'गुरू’ राहुल द्रविड यास अभिनंदनाचं पत्र
By अमेय गोगटे | Published: February 4, 2018 05:12 PM2018-02-04T17:12:47+5:302018-02-04T18:40:20+5:30
देशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचं जे स्वप्न तू पाहिलं असशील, त्या स्वप्नाचा कळत-नकळत आम्हीही एक भाग झालो होतो. आम्हाला भरभरून आनंद देणाऱ्या तुझ्या चेहऱ्यावर जगज्जेतेपदाचा आनंद आम्हाला पाहायचा होता....
प्रिय राहुल द्रविड यास,
स. न. वि. वि.
गेल्या रविवारी टेनिस सम्राट रॉजर फेडररनं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून 20व्या ग्रँडस्लॅम ट्रॉफीवर नाव कोरलं. ही लखलखती ट्रॉफी उंचावताना त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते. बहुधा, 2003 मधलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद ते इथवरचा अनेक चढ-उतारांचा, खाचखळग्यांचा प्रवास त्याच्या डोळ्यांसमोर तरळला असेल आणि या आठवणींनी त्याला भरून आलं असेल. स्वप्नपूर्तीच्या आनंदाने त्याच्या अश्रूंचा बांध फुटला असेल. काल जेव्हा आम्ही तुझ्या हातात आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपची ट्रॉफी पाहिली, तेव्हा आम्हीही काहीसे फेडररसारखेच भरून पावलो. अगदी रडलो नाही, पण गहिवरलो – शहारलो. कारण, देशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचं जे स्वप्न तू पाहिलं असशील, त्या स्वप्नाचा कळत-नकळत आम्हीही एक भाग झालो होतो. आम्हाला भरभरून आनंद देणाऱ्या तुझ्या चेहऱ्यावर जगज्जेतेपदाचा आनंद आम्हाला पाहायचा होता. तो अनुपम्य सोहळा आम्ही अनुभवला. 2011 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हातात विश्वचषक पाहून धन्य झालो होतो. आता तुझ्या हातात वर्ल्ड कप पाहून तसंच समाधान - किंबहुना त्याहून जरा जास्तच भारी वाटलं. कारण, प्रत्यक्ष मैदानावर न उतरता तू ही किमया करून दाखवली आहेस. या वर्ल्ड कपभोवती तुझ्या गुरुमंत्राचं वलय आहे आणि ते नेत्रदीपक, सुखद आहे.
सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर, विश्वनाथ, कपिल देव यांची नावं ऐकल्यावर साठीतली मंडळी जशी भूतकाळात हरवून जातात; तशीच सचिन, सौरव, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे ही नावं ऐकून आम्हा तिशी-पस्तीशीतल्या तरुणांचा ऊर भरून येतो. तुमच्याकडे पाहत आम्ही क्रिकेट खेळायला शिकलोच, पण क्रिकेटच्या तंत्रासोबत तुम्ही आम्हाला जगण्याचा मंत्रही शिकवलात. तुमच्या वागणुकीतून. सचिनने नम्रता शिकवली, तुझ्याकडून आम्ही संयम शिकलो, कधी कुणी वाकड्यात शिरलं तर त्याला नडण्याचे धडे सौरव‘दादा’नं दिले, तर लक्ष्मणनं झुंजायला शिकवलं. शिस्तबद्धता म्हणजे काय हे कुंबळेकडे पाहून कळलं. आजच्या काळात ही शिस्त म्हणजे अनेकांना जाच वाटू लागलाय. पण, या शिस्तीच्या, नम्रतेच्या, मेहनतीच्या, संयमाच्या पायावरच यशाची इमारत उभी राहू शकते, हा मंत्र तू तुझ्या शिष्यांना दिलास आणि त्याचं गोड फळ आज देशाला मिळालंय.
फलंदाज, यष्टिरक्षक आणि कर्णधार या तीनही भूमिका तू चोख बजावल्यास. क्षेत्ररक्षणात, विशेषतः स्लीपमधील तुझ्या सजगतेलाही जगाने दाद दिली. तंत्रशुद्ध फलंदाजी काय असते, हे दाखवून देत तू टीम इंडियाची ‘द वॉल’ झालास. तुझी ‘आर्ट ऑफ लीव्हिंग (Leaving)’ आठवून आजही गंमत वाटते. समोरचा गोलंदाज जीव तोडून धावत येऊन सुस्साट चेंडू टाकायचा आणि तो तू शांतपणे सोडून द्यायचाय, तेव्हा त्या बिच्चाऱ्या गोलंदाजाची दया यायची. परवा, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत चेतेश्वर पुजाराने 54व्या चेंडूवर खातं उघडलं, तेव्हा तुझी आठवण आली. 2008 मध्ये सिडनी कसोटीत 40 चेंडूंनंतर तू पहिली धाव घेतली होतीस, तेव्हा स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला होता. तुझ्या संयमाला मिळालेली ती पावती होती. तूही प्रांजळपणे हे कौतुक स्वीकारत बॅट उंचावून अभिवादन केलं होतंस.
