BLOG: राहुल द्रविडच्या वाटेनं निघालाय गौतम गंभीर, 'कॅप्टन कूल' धोनीला ही 'किमया' जमेल?
By विराज भागवत | Published: July 11, 2024 07:31 PM2024-07-11T19:31:59+5:302024-07-11T19:36:36+5:30
Gautam Gambhir MS Dhoni Team India: धोनी उत्तम क्रिकेटपटू आहेच, पण त्याच्याकडे अशी एक गोष्ट नाही, जी गौतम गंभीरकडे आहे. ती गोष्ट म्हणजे...
-विराज भागवत
२९ जून... रात्रीची वेळ... हार्दिक पांड्याने शेवटचा चेंडू टाकला अन् बार्बाडोसच्या मैदानापासून ते भारताच्या गल्लीबोळापर्यंत सर्वत्र जल्लोष सुरु झाला. भारताने T20 World Cup अखेर जिंकला. रोहित शर्मा, विराट कोहली या दिग्गजांनी भारतीयांना विजयोत्सव साजरा करण्याची संधी दिली. त्यांच्याइतकाच हा वर्ल्डकप मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसाठीही खास होता. हेड कोच म्हणून शेवटचा सामना असलेल्या द्रविडला विजयी निरोप मिळाल्याचे समाधान प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीच्या चेहऱ्यावर दिसले. या विजयाच्या माहौलमध्येच मंगळवारी BCCIकडून एक महत्त्वाची घोषणा झाली. द्रविडच्या जागी भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) ची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली. २००७ आणि २०११च्या वर्ल्डकप फायनलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करून भारताला दोन वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरपुढे आता मैदानाबाहेर राहून टीम इंडियाला पुन्हा एकदा विश्वविजेता बनवायचे 'चॅलेंज' आहे. 'हे पुन्हा शक्य आहे' हा आत्मविश्वास गंभीरमध्ये आहे, तो याआधी दिसलाय अन् वेळोवेळी दिसेलही. पण 'थाला' महेंद्रसिंग धोनी म्हणजे अनेकांचा लाडका MS धोनी याला हे कधी जमणार?
It is with immense pleasure that I welcome Mr @GautamGambhir as the new Head Coach of the Indian Cricket Team. Modern-day cricket has evolved rapidly, and Gautam has witnessed this changing landscape up close. Having endured the grind and excelled in various roles throughout his… pic.twitter.com/bvXyP47kqJ
— Jay Shah (@JayShah) July 9, 2024
महेंद्रसिंह धोनी हा एक उत्तम कर्णधार, उत्तम फलंदाज आणि एक उत्तम 'मॅच फिनिशर' आहे यात कोणाचं दुमत असूच शकत नाही. आपल्या समृद्ध अशा क्रिकेट कारकिर्दीत धोनीने ICCच्या तीनही मानाच्या ट्रॉफी जिंकल्या. IPL सारख्या मोठ्या स्पर्धेत कर्णधारपद भूषवून पाच वेळा चेन्नई सुपर किंग्जला (CSK) विजेता बनवलं. टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळताना तुफानी फलंदाजी करून दाखवली. सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 'जगातील सर्वोत्तम फिनिशर पैकी एक' बनून दाखवलं. पण इतकं सगळं असूनही धोनीकडे अशी एक गोष्ट नाही, जी सध्या गौतम गंभीरकडे आहे... ते म्हणजे मैदानाबाहेर राहून संघाला विजय मिळवून देण्याचा आत्मविश्वास!
महेंद्रसिंह धोनीची क्रिकेटमधून निवृत्ती हा गेल्या तीन-चार वर्षांपासून सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. २०१९च्या विश्वचषकात भारत पराभूत झाल्यावर धोनी निवृत्त होईल असा फॅन्सचा अंदाज होता. पण धोनीने वाट पाहिली अन् अखेर कोविड काळात १५ ऑगस्ट २०२०ला निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर IPL स्पर्धेलाही धोनी रामराम ठोकेल असा अंदाज बांधला जात होता. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर चार हंगाम झाले, अद्यापही धोनीला निवृत्तीचे वेध लागल्याचे दिसत नाही. २०२१ आणि २०२३ या दोन वर्षी CSKने विजेतेपद मिळवले. रोहित, विराटने जे केले तसा 'विजयी निरोप' घेऊन धोनी निवृत्ती घेईल असे वाटत होते, पण अजूनही निवृत्तीवर धोनीचं उत्तर 'Definitely Not' असंच आहे. धोनीने अनादी अनंत काळापर्यंत खेळत राहावं ही त्याच्या 'जबरा फॅन्स'ची इच्छा असणं काहीच चूक नाही, पण धोनी निवृत्ती घ्यायला फारच वेळ घेतोय असे मानणाराही एक चाहतावर्ग आहे. हा उशीर होण्यामागचं कारण म्हणजेच मैदानाबाहेर राहून आपण संघाला विजयी करु शकतो या आत्मविश्वासाची धोनीमध्ये असलेली कमतरता!
