IPL 2020 : पंजाबविरुद्धच्या लढतीपूर्वी दिल्लीला मोठा धक्का, दिग्गज खेळाडू झाला दुखापतग्रस्त
By बाळकृष्ण परब | Published: September 20, 2020 01:54 PM2020-09-20T13:54:05+5:302020-09-20T16:02:12+5:30
दिल्लीचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सरावादरम्यान दुखाापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो आज पंजाबविरुद्ध आज होणाऱ्या लढतीत खेळणार नाही.
अबुधाबी - शनिवारपासून सुरू झालेल्या आयपीएलच्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबचे संघ आमने-सामने येणार आहेत. दरम्यान, पंजाबविरुद्ध होणाऱ्या या सलामीच्या लढतीपूर्वीच दिल्लीच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सरावादरम्यान दुखाापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो आज पंजाबविरुद्ध आज होणाऱ्या लढतीत खेळणार नाही.
इशांतला झालेल्या दुखापतीचे स्वरूप काहीसे गंभीर असून, त्यामुळे तो यंदाच्या आयपीएलमधील अनेक सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. क्रिकबझ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार इशांत शर्माच्या पाठीला दुखापत झाली आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या संघव्यवस्थापनाने त्याच्या दुखापतीबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
इशांत शर्माने ९७ कसोटी आणि ८० एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र सातत्याने होणाऱ्या दुखापतींमुळे तो भारतीय संघात कधीही स्थिरावलेला नाही. यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या दुखापतीमुळे तो सुमारे महिनाभर क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान, तो पुन्हा एकदा दुखापतग्रत झाला होता. सातत्याने होणाऱ्या दुखापतींमुळे इशांतच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबाबतही सातत्याने सवाल उपस्थित करण्यात येत असतात.
दरम्यान, ऐन सलामीच्या लढतीपूर्वीच आघाडीचा गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने दिल्ली कॅपिटल्सला धक्का बसला आहे. इशांतच्या अनुपस्थितीत हर्षल पटेल, मोहित शर्मा आमि आवेश खान यांच्यापैकी कुणाला तरी संघात स्थान मिळू शकते. इशांत शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत ८९ सामने खेळले असून, या सामन्यांत त्याने ७१ बळी टिपले आहे. इशांतने २०११ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना कोच्चीविरु्द्ध १२ धावा देत पाच बळी टिपले होते.