महेंद्रसिंह धोनीला सगळे ‘कॅप्टन कूल’ म्हणतात. पण, त्याच्यापेक्षा थंड डोक्याने संघाचं नेतृत्व करताना आम्ही तुला पाहिलंय. पराभव, टीकास्त्र, बॅड पॅचचा सामना करतानाही तुझा संयम कधीच सुटला नाही, तू कधीच ओव्हर रिअॅक्ट झाला नाहीस. विजयाचा जल्लोष करतानाही त्यात कधी आक्रस्ताळेपणा नव्हता, गर्व किंवा माज नव्हता. तुझे पाय कायमच जमिनीवर होते, आहेत आणि राहतील.
तू मैदानावर जशी छाप पाडलीस, तशीच मैदान सोडताना – अर्थात निवृत्त होतानाही तुझं वेगळेपण दाखवून दिलंस. सन्मानाने निवृत्त होणं बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूंना जमलेलं नाही. पण, तू ते करून दाखवलंस. 16 वर्षांच्या कारकिर्दीत तू अनेक विक्रम केलेस, पुरस्कार पटकावलेस, एक जंटलमन क्रिकेटवीर म्हणून स्वतःला सिद्ध केलंस. पण, वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असण्याचं भाग्य तुला लाभलं नव्हतं. त्याची रुखरुख आम्हाला लागून राहिली होती. पण आता तू आमचं ते दुःखही दूर केलं आहेस.
भारतीय क्रिकेटची नवी पिढी घडवण्याचा वसा तू घेतलास आणि तुझ्याबद्दलचा आदर दुणावला. 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी तू आनंदानं स्वीकारलीस, तेव्हाच क्रिकेटचं भविष्य सुरक्षित हातांमध्ये असल्याची खात्री पटली. हा विश्वास तू आणि तुझ्या शिष्यगणांनी सार्थ ठरवला आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि आभार.
आज इंटरनॅशनल स्कूलचा जमाना असला, नवनव्या पद्धतींनी शिक्षण दिलं जात असलं, तरी जुन्या पिढीला जे आणि जसं शिकवलं गेलंय, त्याला तोड नाही. म्हणूनच, अॅबॅकस शिकलेल्या नातवापेक्षा, पावकी-निमकी-दीडकी शिकलेले सत्तरीतले आजोबा वेगाने गणितं सोडवतात. तू असाच - क्रिकेटच्या जुन्या शाळेतला विद्यार्थी आहेस. त्याच ज्ञानाची, संस्कारांची उदयोन्मुख खेळाडूंना गरज असल्याचं तू अचूक हेरलंस आणि प्रसंगी या विद्यार्थ्यांचा कानही खेचलास. आज सगळ्यांनाच विराट कोहली व्हायचंय. पण, त्यापेक्षा स्वतःमधील गुण ओळखा आणि त्यावर काम करा, हा मोलाचा सल्ला तू दिलास. आयपीएल लिलाव दरवर्षी होतील, पण वर्ल्ड कप नाही, असंही तू खडसावलंस. अंतिम सामन्याआधी तू ‘यंग ब्रिगेड’शी जे बोललास, त्या संवादानं ‘चक दे’मधल्या कबीर खानची आठवण झाली. ‘70 मिनिट’वाला डायलॉग आठवला. हा क्षण, ही संधी परत येणार नाही, त्यामुळे सर्वस्व पणाला लावून खेळा, या तुझ्या उद्गारांनी संघाला वेगळंच बळ दिलं आणि भारताच्या पोरांनी जग जिंकण्याचा पराक्रम केला.
पृथ्वी शॉ, मनजोत कालरा, शुभमन गिल, ईशान पोरेल यांच्यात प्रचंड गुणवत्ता आहे. त्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम तू केलंस – करतोयस. पण या शिलेदारांना फक्त खेळाडू म्हणून नव्हे; तर माणूस म्हणून प्रगल्भ बनवण्याचा तुझा प्रामाणिक प्रयत्न विजयानंतरच्या तुझ्या सल्ल्यातून जाणवतो. ‘विजयाचा आनंद जरूर साजरा करा, पण कुणाचाही अपमान होणार नाही, कुणी दुखावलं जाणार नाही, हेही पाहा. विजय नम्रपणेही साजरा करता येतो’, असं तू मुलांना सांगितलंस आणि त्याचं तंतोतंत पालन करून शिष्यगणांनी गुरुभक्तीचं दर्शनच घडवलं.
ज्योतिष शास्त्रानुसार अनेक कामं पूर्ण करण्यासाठी गुरुबळाची आवश्यकता असते. पत्रिकेत जसं गुरूचं स्थान महत्त्वाचं आहे, तसंच प्रत्यक्ष आयुष्यातही चांगला गुरू मिळायला भाग्य लागतं. तू खेळाडू, माणूस म्हणून उत्तम आहेसच, पण आता तुझा गुरुमहिमाही जगानं पाहिलाय. आमचा द्रविड ‘गुरू’ झाल्याचा आनंद खरंच मोठा आहे. या गुरूला सादर वंदन!
तुझा चाहता,
- अमेय गोगटे