ख्रिस गेलच्या शतकानंतर विराट कोहलीचा फोन वाजला अन्...

By अमेय गोगटे | Published: April 20, 2018 03:29 PM2018-04-20T15:29:56+5:302018-04-20T15:29:56+5:30

ख्रिस गेलच्या शतकानंतर आयपीएल वर्तुळात वेगवान घडामोडी घडल्याचं, बरीच फोनाफोनी झाल्याचं खबऱ्यांकडून कळतं. 

IPL 2018 Chris Gayle's century and a call to virat kohli satire | ख्रिस गेलच्या शतकानंतर विराट कोहलीचा फोन वाजला अन्...

ख्रिस गेलच्या शतकानंतर विराट कोहलीचा फोन वाजला अन्...

Next

किंग्ज इलेव्हन पंजाबनं बलाढ्य चेन्नईपाठोपाठ गुरुवारी तगड्या हैदराबादलाही पाणी पाजलं. पंजाबच्या या दोन्ही विजयांचा शिल्पकार ठरलाय तो, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल. चेन्नईविरुद्ध धडाकेबाज अर्धशतकी खेळी करणाऱ्या गेलनं काल खणखणीत शतक ठोकलं आणि वाघाचं वय झालं तरी तो वाघच असतो हे पुन्हा दाखवून दिलं. त्याच्या या शतकानंतर आयपीएल वर्तुळात वेगवान घडामोडी घडल्याचं, बरीच फोनाफोनी झाल्याचं खबऱ्यांकडून कळतं. 

गेलचं शतक पूर्ण होताच, सगळ्यात आधी विराटचा मोबाइल खणखणला. लंडनचा कोड पाहून, मालकाचा फोन असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि थोडं सावरून बसत त्यानं फोन उचलला.

फोन # 1

मालक: काय भाऊ, पाहिली का मॅच? 'आपला वाघ' दुसऱ्या संघातून कशा डरकाळ्या फोडतोय बघा. 

विराट: हो सर, बघितली मॅच. अनुष्काही म्हणाली, व्हॉट अ गेल, सॉरी गेम!

मालक: पण, आपल्या वाघांची शेळी झालीय की! मुंबईत पार मातीच खाल्ली. हे असंच सुरू राहिलं तर यंदाही काही खरं नाही आपलं. हे 'मल्ल्या' परवडणारं नाही आता. आधीच हा 'किंग' 'फिश'सारखा गळाला लागलाय. मला 'विजय' हवाय. काहीही करून त्या गेलला परत घ्या. तोच जिंकवू शकतो आपल्याला.

विराट: हे कसं शक्य आहे? लिलाव तर झालाय आता.

मालक: लिलावाचं नाव नको काढू. या लिलावानेच माझी वाट लावलीय. गेल पाहिजे म्हणजे पाहिजे. Thats it!

वैतागलेला विराट सवयीनुसार 'सणसणीत शब्दांत' भावना व्यक्त करणार, इतक्यात अनुष्का त्याला शांत राहण्याचा इशारा करते. तिकडून मालक फोन कट करून टाकतात. विराटही फोन सोफ्यावर फेकतो.

फोन # 2 

थोड्या वेळाने कपाळाला हात लावून विराट कोहली आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलमधील एका सदस्याला फोन करतो. राजकारणात निवडणूक आली की लोक जसे पक्ष बदलतात, तसे एका संघातील फॉर्मात असलेल्या खेळाडूला दुसऱ्या संघात घेण्याची काही तरतूद नियमावलीत आहे का, अशी विचारणा तो करतो. तेव्हा, त्याला सुखद धक्का बसतो. आयपीएलचे नियम तयार करणाऱ्यांमध्ये काही राजकीय नेतेही असल्याने त्यांनी तशी सोय ठेवल्याचं त्याला समजतं. प्रीती झिंटा आणि ख्रिस गेल तयार असतील, तर आमची काही हरकत नाही, असं पदाधिकारी त्याला सांगतो.   

फोन # 3 
 
विराट कोहली सुटकेचा निःश्वास सोडून अनुष्काला हाक मारतो. अनुष्कानं तिचं बॉलिवूड कनेक्शन वापरून पंजाबची मालकीण प्रीती झिंटाशी बोलावं आणि गेलला पुन्हा आरसीबीकडे द्यावं, असा प्रस्ताव तो मांडतो. पण प्रीतीशी तेवढी घट्ट मैत्री नसल्यानं अनुष्का, सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या 'सुलतान' सलमान खानला फोन करते. प्रीतीला सलमानबद्दल किती जिव्हाळा, स्नेह आहे हे जोधपूर जेलमध्ये सगळ्यांनी पाहिलं आहेच. त्यामुळे त्याचा शब्द ती मोडणार नाही, असं गणित अनुष्का मांडते आणि सल्लूचा नंबर फिरवते. 'बीइंग ह्युमन' सलमान तिला शब्द देतो आणि सलमानने एकदा 'कमिटमेंट' केली की तो स्वतःचंही ऐकत नाही, हे तर आपल्याला माहीत आहेच. 

फोन # 4 

अनुष्काचा फोन ठेवल्यानंतर लगेचच सलमान प्रीतीला फोन लावतो. बरीच रात्र झाली असतानाही सलमानचा फोन असल्याने प्रीती तो घेते आणि त्याचं म्हणणं ऐकून ताडकन उडतेच. तिच्या गालावरची खळीच गायब होते. ज्या गेलमुळे पंजाबला 'अच्छे दिन' आलेत, ते ब्रह्मास्त्रच सलमानने मागितल्यानं प्रीतीचा आनंद मावळतो. सलमानला थेट नकार कसा द्यायचा, असाही प्रश्नच होता. त्यामुळे बघते, कळवते, असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि धावत-धावतच गेलला भेटायला जाते. सगळं प्रकरण त्याला सांगते. त्यानंतर, त्यानं नाही म्हणावं, असं तिला मनापासून वाटत असतं. पण, गेल मोठमोठ्याने हसू लागतो. प्रीती घाबरते. हा आता आरसीबीमध्ये जातो की काय, असं तिला वाटतं. पण, तसं काही नसल्याचं गेल तिला सांगतो आणि आपला मोबाइल घेतो. 

व्हॉट्स अॅप चॅट

गेल व्हॉट्स अॅपवर जातो. जुन्या मालकाचा नंबर त्याच्याकडे असतोच. तो ऑनलाइन असल्याचं त्याला दिसतं. खोडकरपणे हसत हसत तो एक मेसेज टाइप करतो. 'तुमची ऑफर मिळाली. त्यावर समोरासमोर बसूनच बोलू या. मोदींसोबत भारतात या. वाट बघतोय.'😜😉

माजी मालकाने मेसेज वाचल्याचं गेलला 'ब्लू टिक'वरून कळतं. तो टायपिंग करत असल्याचंही दिसतं. झटक्यात हात जोडलेला इमोजी गेलच्या स्क्रीनवर झळकतो. तो पाहून पुन्हा हास्याचा गडगडाट होतो. प्रीतीची खळीही खुलते.

त्यानंतर, गेलने हसत हसत विराटला हे सगळं कळवलं. त्यानेही गेलला हात जोडले आणि निवांत झोपी गेला.

(हा किस्सा पूर्णपणे काल्पनिक आहे. वास्तवाशी त्याचा अजिबात संबंध नाही.)
 

Web Title: IPL 2018 Chris Gayle's century and a call to virat kohli satire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.