अगदी ताजं उदाहरण म्हणजे, IPL 2024मधली धोनीची बॅटिंगची पोझिशन. या हंगामात CSKने १४ पैकी ७ सामने जिंकले. काही अपवाद वगळता सर्वच सामन्यांमध्ये धोनी शेवटची २-३ षटके शिल्लक असताना फलंदाजीला आला. त्याचं संघात असणं हा CSKसाठी खूप मोठा आधार आहे असं चाहते म्हणताना दिसले. पण धोनीने संघातील एक जागा उगाच अडवून ठेवली हा मुद्दाही तितकाच खरा आहे. दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग IPL दरम्यान स्पष्टपणे म्हणाला होता, "धोनीला जर नवव्या क्रमांकावरच बॅटिंगला यायचं असेल तर त्यापेक्षा त्याने खेळूच नये. त्याच्या जागी संघात एखादा वेगवान गोलंदाज खेळवता येऊ शकतो." पण धोनीने मात्र पॅटर्न बदलला नाही. यामागे कारण म्हणजे संघाला विजयी करायचे असेल तर आपल्याला संघात राहूनच ते शक्य आहे, अशी बहुधा धोनीची धारणा दिसते.
(हरभजन सिंग धोनीबद्दल काय म्हणाला होता? वाचा सविस्तर)
BCCIने धोनीला एकदा मैदानाबाहेरून संघाला मार्गदर्शन करण्याची संधी दिली होती. T20 World Cup 2021 महेंद्रसिंह धोनीला टीम इंडियाचा मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक बनवण्यात आले होते. पण स्पर्धेतील एक सामना शिल्लक असतानाच टीम इंडियांचे आव्हान संपुष्टात आले. धोनी त्या परीक्षेत नापास झाला. याउलट, गौतम गंभीरला IPL 2024 मध्ये KKR ने मेंटॉर म्हणून नियुक्त केले आणि त्याने कमाल करून दाखवली. कोलकाताच्या संघाला त्याने तिसरी IPL ट्रॉफी मिळवून दिली. विशेष म्हणजे कोलकाताने २०१२ आणि २०१४ या दोन वर्षी जेव्हा ट्रॉफी जिंकली तेव्हा गौतम गंभीर संघाचा कर्णधार होता आणि २०२४ ला गंभीर मार्गदर्शकाच्या भूमिकेत होता. दोनही भूमिका ४२ वर्षीय गंभीरने अगदी चोख पार पाडल्या. धोनीही आता ४३ वर्षांचा आहे. वाढते वय आणि खेळाचे स्वरुप पाहता, लवकरच त्याला नव्या भूमिकेत शिरावे लागेल, पण त्यासाठी गंभीरमध्ये असलेला 'तो' आत्मविश्वास धोनीमध्ये येईल का?
एखादा स्टार खेळाडू हा भविष्यात प्रशिक्षक म्हणून कशी कामगिरी करेल, हे कुणीच सांगू शकत नाही. भारताचे अनेक दिग्गज म्हणजेच सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, सौरव गांगुली यांनी विविध संघांसाठी या भूमिका पार पाडल्या आहेत. कुंबळे कोच असताना टीम इंडियाला म्हणावी तशी झेप घेता आली नाही. सचिनने टीम इंडियाचे कोच बनण्याचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला, पण २०१३ ला IPLमधून निवृत्त झाल्यापासून तो मुंबई इंडियन्सचा मेंटॉर आहे. या काळात त्याची कामगिरी संमिश्र स्वरुपाची राहिली असून मुंबईने ११ हंगामात ४ विजेतपदे मिळवली. सौरव गांगुलीनेही दिल्ली संघ व्यवस्थापनात संचालक म्हणून काम पाहिले, पण दिल्लीला अद्याप ट्रॉफी जिंकता आलेली नाही. भारताबाहेरचेच म्हणायचे तर ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार मायकल क्लार्कने कोच बनण्याऐवजी संघाचा निवडकर्ता बनणे पसंत केले. इंग्लंडचा अलिस्टर कूक हा दिग्गज आणि प्रतिभावान खेळाडू कोचच्या भूमिकेत न जाता निवृत्तीनंतर थेट क्रिकेटपासूनच दूर गेला. इतकेच नव्हे तर गौतम गंभीरसुद्धा खेळाडू म्हणून मैदानात असताना धोनीइतका प्रसिद्ध, लोकप्रिय होऊ शकला नाहीच. त्यामुळे आता धोनीदेखील निवृत्ती घेतल्यानंतर एखाद्या संघाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाणार की नम्रपणे जबाबदारी नाकारणार, हे येणारा काळच ठरवेल.