्याचा सर्वांना अंदाज होता...
अजिंक्यने एक काळ आपयीएल गाजवली होती.. २०१२, २०१३, २०१५ व २०१६च्या आयपीएलमध्ये त्याने अनुक्रमे ५६०, ४८८, ५४० व ४८० अशा धावा केल्या होत्या. पण, २०२० नंतर त्याने पुढील तीन हंगामात ११३ ( ९ सामने), ८ (२ सामने) व १३३ ( ७ सामने) अशी निराशाजनक कामगिरी केली. CSK ने त्याला ताफ्यात घेतले, परंतु तो डग आऊटमध्येच दिसत होता. डग आऊटमध्येच अजिंक्यची आयपीएल संपतेय असे वाटत होते. पण, धोनीने बरोबर मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर अजिंक्यला संधी दिली... हिच ती वेळ, हात चो क्षण अशा निर्धाराने जिंक्स मैदानावर उतरला अन् २७ चेंडूंत ६१ धावा चोपून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला... या खेळीतून त्याने त्याच्यातील धावांची भूक जगाला अन् BCCI ला दाखवून दिली... ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्येही तंत्रशुद्ध फलंदाजी कशी करावी अन् चौकार-षटकार कसे खेचावे हे अजिंक्यच्या त्या खेळीतून सर्वांनी पाहिले...
सुपला, झोपला, स्कूप हे शरीराचा चुरगळा करणारे फटके अजिंक्यच्या यादीत नाहीच... चेंडूवर परफेक्ट टायमिंग ही त्याची नजाकत आणि त्यामुळेच तो विशेष ठरतो. क्रिकेटच्या पुस्तकातले सर्व सुरेख व नेत्रदिपक फटके अजिंक्यच्या बॅटीतून पाहायला मिळाले. त्यामुळेच कसोटी संघातून बाहेर काढलेल्या अजिंक्यसाठी BCCIलाही रेड कार्पेट हांतरावेसे वाटले अन् WTC Final साठीच्या संघात त्याची पुन्हा निवड झाली... अजिंक्यचा फॉर्म खराब होता, परंतु त्याच काळात रोहित, विराट हेही धडपडत होतेच. पण, कुऱ्हाड पडली अजिंक्यवर... त्याने तो खचला नाही, नव्या दमाने उभा राहिला अन् मानाने संघातील स्थान पुन्हा पटकावले.. आयपीएलमध्ये त्याने १४ सामन्यांत १७२.४९च्या स्ट्राईक रेटने ३२६ धावा चोपल्या. इडन गार्डनवरतर अजिंक्यने वादळच आणले होते.
कालही फायलमध्ये त्याची १३ चेंडूंतील २७ धावांची खेळी CSKसाठी टर्निंग पॉईंट ठरली... ऋतुराज व कॉनवे हे सेट फलंदाज माघारी गेल्यानंतर दडपण न घेता अजिंक्यने ही फटकेबाजी केली.. त्याने मारलेले दोन षटकार डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. अजिंक्याने या सामन्यातील स्ट्रायकर ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकला. पुन्हा यश मिळवूनही अजिंक्यचे पाय जमिनीवरच आहेत... त्याने या कामगिरीचे श्रेय CSK मॅनेजमेंट व माहीला दिले आहे.. त्यांच्या पाठिंब्याशिवाय अन् दिलेल्या संधीशिवाय हे शक्य नसल्याचे त्याने प्रांजळपणे मान्य केले.. आता अजिंक्यकडे CSKचा भावी कर्णधार म्हणूनही काही लोकं पाहू लागले आहेत. फक्त फलंदाजीतच नव्हे, तर अजिंक्यने यंदा क्षेत्ररक्षणात दाखवलेली चपळता ही भल्याभल्या युवा खेळाडूंना लाजवणारी ठरली..
शांत स्वभाव... मेहनत करण्याची जिद्द ठेवणाऱ्या अजिंक्यच्या हातात आयपीएल ट्रॉफी बघून माझ्यासारख्या अनेक चाहत्यांना नक्की आनंद झाला असेल... ट्वेंटी-२० हा आक्रमकतेसोबतच तंत्रशुद्ध फटक्यानेही खेळला जाऊ शकतो हे अजिंक्यने दाखवून दिले.. आता त्याचा हा कमबॅक टीकाकारांसाठी पोटदुखी ठरू शकतो. पण मराठी माणसासाठी अन् त्याच्या चाहत्यांसाठी हा अविस्मरणीय क्षण नक्कीच आहे... शेवटी हेच म्हणेन, अजिंक्य तुझ्या हातात आयपीएल ट्रॉफी पाहून जाम भारी वाटतंय...