फसलेला रडीचा डाव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:47 AM2018-04-01T01:47:36+5:302018-04-01T01:47:36+5:30
चेंडू छेडछाड प्रकरणानंतर एका झटक्यात ‘क्रिकेट आॅस्ट्रेलिया’च्या लोकप्रियतेमध्ये घसरण झाली. इतकेच नाही, तर चोहोबाजूंनी क्रिकेटविश्वातील या साम्राज्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणानंतर खुद्द आॅस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना सारवासारव करावी लागते याहून दुर्दैवी बाब कोणती असेल? मुळात आॅस्ट्रेलियाला अशी ‘चिटिंग’ का करावी लागली, यामागचे कारण काय..? याचा विचारही करायला हवा.
- रोहित नाईक
चेंडू छेडछाड प्रकरणानंतर एका झटक्यात ‘क्रिकेट आॅस्ट्रेलिया’च्या लोकप्रियतेमध्ये घसरण झाली. इतकेच नाही, तर चोहोबाजूंनी क्रिकेटविश्वातील या साम्राज्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणानंतर खुद्द आॅस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना सारवासारव करावी लागते याहून दुर्दैवी बाब कोणती असेल? मुळात आॅस्ट्रेलियाला अशी ‘चिटिंग’ का करावी लागली, यामागचे कारण काय..? याचा विचारही करायला हवा.
वर्षानुवर्षे जिंकत आलेला राजा जेव्हा एका युद्धात पराभवाच्या उंबरठ्यावर असतो, तेव्हा ते युद्ध जिंकण्यासाठी तो राजा काहीही करण्यास तयार होतो. यासाठी अनेक कटकारस्थानेही रचतो; आणि याच कारस्थानांमध्ये कधीकधी त्याचाच बळी जातो. नेमकी अशीच अवस्था आज ‘क्रिकेट आॅस्टेÑलिया’ची झाली आहे. क्रिकेटविश्वात आॅस्टेÑलिया संघ अशा शिखरावर विराजमान आहे, ज्याचा सर्वच प्रतिस्पर्धी संघांना हेवा वाटतो. दखल घेण्याची बाब म्हणजे स्लेजिंग, प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे, अशी आॅसीच्या खेळण्याची पद्धत असूनही जगभर त्यांचे चाहते आहेत. मात्र, चेंडू छेडछाड प्रकरणानंतर आता एका झटक्यात त्यांच्या लोकप्रियतेमध्ये घसरण झाली. इतकेच नाही, तर चोहोबाजूंनी क्रिकेटविश्वातील या साम्राज्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणानंतर खुद्द आॅस्टेÑलियाच्या पंतप्रधानांना सारवासारव करावी लागते याहून दुर्दैवी बाब कोणती असेल? मुळात आॅस्टेÑलियाला अशी ‘चिटिंग’ का करावी लागली, यामागचे कारण काय..? याचा विचारही करायला हवा.
क्रिकेटविश्वातील प्रत्येक देशात आॅस्टेÑलियाने विजयी पताका फडकावली आहे. नुसती फडकावली नाही, तर ती अनेक वर्षे कायम फडकत राहील यासाठी मेहनत घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात आॅस्टेÑलिया संघ आपली हीच प्रतिष्ठा जपण्यासाठी खूप धडपडताना दिसला. याला कारण म्हणजे, जर का ही मालिका आॅस्टेÑलियाने गमावली, तर तब्बल १९६९-७० सालानंतर त्यांचा हा दक्षिण आफ्रिकेतील पहिला मालिका पराभव ठरेल. त्यात मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर यजमानांनी सलग दोन सामने दणक्यात जिंकून २-१ अशी आघाडी घेत आॅस्टेÑलियाला पराभवाच्या उंबरठ्यावर आणले होते. यासाठी आॅसी प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी खेळाडूंना संदेश दिला की, कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मालिका गमवायची नाही. परंतु, हा संदेश चुकीच्या पद्धतीने घेतला गेला; आणि अखेर स्वत:हून रचलेल्या कटकारस्थानामध्ये आॅस्टेÑलियाने स्वत:चीच ‘विकेट’ गमावली.
याआधीही क्रिकेटविश्वामध्ये चेंडू छेडछाड किंवा चेंडू कुरतडण्यासारखे प्रकार घडले आहेत. पण असे प्रकरण खुद्द कर्णधाराच्या योजनेप्रमाणे कधीही झाले नव्हते. त्यात एका जगज्जेत्या संघाच्या कर्णधाराची ही योजना असल्याचे कळाल्यानंतर क्रिकेटविश्वच हादरले. साहजिकच या प्रकरणी टीकेची झोड उठणे स्वाभाविक होते. कर्णधार स्टीव्ह स्मिथने पत्रकार परिषदेत या प्रकरणाची केवळ जबाबदारी न घेता हा कट माझ्या नेतृत्वामध्ये रचला गेल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली होती.
चेंडू छेडछाड प्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्मिथला एका सामन्याची बंदी आणि १००% सामनाशुल्क दंडाची शिक्षा ठोठावली. सलामीवीर कॅमेरून बेनक्राफ्ट यालाही ७५% सामनाशुल्क दंड आणि ३ डेमिट्स गुण दिले. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरला मात्र कोणतीही शिक्षा दिली नाही. परंतु, क्रिकेटविश्वात आपली डागाळलेली प्रतिष्ठा पाहता क्रिकेट आॅस्टेÑलियाने मात्र हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेत स्मिथसह वॉर्नरवर प्रत्येकी एक वर्ष, तर बेनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घातली. याशिवाय तिघांनाही उर्वरित दक्षिण आफ्रिका दौºयातून निलंबितही करण्यात आले.
मायदेशी परतलेल्या स्मिथने विमानतळावरच पत्रकार परिषद घेत आपल्या कारनाम्याबद्दल माफी मागितली आणि तो
ढसाढसा रडलाही. हे दृश्य पाहून क्रिकेटविश्वही पाघळले आणि इतके दिवस गप्प राहिलेल्या अनेकांनी, एक वर्षाची बंदी म्हणजे अत्यंत कठोर शिक्षा असल्याचे मत व्यक्त केले. यामध्ये अनेक स्टार आणि दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. पण असा प्रकार स्मिथऐवजी एखाद्या आशियाई खेळाडूकडून झाला असता, तर स्मिथला मिळालेली सहानुभूती त्या आशियाई खेळाडूला मिळाली असती का? स्मिथ, वॉर्नर आणि बेनक्रॉफ्ट या त्रिकूटाला मिळालेली शिक्षा योग्य आणि आवश्यक होती असेच वाटते. कारण आता या कठोर निर्णयामुळे आॅसी खेळाडूंचा माज कुठेतरी कमी होईल. आॅस्टेÑलिया इतके व्यावसायिकतेने क्रिकेट खेळतात की ते दुबळ्या संघाविरुद्धही आपला सर्वोत्तम संघच खेळवतात.
खेळताना ते आपल्या प्रतिस्पर्धी संघाला कोणतीही दयामाया दाखवत नाहीत; आणि यामुळेच ते अव्वल आहेत. पण हे यश मिळवत असताना स्लेजिंग करणे, मानसिक खच्चीकरण करणे यांसारख्या अस्त्रांचाही ते वापर करतात. मात्र हीच अस्त्रे जर का आॅस्टेÑलियन खेळाडूंविरुद्ध वापरली, तर मात्र त्यांचा पारा चढतो आणि लगेच खिलाडूवृत्तीची तत्त्वं त्यांच्याकडून ऐकावयास मिळतात. असे अनेकदा पाहण्यासही मिळाले आहे.
आपल्यावर झालेल्या कारवाईचा स्वीकार करून तिन्ही खेळाडू
मायदेशी परतले आणि प्रसारमाध्यमांपुढे तिघांनीही जाहीर माफी मागितली. कर्णधार स्मिथ एका लहान मुलाप्रमाणे रडला. या वेळी त्याला त्याच्या वडिलांनी मोठा आधार दिला. स्मिथसारख्या दिग्गजाला असे रडताना
पाहून क्रिकेटविश्वातूनही सहानुभूतीचा स्वर उमटल्याचे पाहण्यास मिळाले. स्मिथ, वॉर्नर यांना केलेली शिक्षा कठोर असल्याचे मत मांडून अनेकांनी स्मिथचे सांत्वनही केले.
परंतु, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतल्यास ही
शिक्षा आवश्यक होती. आता कदाचित एक वर्षाने हे
त्रिकूट पुनरागमन करून पुन्हा मैदान गाजवेलही, पण तो बेडरपणा किंवा गर्व त्यांच्यात दिसणार नाही. खुद्द आॅस्टेÑलियाच्या पंतप्रधानांनीही आॅसी संघाला स्लेजिंग न करता खेळण्याचे आवाहन केले. यातच सारेकाही येते.
खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती जागवण्यासाठी कदाचित या कठोर निर्णयाची मदतच होईल. अर्थात आता पुढील
एक वर्ष क्रिकेटविश्व स्मिथ, वॉर्नर यांच्या धडाकेबाज खेळाला मुकेल हे नक्की, पण आता यापुढे प्रत्येक
खेळाडू अधिक सफाईदार आणि प्रामाणिकपणे खेळेल अशी अपेक्षा आहे.
स्मिथ असा खेळाडू आहे, ज्याची गणना दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते. आधुनिक क्रिकेटमध्ये, स्मिथ श्रेष्ठ की विराट कोहली, असा वाद नेहमीच होतो. मात्र, या प्रकरणानंतर आता ही तुलना पुन्हा होणार नाही हे नक्की. आॅस्टेÑलियाई क्रिकेटमध्ये तर स्मिथची तुलना थेट दुसरा ‘ब्रॅडमन’ अशी झाली. परंतु आता याच स्मिथची प्रतिष्ठा ‘ब्रॅडमन टू बॅडमन’ अशी झाली आहे; आणि यासाठी तो स्वत: जबाबदार आहे हे विशेष.